Laxmi Pujan Muhurta 2024: यंदा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 'धनलाभ' मुहूर्तावर 'असे' करा विधिवत पूजन!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 11:04 AM2024-10-22T11:04:11+5:302024-10-22T11:05:39+5:30
Diwali 2024: उत्तम संसारसुखासाठी दिवाळीत लक्ष्मी पूजेच्या दिवशी धनलाभ मुहूर्तावर शास्त्रोक्त विधीसह पूजा करणे नक्कीच लाभदायी ठरेल.
>> सचिन मधुकर परांजपे, पालघर
यावर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजन दिनांक १ नोव्हेंबर २०२४ (शुक्रवार) सायंकाळी ०६ वाजून ०४ मिनीटांपासून रात्रौ ८ वाजून ३५ मिनीटे या कालावधीत मुहूर्तानुसार आहे (एकूण कालावधी २ तास ३१ मिनिटे) हा आहे. या काळात एकही शुभ चौघडी नाहीये. पण रात्री ०८ वाजून ११ मिनिटांपासून ते ९ वाजून १४ मिनिटांपर्यंत शुक्र होरा आहे. जो धनकारक आहे.
आपल्या घरातील लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी सुरु केले तरी शक्यतो स्तोत्र, मंत्रपठण, साधना, प्रार्थना या रात्री ०८ वाजून ११ मिनिटांपासून ०८ वाजून ३५ मिनिटे या काळात करा. त्याआधी उपचार, अभिषेक, पूजा वगैरे करायला हरकत नाही. ०८ वाजून ३५ मिनिटांच्या पुढेही विधी साधना सुरु राहिल्या तरी हरकत नाही. ते अधिक उत्तम ठरेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री ९ वाजून १३ मिनिटे ते १० वाजून ४८ मिनिटे “लाभ” होरा आहे त्याकाळातही पुन्हा लक्ष्मीस्मरण, पूजन, धूपदीप करायला हवं असं मला वाटतं.
या पूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक व व्यावहारिक मूल्य शब्दातीत आहे. इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसून ती "श्री" या संकल्पनेवर आधारित आहे. श्री म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य या सर्वगुणसंपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आगमन होणे अपेक्षित आहे. धनाइतकीच मनःशांती हीच खरी लक्ष्मी आहे.
या काळात शुचिर्भूतपणे श्रीमहालक्ष्मीच्या तसबिरीची किंवा मुर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करुन पूजन करावे. सोबत धन, सुवर्ण, बॅन्केची पासबुके, सर्टिफिकेट, नाणी यांचीही पूजा करावी. पूजा पंचोपचार केली तरी चालेल (म्हणजे स्नान, धुप, दीप, गंध आणि नैवेद्य)....मनातील भाव हा कृतज्ञतेचा, श्रध्देचा असावा. बरेचदा श्रीलक्ष्मीपूजन करताना अनवधानाने श्रीविष्णूंचे स्मरण-प्रार्थना करणे राहुन जाते (श्रीमहालक्ष्मी तत्वाचं वैशिष्ठ्य म्हणजे जिथे विष्णूंचे स्मरण-प्रार्थना होते त्या ठिकाणी तिचा निवास रहातो. कारण ती विष्णुंशिवाय रहात नाही. त्यामुळे तिची पुजा अर्चना करण्याआधी विष्णूदेवांचे स्मरण करणे क्रमप्राप्त आहे हे विसरु नका...नुसते मानसिक स्मरण केले किंवा ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥ हा मंत्रजप ११ वेळा करा तरी चालेल)
घरांतील वातावरण सुगंधित व प्रसन्न असावे....पूजनाचे उपचार हे तुम्ही तुमच्या इच्छेने व मनापासुन करावेत. पण लक्ष्मीपूजनासाठी काही प्रभावी मंत्र पुढीलप्रमाणे आहेत. त्यांचा जप प्रत्येक मंत्राचा किमान १०८ वेळा तरी पूजनप्रसंगी करावा. काही मंत्र तंत्रोक्त आहेत तर काही पुराणॊक्त किंवा स्तोत्रातील आहेत. मंत्रजप हा शक्यतो पूजन झाल्यानंतर करावा. खाली दिलेल्या सर्वच मंत्रांचा जप करणं जमेल असं नाही पण निदान त्यातील दोन मंत्रांचा जप तरी प्रत्येकी १०८ वेळा करावा....जप झाल्यानंतर प्रार्थना करावी. आधीच्या पॅरेग्राफमधे जे गुण लिहिले आहेत त्यांची (धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धी , यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य) प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करावी. नैवेद्य दाखवुन प्रसाद घरातील मंडळींना वाटावा....ज्यांना जमत असेल, येत असेल त्यांनी मंत्रजपानंतर "श्रीसूक्त" किंवा "महालक्ष्मी अष्टक" यांचेही पाठ करावेत ही विनंती.
