Kurma Jayanti 2024: भगवान विष्णूंनी कूर्म अर्थात कासवाचा अवतार का घेतला, हे जाणून घेत करूया विष्णू उपासना! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 07:00 AM2024-05-23T07:00:00+5:302024-05-23T07:00:02+5:30

Kurma Jayanti 2024: २३ मे रोजी कूर्म जयंती आहे, त्यानिमित्त विष्णूंच्या मुख्य पाच श्लोकांचे पठण करून आपणही मानस पूजा करूया. 

Kurma Jayanti 2024: Let's know why Lord Vishnu took the incarnation of Kurma or turtle, let's worship Vishnu! | Kurma Jayanti 2024: भगवान विष्णूंनी कूर्म अर्थात कासवाचा अवतार का घेतला, हे जाणून घेत करूया विष्णू उपासना! 

Kurma Jayanti 2024: भगवान विष्णूंनी कूर्म अर्थात कासवाचा अवतार का घेतला, हे जाणून घेत करूया विष्णू उपासना! 

भगवंताने वेळोवेळी संत सज्जनांच्या रक्षणासाठी अवतार घेतला आणि दुर्जनांचे हनन केले. कूर्म अवतारदेखील भगवंताने पृथ्वीचा भार पेलण्यासाठी वापरला. भगवंताच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार हा कूर्मअवतार मानला जातो. इतर अवतारांमध्ये कोणत्या न कोणत्या दैत्याच्या संहारासाठी भगवंतांनी अवतार घेतल्याच्या कथा आहेत. मात्र कूर्मावताराचे कारण वेगळे आहे. भागवत  पुराणानुसार समुद्रमंथनाच्यावेळी मंदारपर्वत पाताळात गेला त्यावेळ भगवंतांनी कूर्मरूप घेऊन त्याला वर उचलून आपल्या पाठीवर घेतले. नंतर कूर्मरुपातील भगवंत क्षीरसागरात शयन करते झाले.

शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् , विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् | लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् , वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ||
अर्थ : क्षीरसागरात शेषशय्येवर भगवान महाविष्णू पहुडले आहेत. ते विश्वाचा आधार आहेत आणि सर्व विश्वावर लक्ष ठेवून आहेत. ते लक्ष्मीपती आहेत, आपल्या कमल नयनांनी विश्वाकडे कारुण्याने, ममत्वतेने पाहत आहेत. त्यांचा रंग सावळा आहे, परंतु, त्या रंगात अखिल विश्व सामावले आहे. अशा महाविष्णूंना माझा नमस्कार असो.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।। 
भगवान महाविष्णूंनी समस्त जीवांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तरी सुद्धा आपण देवावर भार टाकून मोकळे होत नाहै, त्यावर भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला उपदेश करतात, जो अनन्यभावे मला शरण येतो, त्याच्या हाकेला मी नेहमी धावून जातो आणि त्याचा योगक्षेम म्हणजेच अन्न, पाणी, रोजगार मी पुरवतो।.

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा | बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् | करोमि यद्यत् सकलं परस्मै | नारायणायेति समर्पयामि ||
आरतीच्या शेवटी, घालीन लोटांगण म्हणून झाल्यावर आपण हा श्लोक म्हणतो. मात्र, त्याच्या अर्थाकडे आपले लक्ष जात नाही. विष्णूंची उपासना करण्याच्या निमित्ताने त्याचा अर्थ समजून घेऊया. काया, वाचा, मन, इंद्रिये, बुद्धी, आत्मा या सर्वांचा मेळ होऊन आमच्याकडून कळत-नकळत जे जे काही कार्य घडते, ते आम्ही नारायणाला अनन्यभावे समर्पित करतो.

ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि, तन्नो विष्णू: प्रचोदयात।।
याला 'विष्णू गायत्री' असे म्हणतात. अनेकांना 'ओम तत्सवितु: वरेण्यम' हा एकच सूर्य गायत्री मंत्र माहीत असतो. परंतु, अशा एकूण २४ गायत्री आहेत. पैकी एक, विष्णू गायत्री, जिचा जप आपण विष्णू उपासना म्हणून करू शकतो.

'ओम नमो भगवते वासुदेवाय'
सरतेशेवटी एक मंत्र, जो सहज, सोपा आणि अतिशय परिणामकारक आहे. अधिक मासात, जपाची एक वेळ ठरवून रोज त्याचवेळी नित्य उपासना केली, तर ती अधिक फलदायी ठरते. 'श्रीराम जय राम जय जय राम', 'ओम नम: शिवाय' या मंत्रांप्रमाणे महिनाभर सदर मंत्राचा १०८ वेळा जप करण्याचा संकल्प आपण सोडू शकतो.

Web Title: Kurma Jayanti 2024: Let's know why Lord Vishnu took the incarnation of Kurma or turtle, let's worship Vishnu!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.