आपल्या कामाप्रती कर्तव्यनिष्ठ कसे असावे, हे महापुरुषांच्या चरित्रातून शिकावे; वाचा लोकमान्य टिळकांचा प्रसंग!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 15, 2021 08:00 AM2021-02-15T08:00:00+5:302021-02-15T08:00:08+5:30
जीवनात प्रतिक्षणी जो विरक्तपणे तटस्थ असतो, तो खरा ब्रह्मचारी व भगवंताचा उत्कृष्ट भक्त होय.
गोष्ट आहे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनातील. एकदा ते लिखाण करत बसले होते. त्यांच्या वैयक्तिक चिटणीस खोलीच्या दाराशी कुणीतरी थांबल्याचे पाहून उठला. एक मध्यमवयीन स्त्री दारात उभी होती. तिने त्याला टिळकांशी काम असल्याचे सांगितले. टिळकांनी लिखाण न थांबवता किंवा वर न पाहता त्या बाईंना आत येण्याची परवानगी दिली.
बाई समोर आल्या व स्वत:ची फिर्याद सांगून, त्याचे वकीलपत्र टिळकांनी स्वीकारावे अशी विनंती करू लागल्या. मान खाली ठेवून लिखाण चालू व तोंडाने त्या बार्इंशी व्यवस्थित बोलणे असा टिळकांचा पवित्रा पंचेचाळीस मिनिटे होता. नंतर बाई निघून गेल्या. चिटणीस मात्र टिळकांच्या वागण्याने चकित झाला. कचेरीची वेळ संपल्यावर त्याने विचारले, `आपण तर त्या बाईंकडे पाहिलेसुद्धा नाही, त्यांचे काम स्वीकारलेत. त्या उद्या आल्या तर तुम्ही त्यांना ओळखणार कसे?'
त्यावर टिळकांनी शांतपणे विचारणा केली, 'काम स्वीकारण्यासाठी व ते उत्कृष्ट रितीने पार पाडण्यासाठी हातातील काम टाकून त्या बाईंकडे पाहण्याची गरज काय? तशी गरज मला वाटत नाही. त्यांना त्यांच्या शब्दावरून मी ओळखू शकतो. ती व्यक्ती स्त्री-पुरुष कोण आहे, याच्याशी माझा संबंध नाही.'
जीवनात प्रतिक्षणी जो विरक्तपणे तटस्थ असतो, तो खरा ब्रह्मचारी व भगवंताचा उत्कृष्ट भक्त होय. समर्थ रामदास स्वामी लिहितात,
नसे अंतरी काम नाना विकारी,
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी,
निवाला मनी लेश नाही तमाचा,
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा।। श्रीराम।।