'अंगाला लावून न घेणे' ही कला आत्मसात करा; यशस्वी व्हाल!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: April 19, 2021 02:24 PM2021-04-19T14:24:51+5:302021-04-19T14:25:34+5:30

'हाथी चले बाजार, कुत्ते भोंकें हजार' ही म्हण आत्मसात करा. चांगल्या वाईट प्रतिक्रियांसाठी बुद्धीची दारे खुली ठेवा, परंतु चांगले म्हटले म्हणून हुरळून जाऊ नका आणि वाईट बोलले म्हणून दुखावले जाऊ नका. 

Learn the art of 'not clinging'; You will be successful! | 'अंगाला लावून न घेणे' ही कला आत्मसात करा; यशस्वी व्हाल!

'अंगाला लावून न घेणे' ही कला आत्मसात करा; यशस्वी व्हाल!

Next

बालपणी कोणी काही बोलले की रागावून आपण आईजवळ तक्रार करायचो. त्यावर आईचे ठरलेले उत्तर असे, 'जाऊदे, लक्ष देऊ नकोस. तू चिडलास तर तर ते आणखी चिडवतील!" किती सोपा कानमंत्र होता, पण तो अमलात आणणे आजतागायत आपल्याला जमलेले नाही. तेच जमवता आले पाहिजे...!

कधी कधी आपण इतके संवेदनशील होतो, की कोणाच्याही वाईट बोलण्या-वागण्याचा आपल्या मानसिकतेवर, कामावर, स्वभावावर विपरित परिणाम होतो. बोलणारा बोलून जातो, आपण अश्रू ढाळत बसतो. संवेदनशील असणे, माणुसकीच्या दृष्टीने चांगले आहे. परंतु अति संवेदनशील होत आपली प्रगती खुंटवून घेणे, वेडेपणाचे ठरू शकते.

सद्यस्थितीत आपण आपल्या मनस्थितीचे अधिकार विनाकारण दुसऱ्याच्या हाती देऊन ठेवले आहेत. आपल्या कामाला जोवर दुसऱ्यांकडून प्रशंसा मिळत नाही, तोवर आपल्याला आपल्याच कलाकृतीचा आनंद मिळत नाही. समाज माध्यमांच्या भाषेत सांगायचे, तर लाईक, कमेंट, शेअर यावर आपला आनंद अवलंबून असतो. कमी लाईक आले, खोचक कमेंट आली, कोणी जाहीर सल्ला दिला, की आपल्या मन:शांतीला सुरूंग लागलाच म्हणून समजा. या आभासी जगात आपण एवढे गुंतून जातो, की चांगले वाईट याची समज गमावून बसता़े 

आपल्या कामाचे आपल्याला समाधान मिळणे हे सर्वात आधी महत्त्वाचे आहे. इतरांनी प्रशंसा केली तर ठीक, नाही केली, तरी ठीक. एवढी स्थितप्रज्ञता अंगी बाणता आली पाहिजे. आपल्याला चांगल्या वाईट प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांचा उद्देश नेहमी निर्मळ असतोच असे नाही. कोणी खरी प्रशंसा करतात, कोणी खोटी, कोणी उगीच चूका काढतात, तर कोणी फक्त चूकाच शोधतात. म्हणून अशा चांगल्या वाईट प्रतिक्रियांसाठी बुद्धीची दारे खुली ठेवा, परंतु चांगले म्हटले म्हणून हुरळून जाऊ नका आणि वाईट बोलले म्हणून दुखावले जाऊ नका. 

'हाथी चले बाजार, कुत्ते भोंकें हजार' ही म्हण आत्मसात करा. यालाच मराठीत 'अंगाला लावून न घेणे, असे म्हणतात. आपण राजकारणी, सिनेमा, कला, क्रिडा जगतातील प्रसिद्ध लोकांना पाहतो. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो तसेच अगदी हिन दर्जाची शेरेबाजीदेखील होते. त्यांनी जर प्रत्येक प्रतिक्रिया मनाला लावून घ्यायची ठरवली, तर त्यांची प्रगती होऊ शकेल का? नाही ना? स्वत:ला सेलिब्रेटी समजा आणि प्रतिक्रियांचे स्वागत करा पण त्यात अडकून राहू नका.

या सवयीने तुमचे मन एवढे कणखर बनेल, की कोणी काहीही प्रतिक्रिया दिली, तरी तुमच्या आनंदात विरजण पडणार नाही. चेहऱ्यावर क्षणिक प्रतिक्रिया उमटेल, पण त्यावर योग्य प्रतिसाद देण्यासाठी तुमच्या मनाची तयारी झालेली असेल. 

एकाने दुसऱ्याच्या हातावर चापटी मारण्याचा खेळ आठवतो? तेव्हा एखाद दुसरा फटका बसतो, परंतु त्यानंतर आपण एवढे सावध होतो, की मारणारा निशाणा धरून कंटाळतो. हाच खेळ आपल्याला मनाला शिकवायचा आहे. एखाद दुसरा फटका बसेल, पण पुढच्यावेळेपासून मन सावध पवित्रा घेईल आणि कोणत्याही स्थितीत मन:शांती गमावणार नाही!

Web Title: Learn the art of 'not clinging'; You will be successful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.