Last Solar Eclipse of 2021 : ग्रहण काळात नामस्मरणाचे काय महत्त्व असते व कोणते नामस्मरण अधिक लाभदायक ठरते? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 07:30 AM2021-12-04T07:30:00+5:302021-12-04T07:30:02+5:30
Last Solar Eclipse of 2021: सूर्य हा पृथ्वीवरून दिसणारा एकमेव देव आहे. त्याला राहू व केतूच्या जाचातून मुक्त होईपर्यंत आपण देवाकडे प्रार्थना करावी. एकदा का ग्रहण सुटले, की आपत्ती टळली या विचाराने अन्न, वस्त्र, शिधा गरजूंना दान करावा.
'ग्रहण' या शब्दात एवढी नकारात्मकता भरली आहे, की आपण एखादे होणारे काम होत नसले तर `काय ग्रहण लागले आहे', असे म्हणतो. या नकारात्मकतेतून ग्रहणाची तीव्रता लक्षात येते. ग्रहण ही भौगोलिक अवस्था आपल्या मानसिक अवस्थेवर तीव्रतेने परिणाम करते. यासाठीच ग्रहणकाळात देवाचे नाव घ्या असे सांगितले जाते. त्यात शनी अमावस्या असल्यामुळे 'ओम शनैश्चराय नमः' हा मंत्र देखील करता येईल.
४ डिसेंबर रोजी २०२१ वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण आहे. ते भारतातून दिसणार नाही, तरीदेखील ग्रहणकाळाचा प्रभाव मात्र समस्त सजीव सृष्टीवर परिणामकारक ठरतो. म्हणून या कालावधीत ईशचिंतन करा असे पूर्वापार सांगितले जाते.
सूर्य-चंद्र ग्रहणात गायत्री मंत्र करावा. याखेरीज अथर्वशीर्ष, पुरुषसुक्त, श्रीसूक्त, रुद्र, नवग्रहांचे मंत्र तसेच अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करावीत. ग्रहणकाळात शक्यतेवढे नाम:स्मरण करावे.
स्त्रियांनी स्तोत्र पठण जसे की, महिम्न, व्यंकटेशस्त्रोत्र, विष्णु सहस्त्रनाम, गणेश-देवी सहस्त्रनाम तसेच नामजप करावा. आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून जप करावा. जसे की, श्रीराम जय राम जय जय राम, नमो भगवते वासुदेवाय. इ. नाम घेत असताना आसन घ्यावे. पलंगावर बसू नये. लोळत पडू नये. आपली नित्यकर्म करत प्रभूचे नाम स्मरावे.
सूर्य हा पृथ्वीवरून दिसणारा एकमेव देव आहे. त्याला राहू व केतूच्या जाचातून मुक्त होईपर्यंत आपण देवाकडे प्रार्थना करावी. एकदा का ग्रहण सुटले, की आपत्ती टळली या विचाराने अन्न, वस्त्र, शिधा गरजूंना दान करावा.
हे नियम आपल्या पूर्वजांनी पूर्वापार पाळले आहेत. आपणही यथाशक्ती सहयोग देऊन ईशकार्यात सहभाग घ्यावा आणि ग्रहणकाळ आपल्या नित्यकर्माबरोबरच परमेश्वर चिंतनात घालवावा.