शेवटचा श्रावणी शनिवार: दुसरे शनिप्रदोष व्रत, शिवपूजनाने मिळतील विशेष लाभ; शनी कृपा होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 12:54 PM2024-08-30T12:54:52+5:302024-08-30T13:00:18+5:30

Shravan Shaniwar Second Shani Pradosh Vrat 2024: शेवटच्या श्रावणी शनिवारी दुसऱ्यांदा शनिप्रदोष व्रताचा शुभ योग जुळून आला आहे. जाणून घ्या...

last shravan shaniwar second shani pradosh vrat 2024 vrat puja vidhi and importance of shiva and shani puja on dusare shravan shani pradosh vrat 2024 in marathi | शेवटचा श्रावणी शनिवार: दुसरे शनिप्रदोष व्रत, शिवपूजनाने मिळतील विशेष लाभ; शनी कृपा होईल!

शेवटचा श्रावणी शनिवार: दुसरे शनिप्रदोष व्रत, शिवपूजनाने मिळतील विशेष लाभ; शनी कृपा होईल!

Shravan Shaniwar Second Shani Pradosh Vrat 2024: श्रावण महिना आता सांगतेकडे आला आहे. श्रावण मासाचा शेवटचा शनिवार ३१ ऑगस्ट रोजी आहे. श्रावणी शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन केले जाते. तसेच शेवटच्या श्रावणी शनिवारी शनिप्रदोष व्रत आहे. विशेष म्हणजे श्रावण महिन्यात दुसऱ्यांना शनिप्रदोष व्रत आचरले जाणार आहे. यामुळे या व्रताचे आणि शेवटच्या श्रावणी शनिवारचे महत्त्व वाढल्याचे सांगितले जात आहे. शनिप्रदोष व्रतात शनीदेव आणि महादेवांचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा प्रचलित आहे. दुसऱ्या शनिप्रदोष व्रताचे पूजन कसे करावे? महत्त्व अन् मान्यता जाणून घेऊया... 

३१ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण महिन्यात दुसऱ्यांदा शनिप्रदोष व्रताचरण केले जाणार आहे. शनिप्रदोष व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनिप्रदोष व्रत म्हणतात.

‘असे’ करावे शनिप्रदोष व्रत

प्रदोष व्रत प्रामुख्याने तिन्हीसांजेला दिवेलागणीला केले जाते. प्रदोष काळात शिवपूजन केले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते. यानंतर शनिदेवाची पूजा करावी, शनि चालिसा पठण करावे. पठण करणे शक्य नसल्यास श्रवण करावे. असे केल्याने शुभ फल प्राप्त होते. भगवान शंकराची कृपा प्राप्त होते, असे म्हटले जाते. शनि प्रदोष व्रताच्या दिवशी शनी देवाचे पूजन करण्यासह शनीदेवाचे मंत्र, श्लोक, स्तोत्रे पठण करणे अतिशय शुभ मानले जाते.

शनिप्रदोष व्रताचे महत्त्व अन् महात्म्य

शनीदेव महादेवांना आपले गुरु मानतात, अशी मान्यता प्रचलित आहे. त्यामुळे शनिप्रदोष दिवशी महादेवांचे पूजन करणे विशेष लाभदायी मानले गेले आहे. शनिप्रदोष व्रताचे पालन केल्याने शनीदेवाचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि हळूहळू सकारात्मकता येऊ शकते, असे म्हटले जाते. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशीही मान्यता आहे. शनिप्रदोष व्रत केल्यास समस्या, संकटे दूर होऊ शकतात. शनिदेवाच्या प्रतिकूल प्रभावापासून दिलासा मिळू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. आताच्या घडीला मकर, कुंभ आणि मीन या राशींची साडेसाती सुरू आहे. ज्या राशींची साडेसाती सुरू आहे, त्या व्यक्तींनी आवर्जून हे व्रत करावे, असा सल्लाही दिला जातो. 

साडेसातीत नेमके कसे करावे शनिप्रदोष व्रताचरण?

ज्या राशींची साडेसाती सुरू आहे, त्यांनी शनिप्रदोष व्रताचरण करताना महादेवांच्या शिवलिंगावर १०८ बेलपत्र आणि पिंपळाची पाने अर्पण करावीत. शनिवारी हे करणे शुभ मानले जाते. यासोबतच यथाशक्ती अन्नदान, शनीशी निगडीत वस्तुंचे दान करावे. शनिप्रदोष व्रताच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मूळाशी पाणी आणि दूध अर्पण करावे. शक्य असल्यास पाच प्रकारच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. पितरांचे स्मरण करून पिंपळाचे पूजन करावे. पिंपळाला प्रदक्षिणा घालून मनोभावे नमस्कार करावा. यानंतर हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण करावे किंवा श्रवण करावे, असे सांगितले जाते. 
 

Web Title: last shravan shaniwar second shani pradosh vrat 2024 vrat puja vidhi and importance of shiva and shani puja on dusare shravan shani pradosh vrat 2024 in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.