Kumbh mela 2025: येत्या काळात प्रयागराज येथे भरणार महाकुंभमेळा; पण कधी? ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 03:37 PM2024-10-17T15:37:33+5:302024-10-17T15:38:26+5:30
Kumbh Mela 2025: कुंभमेळा हा मोठा धार्मिक मेळा मानला जातो, त्यासाठी लाखो भाविक आमंत्रण न देताही ठरलेल्या वेळी ठरलेले ठिकाण गाठतात; त्याबद्दल जाणून घेऊ.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, योगी आदित्यनाथ यांनी रविवारी प्रयागराजमध्ये महाकुंभ २०२५ च्या लोगोचे अनावरण करून आगामी कुंभ महोत्सवाचे उद्घाटन केले. महाकुंभमेळा (Kumbh Mela 2025) हे लोकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. याला भारतीय संस्कृतीचा मोठा सोहळा म्हटले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या मेळाव्यासाठी अनेक साधू, योगी, तांत्रिक, मांत्रिक आणि भाविक न बोलवता, न सांगता लाखोंच्या संख्येने कुंभमेळ्यात हजर होतात. चला जाणून घेऊया त्यासंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.
येत्या वर्षी अर्थात २०२५ मध्ये, महाकुंभमेळा २०२५ च्या रूपाने जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आयोजित केला जाणार आहे, त्यासाठी फक्त काही महिने उरले आहेत. ६ ऑक्टोबर २ ०२४रोजी, प्रयागराजमध्ये उत्तर प्रदेशच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाकुंभच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
कुंभ उत्सवाला स्नान, दान, ज्ञानमंथन अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पूर्वतयारी करावी लागते. महाकुंभाला बौद्धिक, पौराणिक, ज्योतिषशास्त्रीय तसेच वैज्ञानिक आधार आहे. प्रयागराजमध्ये दर बारा वर्षांनी कुंभ महोत्सव आयोजित केला जातो, त्याच्या लोकप्रियतेमुळे दर बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभ उत्सवाला महाकुंभ असे म्हणतात.
महाकुंभमेळ्याच्या मुख्य तारखा जाणून घेऊ :
⦁ पौष पौर्णिमा - १३ जानेवारी २०२५, सोमवार, कुंभमेळा प्रारंभ
⦁ मकर संक्रांति - १४ जानेवारी २०२५, मंगळवार, शाही स्नान
⦁ मौनी अमावस्या - २९ जानेवारी २०२५, बुधवार, शाही स्नान
⦁ बसंत पंचमी - ३ फेब्रुवारी २०२५, सोमवार, शाही स्नान
⦁ माघ पौर्णिमा - १२ फेब्रुवारी २०२५, बुधवार, शाही स्नान
⦁ महाशिवरात्रि - २६ फेब्रुवारी २०२५, बुधवार, शाही स्नान
देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे प्रयागराज भूमीवर कोणत्याही आवाहनाशिवाय किंवा निमंत्रण न देता महाकुंभमेळ्यात आगमन होणार आहे, हे नक्की! प्रयागराजच्या पवित्र भूमीत कुंभमेळा भरणे आणि त्यात सहभागी होणे, भक्तांच्या लेखी महत्त्वाचे असते. त्यात सहभागी होणारे स्वतःला धन्य समजतात.
पद्मपुराणानुसार कुंभोत्सवाच्या दिव्य संगमाच्या वेळी प्रयागराजमध्ये स्नान करणाऱ्या भाविकांना जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते, म्हणून या पवित्र ठिकाणी जाऊन स्नान, दर्शन आणि दान केल्याने भाविकांना पुण्य लाभ होतो. कुंभ राशीची गणना तीन प्रमुख ग्रहांच्या आधारे केली जाते. कालचक्रमध्ये ग्रहांचा राजा, सूर्य, राणी चंद्र आणि ग्रहांचा गुरू गुरू याला महत्त्वाचे स्थान आहे. या तीन ग्रहांचे विशिष्ट राशींमध्ये होणारे संक्रमण हा कुंभ उत्सवाचा मुख्य आधार असतो. प्रयागराजमध्ये, गुरु वृषभ राशीत आणि सूर्य मकर राशीत असल्याने, माघ महिन्यातील अमावस्येच्या दिवशी चंद्राचा मकर राशीत प्रवेश हा अत्यंत दुर्मिळ योगायोग निर्माण करतो.