Kojagiri Purnima 2022 : ऐश्वर्यप्राप्तीसाठी कोजागरीला करतात गजपूजाविधी व्रत; कसे ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 03:13 PM2022-10-06T15:13:56+5:302022-10-06T15:14:31+5:30

Kojagiri Purnima 2022 : कोजागरीला लक्ष्मी मातेच्या आराधनेसाठी हा व्रतविधी जरूर करा आणि गरबा खेळून रात्रीचा जागर करा!

Kojagiri Purnima 2022 : Gajpujavidhi Vrat is performed at Kojagiri to get wealth; Learn how! | Kojagiri Purnima 2022 : ऐश्वर्यप्राप्तीसाठी कोजागरीला करतात गजपूजाविधी व्रत; कसे ते जाणून घ्या!

Kojagiri Purnima 2022 : ऐश्वर्यप्राप्तीसाठी कोजागरीला करतात गजपूजाविधी व्रत; कसे ते जाणून घ्या!

Next

हदगा किंवा भोंडला हा आश्विन मासात मुलींनी करावयाचा कुळाचाराचाच प्रकार आहे. पण हा कुळाचार एखाद्या विशिष्ट घराण्याचा नसून मुली-मैत्रीणी यांनी एकत्र जमून साजरा करावयाचा सांघिक कुळाचार आहे. नवरात्रीपासून कोजागरी पर्यंत पंधरा दिवस हा खेळ रंगतो. ज्यांना नवरात्रीत हा  खेळ खेळता आला नाही, त्यांनी कोजागरीला एकत्र जमून हदगा किंवा भोंडला अवश्य खेळा. त्यासाठी सविस्तर माहिती जाणून घ्या. 

आश्विन मासामध्ये हस्त नक्षत्राला प्रारंभ झाला की त्या दिवसापासून नंतरचे सोळा दिवस अगर नवरात्राचे दहा दिवस हदगा साजरा करतात. एका पाटावर तांदळाने किंवा खडूने हत्ती काढतात व त्याभोवती मुली फेर धरून 'ऐलमा पैलमा गणेशदेवा' वगैरे भोंडल्याची गाणी म्हणतात. नंतर जिच्या घरी भोंडला असेल, ती पातेल्यात झाकून खिरापत घेऊन येते. ती खिरापत काय असेल हे इतर मुलींनी ओळखायचे असते. ते जोपर्यंत ओळखले जात नाही, तोपर्यंत खिरापत वाटली जात नाही.

पाटावर हत्ती काढतात तसे काही ठिकाणी हदग्याच्या झाडाची फांदी उभी करून त्याभोवती फेर धरण्याची प्रथा आहे. हदगा हा एक पावसाचा उत्सव आहे. हस्त नक्षत्रातील पाऊस हा गड, गड, गड असा आवाज करत पडतो. पण खरे तर हे पावसाळ्याच्या अखेरचे दिवस असतात. नवरात्रात मुसळधार पाऊस पडल्यानंतर सूर्याचा लख्ख प्रकाशही अनेक वेळा पडतो. आकाशात इंद्रधनुष्य दिसू लागते. पावसाचे पाणी प्यायल्यामुळे पृथ्वी हिरवागार शालू परिधान करावी तशी दिसू लागते. 

हत्ती हे वैभवाचे प्रतीक व लक्ष्मीचे वाहन आहे. कोजागरीच्या रात्री हत्तीची पूजा करून किंवा पाटावर तांदूळाचा हत्ती काढून त्याला दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. पाटाभोवती फेर धरून भोंडला खेळला जातो. दूध आटवले जाते. त्यात पौर्णिमेच्या चंद्राची किरणे पडली की ते आटीव दूध नैवेद्य म्हणून सर्वांना दिले जाते. 

हस्त नक्षत्रातील पावसाला खूप महत्त्व आहे. `पडतील हत्ती तर पिकतील मोती' असे म्हटले जाते. अर्थात पाऊस पुरेसा पडला तर धनधान्य मिळेल आणि हत्तीच्या सोंडेने लक्ष्मीकृपा होईल व वैभवलक्ष्मी कृपाशिर्वाद देईल. असे हे व्रत गजपूजाविधी म्हणून करा किंवा भोंडल्याची खेळ म्हणून करा, लक्ष्मीची कृपा होईलच!

Web Title: Kojagiri Purnima 2022 : Gajpujavidhi Vrat is performed at Kojagiri to get wealth; Learn how!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.