Birth Time Astrology: तुमचा जन्म रात्री १२ ते दुपारी १२ या वेळेत झालाय? पाहा, व्यक्तिमत्त्व, लाभ आणि मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 02:49 PM2022-04-27T14:49:44+5:302022-04-27T14:50:50+5:30
Birth Time Astrology: ज्योतिषशास्त्रात जन्मवेळेला अत्याधिक महत्त्व असते. त्यावरून अनेक गोष्टी बदलू शकतात. जाणून घ्या...
ज्योतिषशास्त्रात जन्म कुंडलीच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, गुण, आर्थिक स्थिती, कुटुंब, नोकरी, करिअर, विवाह, दाम्पत्य जीवन यांसारख्या अनेक गोष्टींचा अंदाज बांधला जाऊ शकतो. ज्योतिषशास्त्रात जन्म वेळ आणि जन्म स्थानाला विशेष महत्त्व आहे. कारण, त्यावरूनच योग्य कुंडली बनवली जाऊ शकते. त्यावेळेची ग्रहस्थिती, नक्षत्रे यांचा मानवी जीवनावर कसा प्रभाव पडू शकतो, याबाबत सांगता येऊ शकते. तुमचा जन्म रात्री १२ ते दुपारी १२ या वेळेत झाला असेल, तर अशा व्यक्तींचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, त्यांना मिळणारे लाभ, यश, प्रगती कशी असू शकेल, याबाबत काही गोष्टी सांगता येऊ शकतात. जाणून घेऊया... (Birth Time Astrology)
सदर कालावधीत तुमचा जन्म झालाय का?
- रात्री १२.३० पर्यंत जन्माला आलेल्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याची आवड असते. जगभरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती ते घेत असतात. या व्यक्ती विनाकारण दिखावा करत नाहीत. इतकच काय तर ते कोणती गोष्ट करण्यासाठी सक्षम आहेत ते उघडपणे सांगत नाही. त्यांच्यात नवीन गोष्टी लवकर आत्मसात करण्याची क्षमता असते. या व्यक्ती एकांतात राहणे पसंत करतात. कोणत्याही गोष्टीवर पटकन विश्वास ठेवत नाहीत.
- जर एखाद्या व्यक्तींचा जन्म मध्यरात्री २ ते पहाटे ४ या कालावधीत झाला असेल, तर या व्यक्ती संयमी आणि सौम्य स्वभावाच्या असतात. या व्यक्तींना विलासी जीवन जगायला आवडते. तसेच यशस्वी उद्दोजक होण्याची क्षमता या व्यक्तींमध्ये असते. या वेळेत जन्माला आलेले लोक २४ ते २७ या वयात भाग्यवान ठरतात.
- पहाटे ४ ते ६ या वेळेत जन्मलेले लोक जे काम हाती घेतात त्यावर लक्ष केंद्रित करतात. ते आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात आणि त्यांना आव्हाने स्वीकारायला आवडतात. त्यांच्या आजुबाजूला असलेले लोक नेहमीच त्यांची स्तुती करतात. ते प्रामाणिक आणि त्यांच्या तत्त्वाने कोणत्याही गोष्टीचे नेतृत्त्व करतात.
- पहाटे ६ ते सकाळी ८ या कालावधीत जन्मास आलेल्यांचा जन्म हा नेतृत्व करण्यासाठी झाला असे म्हटले जाते. या लोकांचे रहस्यमय व्यक्तिमत्व असते. ते लोकांच्या मनावर वर्चस्व गाजवतात. ते जे काम करतात त्यात सर्वोत्कृष्ट असण्यासाठी ते प्रचंड मेहनत घेतात. त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक अडथळ्यांमुळे ते प्रबळ इच्छाशक्तीचे व्यक्ती होतात. त्यांचा तापट स्वभाव असतो म्हणून त्यांनी स्वत: ला शांत ठेवण्यासाठी प्राणायम करायला पाहिजे.
- सकाळी ८ ते १० या कालावधीत जन्मलेले लोक तत्वज्ञ असतात. ते एकांतात राहणे पसंत करतात. त्यांना भांडणापासून लांब रहायला आवडते. पण त्यांना पाहिजे तेव्हा ते हट्टी होतात. इतर लोकांना काय हवे आणि काय नाही याची त्यांना काळजी असते. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या भेटी-गाठी घेणे यांना आवडते.
- सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत जन्मलेले लोकांना वेगवेगळ्या लोकांसोबत राहायला आवडते ते आशावादी असतात. हे लोक शिस्तबद्ध आणि संवेदनशील असतात. त्यांची ताकद आणि ते कोणत्या गोष्टीत कमजोर आहेत, हे त्यांना माहीत असते. ते चांगल्या प्रकारे लोकांचे नेतृत्त्व करतात. हे लोक कलात्मक क्षेत्रात चांगले काम करण्यासाठी ओळखले जातात.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमची जन्मवेळ, जन्म ठिकाण आणि तुमच्यावरील प्रभाव, परिणाम यासंदर्भात ज्योतिषीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत उपयुक्त ठरू शकेल.