Lata Mangeshkar: 'ऐरणीच्या देवा...' हे लता दीदींनी स्वर आणि संगीतबद्ध केलेलं गाणं जणू सर्वसामान्यांनी केलेली प्रार्थनाच!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 6, 2023 12:26 PM2023-02-06T12:26:10+5:302023-02-06T12:26:35+5:30
Lata Mangeshkar: लता दीदींचा आज पहिला स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेल्या या गोड गाण्याची उजळणी करूया.
लता दीदी आपल्यात नाहीत, हे स्वीकारणं अवघडच, तरी नाही म्हणता म्हणता वर्ष झालं. आज त्यांचा पहिला स्मृतिदिन. त्यांच्या आठवणीत त्यांनी गायलेली अनेक गाणी मनात रेंगाळत असतील, पण त्यांनी संगीत दिलेल्या निवडक गाण्यांपैकी एक गाणं म्हणजे 'साधी माणसं' या चित्रपटातील 'ऐरणीच्या देवा' हे गाणं! हे गाणं नुसतं चित्रपटगीत नाही तर देवाकडे काय मागावं याचा सुंदर वस्तुपाठ आहे. शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे आणि स्वरसाज आहे लता दीदी यांचा.
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊं दे
आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे
लोहारांचा देव 'ऐरण' आणि फुलं म्हणजे कोळशातून उडणाऱ्या 'ठिणग्या'. असं लोहारकाम करणारं जोडपं आपलं काम करता करता ऐरणीच्या देवाला ठिणगी ठिणगी म्हणजे फुलं वाहतंय आणि मोबदल्यात फक्त तुझी माया आमच्यावर राहू दे, हे दान मागतंय!
लेऊ लेनं गरीबीचं चनं खाऊ लोखंडाचं
लेऊ लेनं गरीबीचं चनं खाऊ लोखंडाचं
जिनं व्हावं आबरुचं धनी मातुर माझा देवा वाघावानी आसुं दे
लेणं म्हणजे अलंकार, तोही कसला तर गरिबीचा, अलंकार असा तर पोटभरीला काय तर आपल्या लोहार व्यवसायाच्या कष्टातुन मिळवलेले चणे. एवढ्यात समाधानी आहोत आणि ते स्वाभिमानाने जगणं हेच आमची अब्रू संभाळणारं आहे, फक्त घरचा कर्ता पुरुष वाघाच्या काळजाचा असू दे, जो प्रत्येक संकटाला निधड्या छातीने तोंड देऊ शकेल.
लक्षुमीच्या हातातली चवरी व्हावी वरखाली
इडा पिडा जाईल आली किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग
किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग गाऊं दे
लक्ष्मी विष्णूंच्या सेवेत रत असते. तिच्या हातात कुंचल्यासारखी चवरी असते. ती वर खाली होत राहते. तशी सुख दुःखाची चवरी आपल्याही आयुष्यात वर खाली होत राहते. येईल त्या परिस्थितीला सामोरं जायची ताकद आहे, फक्त तुझी कृपा पाठीशी राहू दे.
सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी
सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी
घाव बसल घावावरी सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊं दे
'सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे' याचा अनुभव आपण घेतोच, अशातच लोकांच्या बऱ्या वाईट स्वभावाचा अनुभव येतो. मात्र आपलेच आपल्याशी दगा करतात तेव्हा घावावर घाव बसून दोन तुकडे होतात, ते दुःख सहन करण्याचं बळ आमच्या अंगात असू दे!
भालजी पेंढारकर यांच्या साधी माणसं चित्रपटातलं हे गीत अजरामर झालं. दीदींनी आनंदघन या नावाने संगीत दिलं, तेही शब्दांना शोभेल इतकं साधं, तरी मनावर खोलवर परिणाम करणारं! दीदींच्या आवाजाने त्या शब्दांचं सोनं झालं. यापुढे हे गीत केवळ चित्रपट गीत म्हणून न पाहता प्रार्थना म्हणून पाहिलं तरी काही वावगं ठरणार नाही. बरोबर ना?
आनंदघन नावाने दीदींची आणखीही गाजलेली मराठी गाणी - अखेरचा हा तुला दंडवत, डौल मोराच्या मानाचा, नको देवराया अंत आता पाहू, निळ्या आभाळी कातरवेळी, बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला, माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं, रेशमाच्या रेघांनी, शूर आम्ही सरदार, ई...