Laxmi Pujan 2024: एका व्हायरल व्हिडिओनुसार लक्ष्मीपूजेत घंटानाद करू नये; त्यामागचे वास्तव जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 02:37 PM2024-10-31T14:37:22+5:302024-10-31T14:39:40+5:30

Laxmi Pujan 2024: पूजेत घंटानाद करून आपण मंगल वातावरणनिर्मिती करतो, मात्र सोशल मीडियावर लक्ष्मी पुजेबाबतीत वाचनात आलेल्या गोष्टीसंबंधित काही संदर्भ!

Laxmi Pujan 2024: Being told not to ring bells in Laxmi Pujan? Let's know the truth behind it! | Laxmi Pujan 2024: एका व्हायरल व्हिडिओनुसार लक्ष्मीपूजेत घंटानाद करू नये; त्यामागचे वास्तव जाणून घेऊ!

Laxmi Pujan 2024: एका व्हायरल व्हिडिओनुसार लक्ष्मीपूजेत घंटानाद करू नये; त्यामागचे वास्तव जाणून घेऊ!

>> सचिन मधुकर परांजपे, पालघर

लक्ष्मीपूजन करताना आरती करु नये किंवा घंटी वाजवू नये (जेणेकरून लक्ष्मीचे वाहन असणारे घुबड आणि पर्यायाने त्या घुबडावर बैसोनी लक्ष्मी निघून जाते) असे विचित्र अपप्रचार सध्या अनेकजण इंटरनेटवरुन करत आहेत. त्याचा संदर्भ आहे की नाही ते माहीत नाही.  १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan 2024) आहे, त्याबाबतीत माझ्या बाजूने थोडक्यात स्पष्टीकरण देतो. 

Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेच्या दिवशी का करतात केरसुणी आणि मीठाची पुजा? वाचा कारण!

मुळात आपण ज्या महालक्ष्मीचे पूजन लक्ष्मीपूजनाचे दिवशी करतो तिचे वाहन घुबड नाही. ती कमलासनात सुस्थिरा असून तिच्यावर दोन्ही बाजूंनी हत्ती पुष्पवृष्टी करत असतात. ती स्वभावाने चंचला असली तरी ती unless and until तुम्ही तिचा अपमान करत नाही तोवर जात नाही. त्यामुळे घंटी च्या आवाजाने तिला त्रास होऊन ती निघून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ती हस्तीनादप्रबोधिनी आहे. हत्तीच्या चित्कारांचा जर तिला त्रास होत नाही तर घंटी च्या नाजूक आवाजाने तिला काही फरक पडत नाही हे लक्षात घ्या....

आरती ही स्तुतीपर असते. प्रत्येक देवतेला आरती प्रिय असून ज्या शब्दरचनेत आर्तता आहे ती आरती. त्यामुळे आर्ततेने केलेल्या प्रार्थनेचा कोणत्याही दैवतेला राग येत नाही. उलट भक्तांच्या मनोकामना व्यक्त होणारी आरती महालक्ष्मी सकट प्रत्येक देवतेला प्रिय आहे. खाली महालक्ष्मीची प्रचलित आरती देत आहे. ती लक्ष्मीपूजनानंतर आवर्जून म्हणावी.

🔸 आरती महालक्ष्मीची 🔸
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥
जय देवी जय देवी…॥

मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी॥
जय देवी जय देवी…॥

तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥
जय देवी जय देवी…॥

अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥
जय देवी जय देवी…॥

चतुराननाने कुश्चित कर्माच्या ओळी ।
लिहिल्या असतील माते माझ्या निजभाळी।
पुसोनी चरणातळी पदसुमने क्षाळी ।
मुक्तेश्वर नावावर क्षीरसागर बाळी ।। जय...

आणि या व्यतिरिक्त तुमच्या बुद्धीला, मनाला आणि भक्तीला जे जे देवी महालक्ष्मीसाठी सकारात्मक, शुभ, स्वच्छ, आनंददायी, शुचिर्भूत या संकल्पनेत असेल ते सर्व काही तुम्ही आवर्जून करा.....!

Web Title: Laxmi Pujan 2024: Being told not to ring bells in Laxmi Pujan? Let's know the truth behind it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.