भक्तीचा सोपान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 05:38 AM2020-06-18T05:38:24+5:302020-06-18T05:39:05+5:30
वारकरी संप्रदायाची परंपरा मूळ नाथ संप्रदायापासून सुरू झाली.
- प्रा.डॉ.प्रकाश खांडगे, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयक
वारकरी संप्रदायाची परंपरा मूळ नाथ संप्रदायापासून सुरू झाली.
आदिनाथ गुरूसकळ सिद्धांचा। मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य। मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला। गोरक्ष वळला गहिनी प्रति।
गहिनी प्रसादे निवृत्ती दातार।
ज्ञानदेव सार चोजविले।
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान,
मुक्ताबाई त्र्यंबकेश्वरी गहिनीनाथांना शरण गेले. नाथ संप्रदायाच्या निरंजनातून वारकरी संप्रदाय स्वयंप्रकाशी झाला आणि ज्ञानाला भक्तीचे कोंदण लाभले.
दिवेघाट चढून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोपानदेवांचे समाधिस्थान म्हणून पावन झालेल्या सासवडमध्ये पोहोचतो. सासवडला दोन बंधूंची प्रतीकात्मक भेट होते. कोरोनाने पालखी सोहळा रद्द झाल्याने यावर्षी ते शक्य नाही. ज्येष्ठ वद्य द्वादशीला माउली सासवडमध्ये विसावते
त्या वेळी त्रिवेणी योगायोग जुळून येतो. ज्येष्ठ वद्य द्वादशी हा संत निवृत्तीनाथांचा समाधी दिन.
या दिवशी त्र्यंबकेश्वरला समाधी सोहळ्याचा कार्यक्रम होऊ शकत नाही. कारण संत निवृत्तीनाथांसह सर्व संतांच्या दिंड्या, पालख्या पंढरीच्या वाटेवर असतात. त्यामुळे संत निवृत्तीनाथांचा समाधी दिन सासवडला साजरा करतात. या दिवशी कीर्तन, प्रवचनात आवर्जून निवृत्तीनाथांचे नामस्मरण केले जाते. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव यांना नैवेद्य दाखविले जातात. ज्येष्ठ वद्य द्वादशीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत सोपानदेवांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होते. यात ९०च्या वर दिंड्या असतात, असे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार राजभाऊ यांनी सांगितले.
सोपानदेवांनी गीतेच्या श्लोकांवर ‘सोपानदेवी’ हा ग्रंथ सिद्ध केला. सोपानदेवांची स्तुती करताना संत निवृत्तीनाथ म्हणतात -
नमो अगणितगुणा देवाधि देवा।
माझ्या सोपानदेवा नमन तुज।।
संवत्सर ग्राम करहा तटी उत्तम।
पुण्य पावन नाम सोपान देव।।
संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर वर्षभराच्या आतच १२९७ला सोपानदेवांनी सासवडला समाधी घेतली. त्यांनी सुमारे ५० अभंगांची रचना केली. संत एकनाथ महाराजांनी सोपानदेवांच्या समाधी सोहळ्याचे अतिशय भावोत्कट वर्णन केले आहे.
आनंद समाधि संत भक्त देव।
करिती उत्साह संवत्सरी।।
गरुड हनुमंत भक्त ते मिळाले।
जयजयकार केले सुरवरी।।
पुष्पांचा वर्षाव विमानांची दाटी।
सोपानदेवा भेटी येती देव ।।२
तो सुखसोहळा वर्णावया पार।
नोहेचि निर्धार माझी मती।।
एका जनार्दनी सोपान चरणी।
मस्तक ठेवूनि निवांत राहीन।।
संत सोपानदेवांना ब्रह्म अवतार समजले जाते. ‘ब्रह्म अवतार नाम हे सोपान। केले पावन चराचर’ असे संत निवृत्तीनाथांनी म्हटले आहे.