'मन से रावण जो निकाले राम उसके मन में है', राम आणि रावणातला भेद सांगताहेत कुमार विश्वास!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 11:11 AM2024-01-09T11:11:24+5:302024-01-09T11:19:43+5:30
रामाच्या चरित्राबद्दल भलभलत्या विषयांना, चर्चांना उधाण येत असताना रामायण अभ्यासक कुमार विश्वास रामाची व्यक्तिरेखा कशी मांडतात ते पहा!
अलीकडे नवीन ट्रेंड आले आहे, राम सोडून रावणाची पूजा करायची! रावण कितीही बलाढ्य असला, शक्तिशाली असला, वेद शास्त्रात पारंगत असला तरी तो अनीतीने, अधर्माने वागणारा होता, त्यामुळे त्याची पूजा सर्वार्थाने चूकच आहे. याउलट प्रभू रामचंद्र यांनी आपल्या बिकट काळात सुद्धा अनीती आणि अधर्माची वाट कधीच धरली नाही, नेहमी सत्याचाच मार्ग सोडला आणि याची पावती रावणाची पत्नी मंदोदरीने दिली, तो प्रसंग सांगताहेत प्रख्यात व्याख्याते कुमार विश्वास!
अनेक दिवस सुरू असलेले तुंबळ युद्ध दसऱ्याच्या दिवशी संपले आणि रामांनी रावणावर विजय मिळवला, तेव्हा वानरसेना जल्लोश करू लागली. मात्र श्रीराम एका खडकावर खिन्न मनस्थितीत बसले होते. एवढा रक्तपात झाला याची सल त्यांच्या मनाला टोचत होती. तेवढ्यात पावलांचा आवाज झाला आणि स्त्री आकृतीची सावली त्यांना दिसली. श्रीराम विनम्रतेने उठून उभे राहिले आणि त्यांनी झुकलेल्या नजरेनेच विचारले, 'या युद्धभूमीवर येणाऱ्या आपण कोण आहात माता?'
तेव्हा मंदोदरी म्हणाली, 'मी तीच दुर्दैवी स्त्री आहे, जिच्या पतीचा मृत्यू तुमच्या हातून झाला. मी रावण पत्नी मंदोदरी आहे.'
श्रीराम आणखीनच खजील झाले आणि क्षमा मागू लागले. रावण हा शूर वीर योद्धा होता, परंतु तो अधर्माने वागणारा असल्यामुळे त्याचा अंत करावा लागला अशी प्रांजळ कबुली श्रीरामांनी दिली आणि मंदोदरीची क्षमा मागितली.
मंदोदरी म्हणाली, 'हे होणार हे मला माहीत होतच, पण मी इथे आले ते वेगळ्या कारणासाठी! विश्वाला, देवाधिदेव महादेवाला जिंकून घेणारा माझा नवरा अशा कोणा पुरुषाच्या हातून मारला गेला हे मला बघायचं होतं. तुमचा जय आणि त्यांचा पराजय का झाला हे पाहण्यासाठी त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक होता हे जाणून घ्यायचं होतं.'
श्रीराम म्हणाले, 'माते, तुम्हाला उत्तर मिळालं का?'
मंदोदरी किंचित हसली आणि म्हणाली, 'हो मिळालं! रावणाकडे त्रिभुवनातल्या सर्वोत्तम पाच सौंदर्यवतींपैकी एक सुंदरी मी मंदोदरी होते. तरी त्याला वनवासी सीतेच्या सौंदर्याची भुरळ पडली. त्याने तिचं अपहरण केलं. तिला मिळवण्याची लालसा ठेवली याउलट तुम्ही परस्त्रीची नुसती सावली पाहूनही माते असा उल्लेख केलात, हा सद्गुणी विचारच तुम्हा दोघांमधला मुख्य फरक होता. जी व्यक्ती स्त्रीचा आदर, सन्मान करते तिला कोणीही हरवू शकत नाही. याउलट जी व्यक्ती स्त्रीचे अधःपतन करते, तिला कमी लेखते, त्रास देते, तिला या ब्राह्णडात कोणीही वाचवू शकत नाही!' म्हणूनच मनुस्मृतीत म्हटले आहे,
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।।
मग आता तुम्हीच ठरवा, तुमच्यात राम जिवंत आहे की रावण?