हसण्याने तुमच्या डोक्यावरचा ताण हलका होतो, तर शत्रूच्या डोक्यावरचा वाढतो; वाचा ही गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 12:35 PM2022-12-27T12:35:56+5:302022-12-27T12:36:16+5:30
जेव्हा जगण्यासाठी काहीच उद्दिष्ट राहिले नाही असे वाटत असेल दुसऱ्यांच्या जगण्याचे कारण बना.
एकदा एक सुखवस्तू घरातली बाई डॉक्टरांकडे आली आणि म्हणाली, 'डॉक्टरसाहेब मला जगणं नकोसं झालं आहे, मला मारून टाका.'
डॉक्टर सांगतात, आम्ही लोकांना जगवण्याचा प्रयत्न करतो, मारण्याचा नाही. पण तुमची जगण्याची उमेद संपली असेल तर एकदा या मावशींची गोष्ट ऐका' असे म्हणत त्यांनी केर काढणाऱ्या मावशींना बोलावून घेतले. त्यांना त्यांची गोष्ट सांगायला लावली. मावशी सांगू लागल्या....
माझ्या नवऱ्याचे मलेरियाने निधन झाले. त्यानंतर काही काळातच माझा मुलगा अकाली अपघाती निधन पावला. मी माझ्या जगण्याचं उद्दिष्ट गमावून बसले. कोणासाठी जगू हे कळत नव्हते. मरण्याच्या विचाराने एक दिवस पावसात चालत चालत एका दरीच्या दिशेने जात असताना एक मांजरीचे पिल्लू पायात घुटमळू लागले. पावसाने भिजल्यामुळे ते गारठले होते. मी मृत्यूच्या दिशेने पावले टाकत होती, ते माझी वाट अडवत होते. शेवटी त्या पिल्लाला उचलून घेत मी माझ्या झोपडीत आले. घरात शिल्लक असलेलं थोडं दूध गरम करून त्याला पाजलं. त्याचं अंग स्वच्छ पुसलं आणि एका गोधडीत गुंडाळून मांडीवर घेतलं. ते पिल्लू माझा हात चाटत चाटत मायेने झोपी गेलं. त्याच्या चेहऱ्यावर त्या क्षणी जे समाधान पाहिलं, ते पाहून कित्येक दिवसानंतर मी हसले. मला मनापासून आनंद झाला. तेव्हा मनात विचार आला, एवढ्याशा पिल्लासाठी छोटंसं काम करून मी त्याला आनंद देऊ शकले तर आपल्या सभोवताली असे अनेक लोक आहेत, ज्यांना मदतीचा हात हवा आहे. त्यांना मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या समाधानाची कमाई करूया. तेव्हापासून हॉस्पिटलमध्ये येऊन रोज मिळेल ते काम आनंदाने करते.
गोष्टीचे तात्पर्य हेच, की आनंद केवळ स्वतः मध्ये न शोधता दुसऱ्यांमध्ये शोधला तरी सापडतो. त्यासाठी छान हसून आयुष्याचे स्वागत करा. हास्याची एक लकीर तुमच्या चेहऱ्याचा नूर पालटते, शिवाय बघणाऱ्यालाही बरे वाटते. तुम्ही शिक्षक असाल तर तुमच्या हसण्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल, डॉक्टर असाल तर रुग्णाला तुम्हाला बघून दिलासा मिळेल, बॉस असाल तर सहकाऱ्यांचा उत्साह वाढेल. त्यामुळे हसण्याची संधी गमावू नका. तुमच्या हसण्याने तुमच्या डोक्यावरचे ओझे उतरेल शिवाय तुम्ही सतत आनंदी कसे राहता या विचाराने शत्रूच्या मनावरचे ओझे वाढेल हे नक्की! जगा आणि जगू द्या! दुधाचा पेला पूर्ण भरला असेल तर त्यात आणखी दुधाची भर घालता येणार नाही, पण त्यात साखर टाकली तर ती विरघळून जाईल आणि गोडवासुद्धा वाढवेल. तुमचे सुमधुर हास्य दुसऱ्यांच्या आयुष्यात साखरेची पेरणी कशी करेल याची खबरदारी घ्या आणि आनंदी राहा!