२६ ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या कार्तिक मासातले मुख्य सण आणि त्याचे महत्त्व जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 12:56 PM2022-10-27T12:56:52+5:302022-10-27T12:57:14+5:30
दिवाळी होता होता वेध लागतात तुळशी विवाह आणि घरातील लग्न कार्याचे; त्याची सुरुवात या महिन्यात होते; सविस्तर वाचा!
चांद्रवर्षातील आठवा व शरद ऋतुतील दुसरा महिना म्हणजे कार्तिक मास. २६ ऑक्टोबर पासून कार्तिक मासारंभ झाला आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा पुढे मागे कृत्तिका नक्षत्राचा प्रभाव असल्यामुळे या महिन्याला कार्तिक म्हणतात. या मासाला उर्ज, बाहुल, कार्तिकिक अशीही नावे आहेत. या मासातच थंडीची सुरुवात होऊन रुक्ष वारे वाहू लागतात.
कार्तिकातील धर्मकृत्यांमध्ये कार्तिकस्नान व दीपदान यांना विशेष महत्त्व आहे. या मासात संपूर्ण महिनाभर पहाटे लवकर उठून केल्या जाणाऱ्या नित्यस्नानाला कार्तिक स्नान म्हणतात.
आश्विन शुद्ध दशमी, एकादशी वा पौर्णिमेस स्नानास प्रारंभ करून कार्तिक पौर्णिमेस याची समाप्ती करतात. हे स्नान नदी वा जलाशयात केले जाते. पण शहरांच्या ठीकाणी शक्य नसेल तर घरीच हे व्रत अंगिकारता येते. हे प्रात: स्नान महिनाभर शक्य नसेल तर कार्तिकी शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत पाच दिवस तरी अवश्य करावे.
कार्तिक मासातील मुख्य सण पाहू :
१) कार्तिकी एकादशी
२) तुलसीविवाह (५ ते ८ नोव्हेम्बर)
३) वैकुंठ चतुर्दशी
४) ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी
या शिवायही अनेक महत्त्वाचे दिवस, उत्सव, तिथी या मासात येतात. त्यांची माहिती येत्या काळात घेऊच. कोरोना काळानंतर स्थगित झालेली कार्तिक वारी करण्यास सरकारने परवानगी दिली असल्यामुळे भक्तांच्या उत्साहाला उधाण येणार आहे. असा हा कार्तिक मास २६ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर पर्यंत राहणार असून २४ नोव्हेम्बर रोजी मार्गशीर्ष मास सुरू होणार आहे.