Job And Astrology: रोजगार, नोकरी मिळण्यात अडचणी येतायत? ‘हे’ ५ उपाय ठरतील उपयुक्त; करुन तर पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 01:47 PM2021-06-01T13:47:05+5:302021-06-01T13:48:08+5:30
Job And Astrology: ज्योतिषशास्त्रात नेमके काय उपाय आहेत? जाणून घ्या...
सन २०२० मध्ये आलेले कोरोना संकट अद्यापही दूर झाल्याचे दिसत नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योग बंद पडले, महागाई वाढली, अनेकविध समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र, आता हळूहळू काही क्षेत्रे पूर्वपदावर येत आहेत. काही ठिकाणी नोकरी, रोजगार उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. अशावेळी आपल्याला नोकरी मिळवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करायला हवेत. परंतु, तरीही आपल्याला अपेक्षित यश मिळत नसेल, तर ज्योतिषशास्त्राची मदत आपण घेऊ शकता.
ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे करून पाहिल्यास नोकरी, रोजगार या क्षेत्रात आपल्याला यश, प्रगती प्राप्त करू शकेल. आता आपण ज्या ठिकाणी नोकरी करत आहात, तेथे आपल्याला समाधान मिळत नसेल, आणि नोकरी बदलण्याचा विचार जरी करत असाल, तरीही आपल्याला ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेले उपाय उपयुक्त ठरू शकतात, असे सांगितले जाते. नेमके काय उपाय आहेत? जाणून घ्या...
जून महिना कोणत्या राशींसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे, ते पाहूया!
१. भाग्येश, दशमेश रत्न धारण करावे
ज्योतिषशास्त्रानुसार, नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीत यश व प्रगती करण्यासाठी भाग्येश किंवा दशमेश रत्न धारण करावे, असे सांगितले जाते. जन्मकुंडलीनुसार, आपण कोणते रत्न धारण केले, तर उपयुक्त ठरू शकते, याबाबत ज्योतिषी सांगू शकतात. ज्योतिषी सल्ला घेतल्यानंतर एखादे रत्न आपण धारण करावे, असे सांगितले जाते.
२. सूर्योपासना करावी, अर्घ्य द्यावे
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला नवग्रहांचा राजा मानले जाते. तसेच सूर्याला नोकरी, राजकीय क्षेत्राचा कारक मानले जाते. कुंडलीत सूर्य मजबूत करायचा असेल, तर सूर्योपासना करणे अत्यंत लाभदायक ठरते, असे मानले जाते. सूर्याचे पूजन करून नियमितपणे अर्घ्य देणे शुभ मानले जाते. यामुळे आत्मविश्वास वाढीस लागतो. त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या कार्यक्षेत्रात दिसू शकतो, असे मानले जाते.
...म्हणूनच ९९ च्या चक्रात अडकू नका, नाहीतर १०० पटींचा आनंद गमावून बसाल!
३. लक्ष्मी देवीचे पूजन, उपासना
ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन नोकरी मिळवण्यासाठी श्रीयंत्राचे पूजन करणे उपयुक्त मानले जाते. धन आणि ऐश्वर्य प्रदान करणाऱ्या लक्ष्मी देवीचे हे यंत्र आहे. नियमितपणे शुक्रवारी श्रीयंत्राचे पूजन करून कनकधारा स्तोत्राचे पठण करावे, असे सांगितले जाते. असे केल्याने लक्ष्मी देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात. शिवाय, नोकरीच्या संबंधातील समस्या दूर होऊ शकतात, असे म्हटले जाते.
४. रुद्राक्ष धारण करावे
ज्योतिषशास्त्रानुसार, नोकरीसंदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी दशमुखी रुद्राक्ष धारण करावे, असे सांगितले जाते. दशमुखी रुद्राक्ष विष्णूचे स्वरुप मानले जाते. दशमुखी रुद्राक्ष धारण केल्याने नोकरीतील समस्या, मुलांविषयीच्या अडचणी दूर होऊ शकतात, अशी मान्यता आहे. मात्र, रुद्राक्षाचे प्रकार आणि त्याचे गुणधर्म यामध्ये विविधता आढळते. त्यामुळे योग्य सल्ला घेऊन विधीवत रुद्राक्ष धारण करावे, असे सांगितले जाते.
देव कोणत्या स्वरूपात मदतीला येईल, हे कोणीही सांगू शकत नाही, आता हीच गोष्ट पहा ना...
५. पिंपळाच्या वृक्षाचे पूजन करावे
ज्योतिषशास्त्रानुसार, पिंपळाचे झाडाचे पूजन अतिशय शुभ आणि लाभदायक मानले जाते. पिंपळाच्या वृक्षात देवता आणि पितरांचा वास असतो, असे सांगितले जाते. नियमितपणे पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. विशेष करून रविवारी सकाळी पिंपळाच्या झाडाचे पूजन करावे. यावेळी दूध आणि जल अर्पण करावे. तसेच सायंकाळी तेलाचा दिवा दाखवावा, असे सांगितले जाते. यामुळे नोकरीची, आजिविका यांच्या समस्या, अडचणी दूर होण्यास मदत होऊ शकेल, असे सांगितले जाते.