Kojagiri Purnima 2022 : कोजागरी पौर्णिमेला चांदीच्या वाटीतून दुधाचा नैवेद्य दाखवण्यामागचे शास्त्रीय कारण जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 12:48 PM2022-10-07T12:48:29+5:302022-10-07T12:49:18+5:30
Kojagiri Purnima 2022 : कोजागिरीला मसाला दुधाचा आस्वाद जरूर घ्या, त्याआधी त्या दिवशीचे त्याचे महत्त्वही जाणून घ्या!
कोजागरी पौर्णिमेला चंद्राला दुध-साखरेचा नैवेद्य दाखवतात. त्यात चंद्राची किरणे पडली की ते दूध नैवेद्य म्हणून सर्वांना देतात. हे दूध मुख्यत्त्वे चांदीच्या वाटीतून देतात. यामागे कोणती कारणे आहेत ते जाणून घेऊ.
>> ज्योतिषांच्या मते, संपूर्ण वर्षात फक्त या दिवशी चंद्र सोळा कलांनी फुललेला असतो. त्यावेळेस त्याच्यातून निघणारी किरणे अमृतासमान असतात. ती किरणे दुधात मिसळल्यामुळे दुधाची पौष्टिकता अधिक वाढते. म्हणून कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध किंवा खीर ठेवतात.
>> असे मानले जाते की हे दूध किंवा खीर सेवन केल्याने कुंडलीतील चन्द्रदोष दूर होतात. म्हणून चंद्रकिरण मिश्रित दुधाचे या रात्री सेवन केले जाते.
>> सूर्यकिरणांप्रमाणे चंद्राची किरणेही शरीरास उपयुक्त असतात. म्हणून कोजागरीला नैवेद्य म्हणून ठेवलेले दूध प्राशन केल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते व सुदृढ आरोग्य लाभते.
>> शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या रात्री चंद्राच्या किरणांमध्ये औषधी गुणांचे प्रमाण सर्वाधिक असते. यासाठी शुभ्र किरणे शोषून घेण्याची क्षमता शुभ्र दुधात असल्यामुळे चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवतात.
>> चंद्र, चांदणे, दूध, पोहे, साखर सर्वच पांढरे आहेत म्हणून कोजागरी पौर्णिमा हा धवलरंगी उत्सव म्हणून गणला जातो.
>> चन्द्रप्रकाश मानवी देशासाठी उपयुक्त असतो. विशेषतः तापट लोकांनी चन्द्र प्रकाशात सफर केली असता त्यांना आल्हाददायी वाटते आणि मन शांत होते. अशा शांत वेळी गरम दूध तना मनाला उभारी देते.
>> काही जण दुधाऐवजी तांदुळाची खीरसुद्धा नैवेद्य म्हणून ठेवतात. ती देखील पौष्टिक असल्याने उत्सवाची लज्जत वाढवणारी ठरते.
>> चांदी हा धातू शरीरासाठी फायदेशीर असतो. तसेच चन्द्र किरणे शोषून घेण्याची क्षमता त्यात अधिक असल्याने दूध किंवा खिरीचा नैवेद्य चांदीच्या वाटीतून दाखवला जातो.
>> असे मानले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री आकाशातून अमृताचा वर्षाव होतो. चंद्रदेव त्याच्या अमृत किरणांनी पृथ्वीवर त्याच्या शीतलता आणि पोषण शक्तीचा अमृत वर्षाव करतात. तो आनंद लुटण्यासाठी मोकळ्या आकाशाखाली किंवा गच्चीत जमून एकत्रपणे हा उत्सव साजरा करायचा असतो.
चंद्राला दाखवलेल्या दुधाच्या किंवा खिरीच्या नैवेद्याला नैवेद्यत्व प्राप्त झाल्याने त्याची लज्जत कैक पटींनी वाढते आणि त्याची गोडी उत्सवाचा आनंद द्विगुणित करते. म्हणून तुम्ही सुद्धा ही अनुभूती अवश्य घ्या आणि कुटुंब व मित्रपरिवारासमवेत कोजागरी साजरी करा!