Kojagiri Purnima 2023: कोजागिरीला जो जागा राहतो त्यावरच लक्ष्मी प्रसन्न होते; जागरण कसे असावे ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 07:00 AM2023-10-26T07:00:00+5:302023-10-26T07:00:00+5:30

Kojagiri Purnima 2023: कोजागिरी पौर्णिमेला जागरण करतात ते लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळावा म्हणून, पण हे जागे राहणे कसे असायला हवे ते जाणून घ्या!

Kojagiri Purnima 2023: Goddess Lakshmi sees who is awake at kojagiri night and give blessings to them; Read on! | Kojagiri Purnima 2023: कोजागिरीला जो जागा राहतो त्यावरच लक्ष्मी प्रसन्न होते; जागरण कसे असावे ते जाणून घ्या!

Kojagiri Purnima 2023: कोजागिरीला जो जागा राहतो त्यावरच लक्ष्मी प्रसन्न होते; जागरण कसे असावे ते जाणून घ्या!

अश्विन शुद्ध पौर्णिमेला 'कोजागिरी पौर्णिमा' म्हणतात. यंदा २८ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा आहे. त्या रात्री लक्ष्मी पूजन करायचे असते व रास-गरबा खेळत रात्रभर जागरण करायचे असते. त्या रात्री देवी लक्ष्मी येऊन पाहते, `कोण जागे आहे?' जो जागत असेल, त्याला देवीचा आशीर्वाद मिळतो आणि खुद्द लक्ष्मीचा वरदहस्त म्हणजे धनसंपत्तीचा वर्षाव! हे महत्त्व लक्षात घेऊन अनेक जण कोजागिरी पौर्णिमेचे व्रत करतात.

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव! जागे राहणे म्हणजे केवळ झोपलेले नसणे, हा त्याचा अर्थ नाही. तसे जागरण तर आपण रोजच करतो. परंतु, आपल्या कर्तव्याप्रती, धर्माप्रती, संस्कृतीप्रती, जागृत असणे. अशा जागृत माणसालाच लक्ष्मी प्राप्त होते. आळशी, प्रमादी, झोपाळू माणसापासून लक्ष्मी दूर जाते. 

कोजागिरी पौर्णिमेला चंद्र सोळा कलांनी फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो. संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. चातुर्मासात मेघ भरलेले असल्यामुळे चंद्रदर्शन होत नाही. त्यामुळे पाऊस गेल्यानंतरच्या निरभ्र आकाशात चंद्र अधिक आकर्षक वाटतो. 

चंद्राजवळ सुंदरता आणि शीतलता आहे. ती आपल्याही आयुष्यात यावी, हा चंद्रदर्शनाचा हेतू. आपल्या सभोवताली अशी शांत वृत्तीचे लोक विंâवा संतवृत्तीचे लोक असतील, तर आपण त्यांच्या सहवासात रमतो. त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करतो. चंद्रदर्शनही असेच विलोभनीय असते. कोजागिरीनिमित्त त्याच्या सान्निध्यात वेळ घालवणे, हे निमित्त! त्यानिमित्ताने खाण्याचे-गाण्याचे कार्यक्रम रंगतात. चंद्रावर आधारित गाण्यांनी वातावरणात आणखीनच प्रसन्नता येते. 

लक्ष्मीचे वाहन हत्ती असल्यामुळे पाटावर रांगोळी किंवा तांदुळाने हत्ती रेखाटून त्याला हळद-कुंकू वाहिले जाते. फुले , हार वाहिले जातात. श्रीसुक्त किंवा देवीचे स्तोत्र म्हटले जाते. देवीला आणि चंद्राला दुधसाखरेचा नैवेद्य दाखवला जातो. चंद्रकिरणे दुधात पडल्यावर तो प्रसाद सर्वांना वाटला जातो. दुधाच्या जोडीला पोह्यांचा बेत ठेवला जातो. पूजा झाली, की देवीचा श्लोक म्हणून पूजेची सांगता केली जाते.

अश्विने शुद्धपक्षे तु भवेद्या चैव पूर्णिमा
तद्रात्रौ पूजनं कुर्याच्छ्रियो जागृतिपूर्वकम्
निशीये वरदा लक्ष्मी: को जागतीरति भाषिणी
जगति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनी
तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महितले।।

‘रांधा, वाढा आणि उष्टी काढा’, या जीवनसूत्रात अडकलेल्या स्त्रियांना या सणांच्या निमित्ताने थोडीशी विश्रांती, मनोरंजन, पोटभर गप्पा आणि खिरापतीची मेजवानी. 

Web Title: Kojagiri Purnima 2023: Goddess Lakshmi sees who is awake at kojagiri night and give blessings to them; Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.