स्वामीपूजन, आरती झाल्यावर आवर्जून म्हणा ‘स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली’; होईल स्वामीकृपा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 07:53 AM2024-05-30T07:53:53+5:302024-05-30T07:57:29+5:30
Swami Samarth Mantra Pushpanjali: अनेक ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मंत्रपुष्प म्हटले जाते, असे सांगितले जाते.
Swami Samarth Mantra Pushpanjali: एखादी विशेष पूजा किंवा व्रताचे उद्यापन असेल किंवा व्रताची सांगता असेल, तेव्हा घरात शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजन, आरती केली जाते. त्यानंतर मंत्रपुष्प किंवा मंत्रपुष्पांजली म्हटली जाते. गणेशोत्सवात तर बाप्पाचे आगमन झाल्यापासून ते बाप्पााला निरोप देईपर्यंत दररोज दोनवेळा आरती केली जाते. मंत्रपुष्प म्हटले जाते. नवरात्र आणि अन्य उत्सवांवेळीही असेच चित्र पाहायला मिळते.
स्वामी समर्थ महाराज हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. स्वामींचे दररोज न चुकता पूजन, नामस्मरण हजारो घरांमध्ये होत असते. स्वामींची कृपा लाभावी, यासाठी विविध स्तोत्रे, श्लोक, मंत्र, जप आदी केले जाते. यातच स्वामींचे पूजन, नैवेद्य, आरती झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना मंत्रपुष्पांजली अर्पण करावी. आपण जे परंपरेने म्हणतो ते मंत्रपुष्प म्हटल्यावर किंवा ते म्हणायच्या आधी स्वामींच्या चरणी मंत्रपुष्पाची सेवा अर्पण करावी, असे सांगितले जाते. स्वामी समर्थ दत्तावतार मानले गेले असून, गुरुवार हा स्वामींच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. अनेक ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मंत्रपुष्प किंवा मंत्रपुष्पांजली म्हटली जाते, असे सांगितले जाते.
स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली
पूर्ण ब्रह्मा सनातना विभुवरा निर्गुण सर्वेश्वरा।
ओंकाराकारा परात्परा गुरो आम्हा तुझा आसरा।
मूलाधार जगतप्रभू तुझी लीला न जाणे कुणी।
देवा विघ्न हरी आम्हावरि करी, आडो न माया गुणी॥१॥
आनंदकंद विमला ज्ञानस्वरुपा।
साक्षी सदैव हृदयस्थ ही मायबापा।
स्वामी समर्थ गुरु तू हरी सर्व तापा।
दावि स्वरूप मज लावूनी ज्ञानदीपा॥२॥
धर्मग्लानि कराल काल कली हा शास्ता नुरे या मही।
तत्वाचा लव मागमूस न दिसे धुंडूनि सत्वातहि।
भक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या येई विजयदत्त हा
होई लीन अनन्यभावे चरणी वंदी सदा दास हा॥३॥
विधीहरिहर हे एकरूपे मिळाले।
परमगुरुस्वरूपे देखता नेत्र घाले।
अनुपम तव प्रीती लीन होताती भक्तं।
तव पद झणि देशी धन्य तू एक दत्त॥४॥
परमात्मा पुरूषोत्तमा गुणतिये नारायणा श्रीधरा।
लीलाविग्रही सूत्रधार हृदयी राहुनिया आचरा।
ज्ञाते भाव सरो सदैव विसरो हा जीव तो दुसरा।
अर्पितसे सुमनांजली तव पदा प्रेमे जगतगुरुवरा॥५॥
ब्रह्मा इंद्र सुरासुर प्रतिदिनी प्रार्थित तुझिया पदा।
ओंकारस्वरूपा तू वेद जननी दुरवी न आम्हा कदा।
भावे ज्या भजता भिउनि पळती दैन्यादि सर्वापदा।
गायत्री सुमने नमू करी कृपा आम्हावरी सर्वदा॥६॥
॥श्री स्वामी समर्थ॥