कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 03:23 PM2020-08-08T15:23:22+5:302020-08-08T15:24:09+5:30
ब्रह्माचा आनंदरुप, परमसुखरुप, ज्ञानमूर्ती, द्वंद्वापासून दूर, आकाशासारखा निर्लेप व सूक्ष्म, तत्त्वमसि, तोच तू आहेस - हे ईशतत्त्व तूच आहेस, त्याची अनुभूती हेच ज्याचे लक्ष्य आहे; अद्वितीय, नित्य, विमल, अचल, कोणत्याही भावाच्या पलीकडे, त्रिगुणरहित अशा सद्गरुला मी नमस्कार करतो..!
- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )
संत कबीरांनी भावपूर्ण अंतःकरणाने म्हटले आहे -
गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय ।
बलिहारी गुरुदेव को गोविंद दियो बताय ॥
कबीरांनी त्यांच्या ह्या दोह्यात गुरुची श्रेष्ठता स्पष्टरित्या आपल्या समोर मांडली आहे. गोविंद दाखविणारा गुरु हा गोविंदापेक्षा श्रेष्ठ आहे कारण त्याच्याशिवाय गोविंदाचा महिमा आपण कसा काय जाणू शकणार..? परंतु एक स्थिती अशी देखील येते की, गुरु आणि गोविंद यांच्यात शिष्याला भेदच कळत नाही. त्याचे अंतःकरण गाते -
'गुरु गोविंद उभे दोन्ही'
पण हा प्रश्न गोंधळात टाकीत नाही कारण गुरु आणि गोविंद मला 'पांडुरंग' भासतात.
असे असले तरीही कबीरांच्या ह्या दोह्यात एक दुसरे माधुर्य समजावलेले आहे. जरा वेगळ्या संदर्भात तो दोहा समजण्याचा प्रयत्न केला तर कबीर सांगतात की, गुरु आणि गोविंद ह्या दोघांपैकी कोणाला नमस्कार करु.? हा गोंधळ ज्यावेळी माझ्या मनांत निर्माण झाला त्यावेळी मी माझ्या गुरुदेवाला नमस्कार केला कारण त्यानेच मला गोविंद दाखविला. प्रभूकडे इशारा करून त्यानेच मला नमस्कार करायला सुचविले.
खरा गुरु हा नेहमी सर्वांचीच गोविंदनिष्ठा, ईश्वरनिष्ठाच वाढवित असतो..!
ब्रह्माचा आनंदरुप, परमसुखरुप, ज्ञानमूर्ती, द्वंद्वापासून दूर, आकाशासारखा निर्लेप व सूक्ष्म, तत्त्वमसि, तोच तू आहेस - हे ईशतत्त्व तूच आहेस, त्याची अनुभूती हेच ज्याचे लक्ष्य आहे; अद्वितीय, नित्य, विमल, अचल, कोणत्याही भावाच्या पलीकडे, त्रिगुणरहित अशा सद्गुरुला मी नमस्कार करतो..!
परंतु आजच्या ह्या काळात असा सद्गुरु मिळाला नाही तर..?
कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।
भगवान श्रीकृष्णाला गुरु बनवून त्याने दाखविलेल्या जीवन पंथावरुन चालणे हेच श्रेयस्कर आहे.
श्रीकृष्णाचा गीता संदेश वाचून, समजून, त्यावर विचार करून व आचरणात आणून घरोघरी घेऊन जायचा संकल्प करायचा. गावोगावी ह्या जगद्गुरुची आश्वासने पोचवून निद्रीस्तांना जागृत करायचे व मेलेल्यांना संजीवनी पाजायची.
ज्याने भारतीय संस्कृतीच्या वृक्षाला स्वतःच्या रक्त सिंचनाने वाढविले आहे, पोसले आहे अशा या जगद्गुरुचे आपणावर फार मोठे ऋण आहे. या ऋणाचा विचार करून कृतज्ञभावाने त्याचे कार्य करण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे. गीतेच्या ज्योतीने झोपडी झोपडी प्रकाशित करणाराच श्रीकृष्णाचा खरा उपासक होय.
खरी गुरुपूजा करता करता गुरुजीवनाचा गौरव आपल्या जीवनात प्रगटावा, हीच सद्गुरु व जगद्गुरु असलेल्या श्रीकृष्णचरणकमली प्रार्थना..!
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )