वेदकाळानुसार देवी-देवतांची रूपे कशी बदलत गेली, ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 12:48 PM2021-07-02T12:48:39+5:302021-07-02T12:49:20+5:30
निसर्गात आणि चराचरात ईश्वर शक्ती सामावलेली आहे आणि हेच अंतिम सत्य आहे. ज्या रूपात तुम्ही देवाला बघाल, त्या रूपात देव दिसेल!
आपले ऋषि मुनी प्रयोगशील प्रतिभावंत होते. त्यांनी आपल्या समाजासाठी, माणसाच्या समाधानासाठी, नैतिक-आध्यात्मिक उन्नतीसाठी परिस्थिती व आवश्यकतेनुसार देवांची रूपे बदलली. त्या देवांवर अनेक रूपककथा लिहिल्या, त्यांचे महात्म्य वर्णन करणारे ग्रंथ लिहिले आणि त्यांच्या आराधनेत बदल केले. त्यांचा परिचय आपण आता कालानुसार करून घेऊ.
वेदकालीन देवता: ऋग्वेदात व अथर्ववेदात ३३ देवता मुख्य मानल्या आहेत. त्यातील ११ आकाशात, ११ पृथ्वीवर व ११ जलात वास्तव्य करून आहेत, असे मानले आहे. अथर्ववेदात त्या स्वर्गात, अंतरिक्षात व पृथ्वीवर राहतात असेही सांगितले आहे.
दिव्य देवता: उषा, आदित्यगण, विष्णु, विवस्वान, अग्नी, सूर्य, वरुण या तेजस्वी देवता आहेत.
अंतरिक्ष देवता : इंद्र, रुद्र, मरुद्गण, पर्जन्य, वायू इत्यादी देवता अंतरिक्षात राहत असे मानत होते. या काळात प्रथम वरुण हा सर्वश्रेष्ठ देव मानला जाई. इंद्र ही भारतीयांची राष्ट्रीय देवता होती. अवर्षण व अंधकाररूपी दैत्यांवर विजय मिळवून पृथ्वीला पाणी व प्रकाश मिळवून देणे, हे इंद्राचे महत्कार्य होते. तो युद्धदेवही आहे. रुद्र हा मरुतांचा पिता. रुद्र म्हणजे रडवणारा. मरुद्गणांचे कार्य म्हणजे झंझावात निर्माण करून पर्जन्यवृष्टी करणे, हे होय. वायू हा विराट पुरुषाच्या श्वासातून उत्पन्न होतो, अशी त्याची समजूत होती.
पार्थिव देवता : या पृथ्वीवर राहतात. नद्या, अग्नी, बृहस्पती व सोम आणि सिंधू, गंगा, सरस्वती, यमुना या नद्यारूपी देवता अग्नीला तीन शिरे, तीन जिव्हा, तीन शरीरे व तीन स्थाने (घर, रान आणि पाणी) मानली होती. अग्नी हा गृहपती व अतिथी मानत. बृहस्पती हा पुरोहित आहे.
अमूर्त देव : काम, मन्यू, श्राध्द, अदिती, दिती इ. यांचे ऋग्वेदाच्या उत्तरकाळात मूर्तीकरण झाले.
स्त्रीदेवता : उषा, सरस्वती, वाक रात्री, पूष्णी, इला, राका, सूर्या, इंद्राणी, वरुणाती, रुद्राणी इ. यातील उषेवरील सूक्ते व रमणीय व काव्यमय आहेत.
युग्मदेवता (जोडदेवता) : इंद्राग्नी, मित्रावरुण, द्यावा पृथ्वी इ. इंद्रावरउन हे विश्वाचे राजे होत. त्यांनी जलप्रवाह निर्माण केले. सूर्याला आकाशात भ्रमण करण्यास सांगितले. विष्णू ही देवता ऋग्वेदकाळात चतुर्थश्रेणीची देवता होती.
एकूणच काय, तर निसर्गात देव पहा हे आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवले आहे. कारण आपले जनजीवन निसर्गावर अवलंबून आहे. तीच जागृती आजही आपण ठेवली, तर निसर्गाचा बिघडलेला समतोल आपल्याला पुन्हा साधता येईल. आपण निसर्गाची काळजी घेतली, तर निसर्गही आपली काळजी घेईल. कारण निसर्गात आणि चराचरात ईश्वर शक्ती सामावलेली आहे आणि हेच अंतिम सत्य आहे. ज्या रूपात तुम्ही देवाला बघाल, त्या रूपात देव दिसेल!