महत्वाचे:- जर तुम्ही श्रीलक्ष्मीपूजन करणार असाल तर त्यादिवशी मांसाहार, मद्यपान किंवा कोणतेही अनैतिक, अश्लाघ्य आणि अशुभ कृत्य करु नये. त्या दिवशी वादविवाद करु नये. दिवसभरात जमेल तेव्हा अन्नदान करावे. सुवासिनीची ओटी भरावी. कुलदेवतेचे स्मरणचिंतन करावे. लक्ष्मीपूजनाचे वेळी घरच्या ओटीवर/अंगणात दिवे प्रज्जवलित असावेत.
श्रीलक्ष्मीदेवीचे काही प्रभावी मंत्र:- यापैकी सर्व मंत्रांचा/किमान दोन मंत्रांचा तरी जप प्रत्येकी १०८ वेळा करावा. उच्चार करणे अजिबात शक्य नसेल तर निदान प्रार्थना तरी करावी. काही मंत्र उच्चाराला सोपे असे देत आहे तर काही जरा कठीण आहेत.
१) ॐ श्रीं नम: (यात श्री या शब्दावर अनुस्वार आहे त्यामुळे श्रीम असा उच्चार करावा)
२) ॐ श्री महालक्ष्मी देव्यै नम:
३) ॐ महालक्ष्मैच विद्महे, विष्णुपत्नैच धीमही, तन्नो लक्ष्मी प्रचोदयात
४) ॐ ह्रीम पद्मे स्वाहा
५) ॐ श्रीम ह्रीम श्रींम कमले कमलालये, प्रसीद प्रसीद, श्रीम ह्रीम श्रीम ॐ महालक्ष्मै नम:
६) ॐ या देवी सर्वभुतेषु लक्ष्मीरुपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:
७) ॐ आदी लक्ष्मी नमस्तेsस्तु, परब्रह्म स्वरुपिणी, यशो देही, धनं देही, सर्व कामांश्च देही मे
यावर्षी लक्ष्मीपूजन २०२४ च्या शुभमुहूर्तावर समस्त लक्ष्मीभक्तांसाठी एक वेगळं दुर्मिळ स्तोत्र देतो आहे. या काळात किंवा रात्री दिलेल्या मुहूर्तकाळात या दुर्मिळ “रमाह्रदय स्तोत्रा” चा १/११/२१ वेळा पाठ करा.
रमाहृदय स्तोत्रम् श्रीः पद्मा कमला मुकुन्दमहिषी लक्ष्मीस्त्रिलोकेश्वरी मा क्षीराब्धिसुता विरिञ्चिजननी विद्या सरोजासना ।
सर्वाभीष्टफलप्रदेति सततं नामानि ये द्वादश, प्रातः शुद्धतराः पठन्त्यभिमतान् सर्वान् लभन्ते शुभान् ॥
नामावली :
ॐ श्री श्रियै नमः ।
ॐ श्रीपद्मायै नमः ।
ॐ श्रीकमलायै नमः ।
ॐ श्रीमुकुन्दमहिष्यै नमः ।
ॐ श्रीलक्ष्म्यै नमः ।
ॐ श्रीत्रिलोकेश्वर्यै नमः ।
ॐ श्रीमायै नमः ।
ॐ श्रीक्षीराब्धिसुतायै नमः ।
ॐ श्रीविरिञ्चिजनन्यै नमः ।
ॐ श्रीविद्यायै नमः ।
ॐ श्रीसरोजासनायै नमः ।
ॐ श्रीसर्वाभीष्टफलप्रदायै नमः ।
इति रमाहृदय स्तोत्रं सम्पूर्णम् ।
तर मित्रांनो, अत्यंत श्रध्देने आणि वर दिलेल्या शुभपर्वकालात अवश्य श्री महालक्ष्मीपुजन करा. मंत्रजप करा, प्रार्थना करा आणि एक श्रीमंत-समृध्द-ऐश्वर्यसंपन्न व आरोग्यसंपन्न मन:शांतीयुक्त जीवनाचा आनंद तुम्हाला प्राप्त होवो हीच सदिच्छा.