‘गण गण गणात बोते’चा नेमका अर्थ काय? गजानन महाराजांनी मंत्र का दिला? अखंड जपाने मिळेल पुण्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 10:58 AM2024-10-21T10:58:14+5:302024-10-21T10:58:53+5:30
Gajanan Maharaj Teachings: गजानन महाराज अखंडपणे ‘गण गण गणात बोते’ या मंत्राचा जप करत असत. जाणून घ्या...
Gajanan Maharaj Teachings: श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्धकोटीला पोचलेले महान संत होते. मिळेल ते खावे, कोठेही पडून रहावे, कोठेही मुक्त संचार करावा, महाराजांच्या या अशा अवलिया स्वभावामुळेच सर्व भक्त बुचकळ्यात पडायचे. गजानन महाराजांनी चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते.
‘गण गण गणात बोते’ हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड जप करित किंबहुना त्यामुळेच त्यांना गिणगिणे बुवा वा गजानन महाराज अशी नावे पडली. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत गजानन महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे. गजानन महाराजांचे चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारिक कथांनी भरलेले आहे. सामान्य दिसणारी व्यक्ती एक योगी पुरुष आहे, याची जाणीव लोकांना झाली, तेव्हा लोकांनी गजानन महाराजांचा ध्यास घेतला. आपली दुःखे, अडचणी सांगून त्यातून मार्ग दाखवा अशी या सिद्धपुरुषाला विनवणी केली. तेव्हा गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच मंत्र दिला, तो म्हणजे ‘गण गण गणात बोते!’
भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव अन् आत्मा-परमात्मा भेट
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः। मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति।। हेच तत्त्व भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे. या पृथ्वीवरील प्रत्येक जीव माझाच अंश आहे. या देहात स्थित असलेला जीवात्मा मन आणि पंचभूतांना आकर्षित करून घेतो. म्हणून तर आपण म्हणतो, जिवा शिवाची भेट झाली. किंवा भेटीची आस लागली. ही आस म्हणजेच एका जीवाला दुसऱ्या जीवाप्रती असलेली ओढ. हे प्रेम उत्पन्न होणे, म्हणजेच गजानन महाराजांच्या मंत्रानुसार ‘गण गण गणात बोते’ अर्थात आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे. ‘गण गण गणात बोते’ हा केवळ मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे, असे सांगितले जाते.
‘गण गण गणात बोते’चा अर्थ काय?
‘गण गण गणात बोते’ या मंत्राचा अर्थ लक्षात घेतला, तर ते समजू शकेल. पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे बघा! प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका. तो केवळ तुमच्यातच नाही, तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे. त्याचा आदर करा. ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले, तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतःही वाईट कृत्य करण्यास धजावणार नाही.
।। गण गण गणात बोते ।।