Last Solar Eclipse of 2021 : सूर्यग्रहणातील नियम पाळा आणि आरोग्यावरील दुष्परिणाम टाळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 05:08 PM2021-12-03T17:08:06+5:302021-12-03T17:08:33+5:30
Last Solar Eclipse of 2021 : वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण: सूर्यग्रहणावर राहूची सावली राहील. सूर्यग्रहण काळात अशुभ योग राहील. या ग्रहणाचा तुमच्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो, कसा ते जाणून घ्या.
वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण शनिवारी ४ डिसेंबर रोजी आहे. याच दिवशी शनी अमावस्यादेखील आहे. याशिवाय या ग्रहणावर राहूची सावलीही राहील. सूर्यग्रहणाच्या काळात सूर्यावर राहू आणि केतूचा प्रभाव अधिक असतो.त्याचे पडसाद पृथ्वीवरील जीवमात्रांवर पडतात म्हणून ग्रहण काळात आरोग्याची विशेष काळजी घ्या असा सल्ला दिला जातो.
भारतात ग्रहण दिसणार नाही, पण...
हे सूर्यग्रहण ४ डिसेंबर रोजी सकाळी १०. ५९ मिनिटांपासून ते दुपारी ०३.०७ मिनिटांपर्यंत राहील. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचा सुतक काळही वैध राहणार नाही. हे खग्रास सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अंटार्क्टिका, दक्षिण अटलांटिक महासागर आणि दक्षिण हिंदी महासागर यांसारख्या दक्षिण गोलार्धातील देशांमध्ये दिसणार आहे. या ग्रहणाचा परिणाम देश आणि जगावरही होणार आहे. ग्रहण दरम्यान, असे मानले जाते की याचा आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो. याचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो ते पाहूया.
अन्नावर परिणाम
ग्रहण काळात हवा दुषित होते हे आपणा सर्वांना माहित आहे. पण ग्रहणापूर्वीही तीन चार प्रहर हवा दूषित होते. ग्रहणापूर्वी हवा दूषित होते, म्हणून त्यापूर्वी वेध पाळावा व भोजन करू नये, असे शास्त्र आहे. या काळात हवा दूषित होते हे आता वैज्ञानिकांनीही मान्य केले आहे.
ग्रहणकाळात पाणीसुद्धा बिघडते, म्हणून ते पिऊ नये असे शास्त्रज्ञ सांगतात. असे दूषित अन्न आपण खाल्ले तर काय होईल? मानवी जिवनात वास्तविक खरा विचार कोणता असेल तर तो आहाराचा! आणि आज नेमका तोच विचार राहिला नाही. ज्या अन्नाचे आपल्या शरीरात सप्तधातु तयार होतात त्या अन्नाचा विचार अजिबात होऊ नये, हे चुकीचे आहे. म्हणून पूर्वीचे लोक ग्रहणकाळात भोजन करत नसत तसेच साठवलेले पाणी फेकून देत असत. परंतु अन्न पाण्याचा एवढा अपव्यय टाळण्यासाठी शास्त्राने तुळशी पत्र ठेवण्याचा पर्याय सुचवला आहे, निदान आपण त्याचा वापर अवश्य केला पाहिजे.
मानसिक क्षमता प्रभावित
असेही मानले जाते की ग्रहण काळात सूर्याच्या प्रखर किरणांचा मानसिक क्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे वातावरणात औदासिन्य पसरते. अशा काळात मन प्रसन्न ठेवण्यासाठी देवाचा जप करावा. तसेच गर्भवतींनी विश्रांती घ्यावी किंवा स्तोत्र पठण, नामस्मरण, चांगल्या विषयाचे वाचन करावे. त्यामुळे मन शांत राहील व गर्भावर कोणताही परिणाम होणार नाही.
डोळ्यांवर वाईट परिणाम
ग्रहण पाहण्यासाठी प्रत्येकाने सनग्लासेस घालण्याचा सल्ला दिला आहे. असे मानले जाते की सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे सुरक्षित नाही. दृष्टिदोष निर्माण होतो. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक ठरू शकते, असेही वैज्ञानिकांचे मत आहे.