Kojagiri Purnima 2022 : बायकोने आपले ऐकावे असे ज्या नवऱ्यांना वाटते, त्यांनी कोजागरी पौर्णिमा कहाणी वाचाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 03:03 PM2022-10-06T15:03:04+5:302022-10-06T15:03:20+5:30

Kojagiri Purnima 2022 : नोकरी, व्यवसाय किंवा संसार उत्तमरीत्या करायचा असेल जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवायला हवा, हे शिकवणारी पौराणिक कथा!

Kojagiri Purnima 2022 : Husbands who want their wives to listen to them must read the Kojagiri Purnima story! | Kojagiri Purnima 2022 : बायकोने आपले ऐकावे असे ज्या नवऱ्यांना वाटते, त्यांनी कोजागरी पौर्णिमा कहाणी वाचाच!

Kojagiri Purnima 2022 : बायकोने आपले ऐकावे असे ज्या नवऱ्यांना वाटते, त्यांनी कोजागरी पौर्णिमा कहाणी वाचाच!

Next

नवरात्रीप्रमाणे शरद पौर्णिमेला म्हणजेच काजागरी पौर्णिमेला लक्ष्मी स्वरूपातील देवीची पूजा केली जाते. या रात्री कोण जागृत आहे, हे लक्ष्मी पाहते. आणि जी व्यक्ती आपल्या कर्तव्याप्रती, वचनाप्रती, धर्माप्रती जागृत असते तिच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते. ९ ऑक्टोबर रोजी रविवारी कोजागरी पौर्णिमा आहे, त्यानिमित्त डोळ्यात अंजन घालणारी ही पौराणिक कहाणी!

लक्ष्मी म्हणजे शोभा. ती अनेक प्रकारची असते. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, सौंदर्यलक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे. सर्व प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी, झोपाळू माणूस समोर असलेल्या लक्ष्मीलाही प्राप्त करू शकत नाही. यासंदर्भात कोजागरी व्रताची कथा प्रसिद्ध आहे. 

वलित नावाचा मगध देशाचा एक विद्वान ब्राह्मण स्वत:च्या आळशी वृत्तीमुळे निर्धन बनला होता. त्याच्या निर्धनतेला कंटाळलेली त्याची पत्नी अर्थात गृहलक्ष्मी त्याच्यावर नाराज असे. त्याची एकही गोष्ट मानीत नसे. एवढेच नाही तर पती जे सांगेल त्याच्या अगदी उलट वागत असे. 

गणपती नावाच्या त्याच्या मित्राने त्याला एक सल्ला दिला, की तुला पत्नीकडून जे करून घ्यायची इच्छा असेल तर त्याच्या उलटच तू तिला सांग. विपरित आचरणाचे व्रत घेतलेली तुझी पत्नी तू सांगशील त्याच्या उलट करील आणि तुझ्या मनाला योग्य वाटते तसे होईल. 

गणपतीच्या सल्ल्यानुसार वलितने उलटे उलटे बोलून स्वत:च्या पत्नीकडून आपल्या वडिलांचे श्राद्ध करायचे वदवून घेतले आणि तसे केले. पण शेवटी आनंदात येऊन पिंड विसर्जन करण्याच्या क्रियेच्या वेळी तो उलटे बोलायला विसरला. तो म्हणाला, 'पिंड गंगेत सोडायचे.' त्याच्या पत्नीने विरुद्ध वर्तन केले, 'पिंड गटारात टाकायचे.' क्षणिक चुकीने कार्य बिघडवून टाकले. 

गोष्टीचे सार हेच सांगते, की छोटीशी चूक सुद्धा महाग पडू शकते. म्हणून सदैव जागृत असले पाहिजे. कोजागरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव. आपल्या आयुष्यातील चंद्र शीतल प्रकाश देत राहावा आणि लक्ष्मी मातेचा वरदहस्त कायम राहून वैभवलक्ष्मी व गृहलक्ष्मी सदैव प्रसन्न राहावी असे वाटत असेल, तर सदैव जागृततेने प्रत्येक काम करा!

Web Title: Kojagiri Purnima 2022 : Husbands who want their wives to listen to them must read the Kojagiri Purnima story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.