Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 09:12 AM2024-11-01T09:12:13+5:302024-11-01T09:12:44+5:30
Laxmi Pujan Muhurta 2024: अमावस्या तिथी विभागून आल्याने अनेकांच्या मनात लक्ष्मीपूजन ३१ ऑक्टोबर की १ नोव्हेंबर हा संभ्रम होता, त्यावर यथोचित उत्तर जाणून घ्या.
सर्वसामान्यपणे लोक दिनदर्शिका पाहूनच सण-उत्सव साजरे करतात. मात्र अलीकडे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी निघाल्यापासून जो उठतो तो आपल्याला माहीत असलेल्या माहितीची भर घालतो. त्यामुळे दहा लोकांचे दहा विचार एकत्र आल्यामुळे संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे. अशा वेळी शास्त्रोक्त अभ्यास केलेल्या मंडळींचा सल्लाच उपयुक्त ठरतो. मग ते धार्मिक विधी असोत नाहीतर आरोग्यासंबंधीचे उपचार! इथे आपण दाते पंचांगाने दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मी पूजेच्या मुहूर्ताबद्दल, विधींबद्दल आणि मुख्य श्लोकांबद्दल जाणून घेणार आहोत.
यंदा ३१ ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावास्येची अधिक व्याप्ती असून, दुसऱ्या दिवशी ०१ नोव्हेंबर रोजी अमावास्या प्रदोष काळात अल्प काळ असताना लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan 2024) सांगितले आहे. लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त ०१ नोव्हेंबर रोजी सूर्यास्तानंतर अमावास्या प्रदोष काळात अल्प काळ असली, तरी सायंकाळपासून प्रदोषकाळ समाप्तीपर्यंत म्हणजेच सूर्यास्तानंतर सुमारे २ तास २४ मिनिटे या कालावधीत नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजन करता येईल. लक्ष्मीपूजनासह दिवाळीला अनेक शुभ योग जुळून येत आहेत. यंदा लक्ष्मीपूजनाला शुक्रवार येणे हा योगही विशेष मानला जात आहे. शुक्रवार हा दिवस लक्ष्मी देवीला समर्पित असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी लक्ष्मी देवीची उपासना, नामस्मरण, विशेष पूजन करणे शुभ लाभदायक, पुण्यदायक मानले गेले आहे.
लक्ष्मीकुबेर पूजन (Laxmi Pujan Muhurta 2024): १ नोव्हेंबर २०२४, शुक्रवार
लक्ष्मी पूजेचा मुहूर्त :
दुपारी ३ ते ५:१५,
सायंकाळी ६ ते ८:३०
रात्री ९:१० ते १०:४५
लक्ष्मी पूजा विधी :
लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून स्वच्छ करावे आणि सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धिसाठी प्रार्थना करावयाची असते. लक्ष्मी प्रार्थना:-
नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात् ।।
अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणि पुढील प्रमाणे कुबेर प्रार्थना करावी.
धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच ।
भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः ।।
पूजेत लाह्या, बत्तासे, फराळ, घरच्या जेवणाचा नैवेद्य, सोनं-नाणं, दाग-दागिने मांडून, त्यावर फुलं, गंध, अक्षता वाहून, धूप-दीप लावून, सुबक सुंदर रांगोळी काढून यथासांग पूजा करावी. शिवाय श्रीसूक्त, अष्टलक्ष्मी स्तोत्र. महिषासूर मर्दिनी स्तोत्र यांचे पठण-श्रवण करावे. जेव्हा पूजेने आपल्या मनाला प्रसन्न वाटेल तेव्हा आपसुख लक्ष्मी कुबेरही प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्की!