Mahabharata: महाभारत युद्धात एका क्षणी हनुमान-कर्ण आले आमनेसामने; श्रीकृष्ण मधे पडले नसते तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 08:33 PM2021-06-25T20:33:59+5:302021-06-25T20:44:16+5:30
महाभारत युद्धात असा एक क्षण आला की, हनुमंत आणि कर्ण एकमेकांसमोर उभे ठाकले. हनुमंत कसे शांत झाले? श्रीकृष्णांनी कशी मध्यस्थी केली? जाणून घेऊया...
संपूर्ण महाभारत नीती, तत्त्वज्ञान, कुरघोडी, राजकारण, पराक्रम, शौर्य, संयम, धर्म या गोष्टींनी भारलेले आहे. कलियुगाची सुरुवात होण्याच्या ६ महिने आधी मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला महाभारताच्या युद्धाचा आरंभ झाला होता, ते १८ दिवस चालले होते. सप्तचिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त असलेले हनुमंत श्रीरामाच्या आज्ञेवरून पुढील अवतार असलेल्या श्रीकृष्णांच्या सेवेला सदैव हजर असायचे, असे सांगितले जाते. हनुमंतांना कोणतेही शस्त्र भेदणार नाही, असे वरदान असल्यामुळे श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून हनुमंत अर्जुनाच्या रथाच्या वरील भागात विराजमान झाले होते. मात्र, महाभारत युद्धात असा एक क्षण आला की, हनुमंत आणि कर्ण एकमेकांसमोर उभे ठाकले. हनुमंत कसे शांत झाले? श्रीकृष्णांनी कशी मध्यस्थी केली? जाणून घेऊया...
महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावर बसलेले हनुमान मधेच उभे राहून कौरवांच्या सैन्यावर टक लावून पहायचे. हनुमंतांची नजर पडताच कौरवांचे सैन्य वादळाच्या वेगाने रणांगण सोडून पळून जायचे. महाभारतात हनुमंतांनी कोणाशीही युद्ध केले नाही. आपल्या आराध्यांचे रक्षण करणे, हेच प्रमुख कर्तव्य ते बजावत होते. हनुमान प्रचंड पराक्रमी आणि अतिशय बुद्धिमान होते. महाभारतात त्यांची जबाबदारी अतिशय निराळी होती.
आत्मविश्वास वाढवण्यासाठी या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा आणि आचरणात आणा!
कर्णाच्या बाणांमुळे श्रीकृष्णाचे सुरक्षा कवच मोडून पडले
अर्जुनापुढे कुणाचाच टिकाव लागत नव्हता. अखेर कर्ण आणि अर्जुन यांच्यात युद्ध सुरू झाले. कर्ण अर्जुनावर एकसारखा अत्यंत भयंकर बाणांचा वर्षाव करत होता. त्यातील काही बाण श्रीकृष्णालाही लागत होते. कर्णाच्या बाणांमुळे श्रीकृष्णाच्या अंगांवरील सुरक्षा कवच मोडून पडले. त्यामुळे काही बाण श्रीकृष्णाला लागत होते. रथाच्या वरील बाजूस बसलेले हनुमान आपले आराध्य श्रीकृष्णाकडे पाहत बसले होते. अखेर एका क्षणी हनुमानाला हे सहन नाही झाले आणि हमुमानाने भयंकर मोठी गर्जना केली.
मधल्या बोटात अंगठी घालावी की घालू नये? ज्योतिषशास्त्र काय सांगते?
हनुमंता, राग प्रकट करण्याची योग्य वेळ नाही
हनुमानाने केलेल्या भयंकर गर्जनेमुळे विश्वाचा स्फोट झाला, असेच काही क्षण वाटू लागले होते. हनुमंतांचा क्रोध पाहून कर्णाच्या हातातील धनुष्यबाण खाली पडले. हे पाहून श्रीकृष्ण ताबडतोब उठले. हात उंचावत हनुमंतांना केवळ स्पर्श केला. श्रीकृष्ण म्हणाले की, हनुमंता, तुझा राग प्रकट करण्याची ही योग्य वेळ नाही. श्रीकृष्णांच्या सांगण्यावरूनही हनुमंतांचा राग शांत होत नव्हता.
विचार बदला, नशीब बदलेल...तुमचेही व इतरांचेही; वाचा ही मजेशीर गोष्ट!
केवळ तुझ्या दृष्टीचा सामनाही कर्ण करू शकत नाही
कर्णाच्या कृतीमुळे हनुमंत खूपच नाराज झाले होते. कर्णाकडे हनुमान नजर रोखून पाहात होते. तेवढ्यात श्रीकृष्ण मोठ्याने ओरडून हनुमंतांना म्हणाले की, हनुमाना, जर आणखी काही काळ तू असेच कर्णाकडे पाहत बसलास तर कर्ण तुझ्या दृष्टीरोखानेच मारला जाईल. या युद्धात मी तुला शांत बसण्यास सांगितले आहे.
शुक्र-मंगळाचा कर्क राशीत संयोग; ‘या’ ८ राशींना उत्तम लाभदायक
हनुमंत भानावर येऊन नतमस्तक झाले
हनुमाना, तुझ्या पराक्रमाला तोड नाही. मात्र, हे त्रेतायुग नाही, श्रीकृष्णाचे हे शब्द ऐकताच हनुमान एकदम भानावर आले. ते शांत झाले आणि पुन्हा रथाच्या वरच्या भागावर जाऊन बसले. महाभारत युद्धात हनुमंतांमुळे अर्जुनाला कोणतीही इजा झाली नाही. त्रेतायुगाप्रमाणे, द्वापारयुगातही हनुमानाने अप्रत्यक्ष पराक्रमातून आपल्या आराध्याचे संरक्षणच केले. महाभारताचे संपूर्ण युद्ध संपल्यावर श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून हनुमान रथ सोडून खाली आले आणि अर्जुनाचा रथ एका क्षणात भस्म झाला, असे सांगितले जाते.