जपाची माळ ओढताना 'तर्जनी'चा स्पर्श का टाळावा, याबद्दलचे शास्त्रसंकेत जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 05:32 PM2021-07-08T17:32:25+5:302021-07-08T17:33:03+5:30
आपल्या भारतीय संस्कृतीत शास्त्राकारांनी इतकी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे, की जगात इतरत्र अशी व्यवस्था कोठेही नाही. बोटांचे बाबतीतसुद्धा त्यांनी सांगितले आहे.
मंत्राचा जप करताना माळ हातात असली पाहिजे. ती माळ कोणास दिसता कामा नये. प्रत्येक मणी कसा ओढावा, याचेही शास्त्र आहे. या प्रत्येकाचे शास्त्र असण्याचे कारण, यातली प्रत्येक गोष्ट फलास कारणीभूत आहे. एकशे आठ मण्यांची माला असते. एकशे आठच मणी का, यालाही कारण आहे. प्रत्येक मणी ओढायचा तो मध्यमा, अनामिका व अंगुष्ठ या तीन बोटानीच ओढावा. पहिले बोट म्हणजे तर्जनी लागू नये. करंगळी लागली, तर एकवेळ चालेल.
आपल्या भारतीय संस्कृतीत शास्त्राकारांनी इतकी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे, की जगात इतरत्र अशी व्यवस्था कोठेही नाही. बोटांचे बाबतीतसुद्धा त्यांनी सांगितले आहे.
तर्जनी हे बोट पितरांचे कार्य करण्यासाठी वापरले जाते. मध्यमा हे बोट माणसांचे आहे. अनामिका हे बोट देवाचे आहे व कनिष्ठिका हे बोट ऋषींचे आहे. म्हणून पद्धत अशी आहे, की सपिंड श्राद्ध विधी असताना पितरांना किंवा त्यावेळी ब्राह्मणांच्या हाताला जे गंध लावायचे ते तर्जनी या बोटाने लावायचे. स्वत:ला गंध मधल्या बोटांनी लावायचे. तर्पण करांगुळीच्या मुळावरून पाणी सोडून करायचे. अंगठा सोडून बाकीच्या चारही बोटांवरून संकल्पाचे पाणी सोडणे याला देवतीर्थ म्हटले आहे.
देवतीर्थाने संकल्प करायचा. मनगटाला लागून असलेला तळहाताचा भाग याला ब्राह्मतीर्थ म्हटले आहे. करांगुळीच्या मुळावरून पाणी सोडणे याला ऋषीतीर्थ म्हटले आहे. तर्जनी व अंगठा यांच्यामधून पाणी सोडणे याला पितृतीर्थ म्हटले आहे.
असे प्रत्येक बोटाचे महत्त्व पाहता, अध्यात्मिक उन्नतीसाठी जपसाधना करताना मध्यमा, अनामिका आणि अंगठा या तीन बोटांनीच मणी ओढावा, असे शास्त्रकार सांगतात.