सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज? समर्थांच्या भक्तीचा ‘हा’ अनुभव देईल नवी दृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 09:09 AM2023-11-29T09:09:09+5:302023-11-29T09:09:09+5:30
Shree Swami Samarth Maharaj: स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना एकटे पाडत नाहीत, अशी मान्यता आहे.
Shree Swami Samarth Maharaj: स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना एकटे पाडत नाहीत, अशी मान्यता आहे. स्वामी समर्थांचे केवळ नाव घेतले की, आधार मिळाल्यासारखे वाटते, असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे. स्वामीनामामुळे प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता मिळते, असे अनेक नानाविध अनुभव सांगणारे हजारो जण सापडतील. स्वामी महाराजांच्या अनेकविध कथा या स्वामी भक्तांच्या स्वानुभवातून पुढे आलेल्या आहेत. त्यातून सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते. नवा विश्वास निर्माण होतो. स्वामींवरील श्रद्धा आणखीन बळकट होते, असे अनेक जण सांगतात. अशीच एक कथा सांगितली जाते. यामुळे 'भिऊ नकोस...'चा मंत्र पुनःप्रत्ययाला येतो, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...
महारुद्रराव नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता. त्याची मुलगी राधा हिचा विवाह जमत नव्हता. एकीकडे श्रीमंताघरच्या मुलीला कशी मागणी घालायची, या विचाराने अनेक जण स्थळे सूचवत नसत. तर दुसरीकडे श्रीमंत स्थळे यायची; पण, मोठा हुंडा मागितला जायचा. हुंडा देणे आणि घेणे महारुद्ररावांना अजिबात मान्य नव्हते. शेवटी स्वामींना स्मरून ते पुन्हा प्रयत्न करतात. काही दिवसांनी सर्वप्रकारे योग्य स्थळ येऊन राधेचा विवाह निश्चित होतो. महारुद्ररावांना आनंद होतो. स्वामींच्या मठात जाऊन सहस्त्र भोजन घालण्याचा संकल्प करतात.
आम्ही काय पहारेकरी आहोत का? आम्ही आधीच सांगितले होते
स्वामींची भेट घेण्यासाठी महारुद्रराव येतात. तेव्हा, सावधगिरी बाळगा, हलगर्जीपणा करू नका, अशी सूचना स्वामी त्यांना करतात. मात्र, आनंदाच्या भरात महारुद्रराव स्वामी वचनाकडे महारुद्रराव फारसे लक्ष देत नाहीत. सहस्त्र भोजनाचा संकल्प पूर्ण होतो. बाकीची मंडळी झोपतात. तेवढ्यात, अरे झोपला काय आहेस? चोर येऊन सर्व लुटून गेले आहे, असे स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडतात. महारुद्रराव पाहतात तर, राधेच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यांसह त्यांचे सर्व सामान चोर लंपास करतात. महारुद्रराव स्वामींना म्हणतात की, स्वामी, चोर आले तेव्हाच का नाही सांगितले? यावर, स्वामी म्हणतात की, अरे आम्ही काय पहारेकरी आहोत का? आम्ही आधीच सांगितले होते. सावध राहा म्हणून. पण तुम्ही गाफील राहिलात. महारुद्रराव स्वामींना शरण जातो. स्वामी सांगतात की, पाच चोर होते. शोध घ्या त्यांचा.
महारुद्रराव आणि चोळप्पा गावच्या पाटीलकडे धाव घेतात
महारुद्रराव आणि चोळप्पा विचार करतात. तेव्हा चोळप्पांना भगवान देशपांडे यांची आठवण होते. महारुद्रराव आणि चोळप्पा त्यांच्याकडे जातात. देशपांडे मदत करायला तयार होतात. परंतु, माझा एक मित्र आहे. तो गावाचा पाटील आहे. त्यांना मदतीला घेऊ शकतो, असे ते सुचवतात. सर्वजण पाटलांकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगतात. पाटील चोरांच्या एका ठिकाणाची झडती घेतात. तिथे दोन चोर सापडतात. शिक्षा कमी करण्याची लालूच देऊन अन्य तिघांना पकडण्यासाठी दोन चोरांना पाटील तयार करतात. ठरलेल्या ठिकाणी तीन चोर येतात आणि पकडले जातात. महारुद्ररावांना त्यांच्या सर्व वस्तू मिळतात.
सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज?
ते सर्वजण स्वामींकडे येऊन येतात आणि म्हणतात की, सर्वजण आम्हाला विचारतात की, आम्ही स्वामी भक्ती का करतो? सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज? तेव्हा मी त्यांना उत्तर देतो की, स्वामी भक्तीने समाधान मिळते. आता मला जाणीव झाली की, स्वामी भक्तीने आधारही मिळतो. कार्य करताना जेव्हा मन कामापासून परावृत्त होऊ लागते, तेव्हा सद्गुरुंचे नाव त्याला धीर देते. सद्गुरु माणसाचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरीत करते. यावर, स्वामी स्मितहास्य करतात आणि म्हणतात की, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.
|| श्री स्वामी समर्थ ||