Konkan Temple: कोकणातला 'सोन्याचे दागिने देणारा तलाव' तुम्हाला माहित आहे का? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 01:05 PM2024-08-14T13:05:04+5:302024-08-14T13:06:06+5:30

Konkan Temple : कोकण मुळातच निसर्गाने समृद्ध, त्यातच 'सोन्याचे दागिने देणारा' तलावही तिथे आहे म्हटल्यावर उत्सुकता वाढणारच; सविस्तर वाचा. 

Konkan Temple: Do you know the 'jeweled lake of gold' in Konkan? Read on! | Konkan Temple: कोकणातला 'सोन्याचे दागिने देणारा तलाव' तुम्हाला माहित आहे का? वाचा!

Konkan Temple: कोकणातला 'सोन्याचे दागिने देणारा तलाव' तुम्हाला माहित आहे का? वाचा!

मालवणमधील काळसे धामापूर या गावी आहे 'सोन्याचे दागिने देणारा तलाव!' वाचून आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. पण कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी या तलावासंबंधीची माहिती शेवटपर्यंत वाचा.

धामापूर तलावाच्या शेजारीच जवळजवळ पाचशे वर्षे जुने देवी भगवतीचे भव्य मंदिर आहे. या मंदिराबाबत पिढ्यान् पिढ्या एक अद्भूत आख्यायिका गावात प्रचलित आहे. परडीतल्या दागिन्यांची आख्यायिका! गावातील कोणत्याही घरी लग्नकार्य असले पण आर्थिक अडचणींमुळे सोन्याचे दागिने घालण्याची परिस्थिती नसली की अशी कुटुंब देवीआईकडे मागणे मागयचे…आपल्या अंगणातून परडीभर फुले आणून देवीला वाहायचे. देवीला मनोभावे नमस्कार करून दिलेले दागिने पुन्हा परत करण्याची शपथ घ्यायचे आणि ती परडी तलावात सोडून द्यायचे…दुसऱ्या दिवशी सकाळी ती परडी पाण्यात तरंगत राहायची पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या परडीत फुलांच्या जागी चक्क सोन्याचे दागिने असायचे. हे दागिने वापरून झाले की लोक पुन्हा ते दागिने भरलेली परडी तलावात नेऊन सोडायचे…परडीतले हे दागिने कुठून येतात, कुठे जातात हे आजही न उलगडलेले कोडेच आहे. देवी गावकऱ्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करते असे गावकरी मानतात.

आज धामापूर तलाव आणि देवी भगवतीचे मंदिर जरी तसेच असेल तरी परडीतल्या दागिन्यांची प्रथा मात्र बंद पडली. काही वर्षांपूर्वी गावातील एका व्यक्तीने सोन्याचे दागिने तलावातल्या परडीतून घेतले खरे परंतु पुन्हा तलावात आणून सोडले मात्र नाहीत… तेव्हापासून गावातील ही प्रथा बंद झाली… ज्याने दागिने चोरले तो पकडला गेला, त्याने चोरी कबूलही केली पण त्या दिवसापासून आजतागायत धामापूर गावात त्या कुटुंबाच्या वंशातील एकही व्यक्ती राहू शकलेली नाही असे येथील ग्रामस्थ सांगतात.

या कथेचा उल्लेख १८८० च्या 'गॅझेटिअर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या खंड १०' मध्ये केला आहे. आज तिथे तलाव आहे, मंदिर आहे. फक्त तो दागिने देणारा तलाव राहिला नाही. तरी त्या तलावाची ओळख मात्र तीच राहिली. मात्र भगवान परशुराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही निसर्ग संपन्न भूमी नैसर्गिक खजिन्यांनी भरलेली आहे. तिला आई भगवतीचा आशीर्वाद कायम राहू दे, एवढीच प्रार्थना!

Web Title: Konkan Temple: Do you know the 'jeweled lake of gold' in Konkan? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.