'विटाळ' या संकल्पनेबद्दल संत चोखामेळा यांचे परखड मत काय होते ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 10:41 AM2024-02-07T10:41:38+5:302024-02-07T10:41:51+5:30

सुतक-सोहेर, विटाळ हे मानवी देहाला चिकटलेले विकार आहेत, देव निर्लेप आहे, मग त्याला विटाळ होतो का, यावर संतांनी केलेले भाष्य पहा. 

Know what Saint Chokhamela's strong opinion was about the concept of 'untouched days'! | 'विटाळ' या संकल्पनेबद्दल संत चोखामेळा यांचे परखड मत काय होते ते जाणून घ्या!

'विटाळ' या संकल्पनेबद्दल संत चोखामेळा यांचे परखड मत काय होते ते जाणून घ्या!

ईश्वर हा नित्य, शुद्ध, मुक्त व आनंददायी असतो. सोवळे ओवळे असते, ते मनुष्याला, ईश्वराला नाही. मात्र, लोकांनीच काही संभ्रम निर्माण करून ठेवले आणि त्यातच अडकून राहिले. अशा लोकांना सोवळ्याओवळ्या पलीकडच्या देवाची ओळख करून देण्यासाठी संत चोखामेळा यांनी पुढाकार घेतला आणि आपल्या अमोघ शैलीतून देवाची खरी ओळख करून दिली. 

ते म्हणतात, की हा विटाळ आला तरी कोठून? पूर्वजन्मीच्या कर्मानुसार हा विटाळ वंशपरंपरेने आपणास आला काय? पूर्वजन्मी तरी कर्म करण्याची बुद्धी कोणी दिली? या प्रश्नांचा धागा लांबवताना तो थेट ब्रह्मतत्त्वापर्यंत जाऊन पोहोचतो. या एका तत्त्वापासून सर्व सृष्टीची निर्मिती झाली. मग एक सोवळा व दुसरा ओवळा, असा भेद कसा झाला? एका बीजापासून निर्माण झालेल्या वृक्षास फळे सारखीच गोड येणार. दोन-तीन नासकी निघाली, तर बीजातच दोष आहे, अशी शंका घेणार का?

ही शंका चोखोबांनी बोलून दाखवली आहे. विटाळ असेल, तर तो सर्वांनाच आहे. सोवळा कोण? ओवळा कोण? हे सांगणे अवघड आहे.
चोखा म्हणे मज नवल वाटते, विटाळापरते आहे कोण?

सर्वांचा जन्म विटाळातूनच होता, असे त्यांना म्हणायचे आहे. त्यांच्या मते, सोवळ्याओवळ्यापलीकडचा एक विठ्ठल आहे.
चोखा म्हणे माझा विठ्ठल सोवळा, अरूपे आगळा विटेवरी।

म्हणून कोणाच्या संगतीने देव विटाळतो व पाण्याने शुद्ध होतो, हे त्यांना मान्य नाही. जो सोवळा आहे, त्यास विठ्ठल सोवळा वाटतो आणि ओवळ्याच्या ठिकाणी तो ओवळा आहे. खरे पाहता देव सोवळ्याओवळ्याच्या पलीकडचा आहे. चोखोबा म्हणतात की-

नीचाचे संगती देवो विटाळला,
पाणीये प्रक्षाळोनि सोवळा केला,
मुळिच सोवळा कोठे तो गोवळा, 
पाहत पाहणे डोळा जयापरी,
सोवळ्याचे ठाई सोवळा आहे,
वोवळ्या ठाई वोवळा का न राहे,
चोखा म्हणजे देव दोहाच्या वेगळा,
तोचि म्या देखिला दृष्टीभरी।

भगवंताला नियमांच्या चौकटीत न अडकवता, आपणही चौकटीपलीकडचा निर्गुण परमात्मा बघायला शिकले पाहिजे. एवढेच काय, तर संत म्हणतात, चराचरात भगवंताला बघायला शिका, म्हणजे मनातून भेदाभेद दूर होईल आणि परमात्म्याचे स्वरूप नजरेस पडेल. असा सोवळ्या ओवळ्या पलीकडचा देव सर्वांना भेटावा, हीच तळमळ चोखोबांच्या या अभंगातून प्रगट होत आहे. 

आपण जी बंधने किंवा नियम पाळतो ते आपल्या मनाची शुचिर्भूतता व्हावी म्हणून! अंघोळ केल्यावर आपल्याला ताजेतवाने वाटते तसे भगवंतालाही वाटेल, आपल्याला ऊन, वारा, पावसाचा त्रास होतो, तसा देवालाही होत असेल, आपल्याला भूक लागते तशी देवालाही लागत असेल, हा भोळा भाव ठेवून भक्त आपल्याला आवडते ते देवालाही देतो. आणि देवालाही असा प्रेमळ भक्त आवडतो. कर्मकांड सुद्धा यासाठी की आपले मन त्यात एकाग्र व्हावे. यातले कोणतेही उपचार देवाला प्रसन्न करण्यासाठी नाही, तर देवपूजा करताना आपले मन प्रसन्न राहावे यासाठी आहेत. तुकाराम महाराज लिहितात, 'मन करा रे प्रसन्न साऱ्या सिद्धीचे कारण!' जीवाचा प्रवास शिवापर्यंत पोहोचवणारे मनच आहे, देह फक्त माध्यम आहे. पण देह शुद्ध असेल तरच मन शुद्ध राहील. ही शुद्धी केवळ पाण्याने किंवा साबणाने येणारी नाही तर आपले कर्म चांगले हवे, तरच देहशुद्धी आणि मनशुद्धी आपोआप होईल आणि देवाला या देहाचा विटाळ कधीच होणार नाही. 

Web Title: Know what Saint Chokhamela's strong opinion was about the concept of 'untouched days'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.