कार्तिक महिन्यात आचरणात सोपे आणि महाफलदायी 'दामोदर व्रत' कसे करायचे ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 05:42 PM2022-10-24T17:42:14+5:302022-10-24T17:42:52+5:30

२६ ऑक्टोबरपासून कार्तिक मास सुरु होत आहे, एखादी इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर या व्रताचा संकल्प करायला हरकत नाही!

Learn how to practice easy and fruitful 'Damodar Vrat' in the month of Kartik! | कार्तिक महिन्यात आचरणात सोपे आणि महाफलदायी 'दामोदर व्रत' कसे करायचे ते जाणून घ्या!

कार्तिक महिन्यात आचरणात सोपे आणि महाफलदायी 'दामोदर व्रत' कसे करायचे ते जाणून घ्या!

Next

>> मृदुला बर्वे, 'ओपंडित' संस्थापिका 

दीपावली सुरू आहे. भारतातील अनेक सणांमध्ये अत्यंत आवडता सण म्हणजे दिवाळी. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा व भाऊबीज... 

प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आणि आनंद...दीपावली पाडवा म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा. महाराष्ट्र आणि भारतातील इतर काही भागात कार्तिक मास प्रारंभ होतो. शास्त्रात असे लिहिले आहे की उपासनेसाठी १२ महिन्यातले तीन मास - वैशाख, माघ आणि कार्तिक हे अत्यंत पवित्र आहेत आणि त्यातही कार्तिक मास सगळ्यात उत्तम आहे. ह्या कार्तिक मासात केले जाणारे अतिशय पवित्र व्रत म्हणजे - "दामोदर मास व्रत". कार्तिक मासाला "दामोदर मास" असेही म्हणतात. ह्या महिन्यात भगवती राधारानी व श्रीकृष्ण ह्यांची उपासना अत्यंत पुण्यकारक मानली गेली आहे. पूर्ण महिना चालणारे हे व्रत आहे.

श्रीकृष्णाने ह्याच मासात अनेक लीला केल्या आहेत. नलकुबेर व मणिग्रीव ह्या कुबेराच्या पुत्रांची वृक्षाच्या जन्मातून मुक्तता, त्यासाठी केलेली "दामोदर लीला". दाम म्हणजे दोरी, उदर म्हणजे पोट, यशोदा मातेने उखळाला कृष्णाला बांधून ठेवले व आमच्या महाराजांनी, दोन वृक्षांच्या मधून असे काही उखळ नेले की वृक्ष उन्मळून पडले.

काय चुकले नलकुबेर व मणिग्रीव चे? का मिळाला वृक्षाचा जन्म? तुम्हाला कदाचित माहीत नसेल की ज्या स्त्रिया किंवा पुरुष - नको तिथे - नग्नतेचे प्रदर्शन करतात त्यांना कर्मविपाक सिद्धांतानुसार वृक्षाचा जन्म मिळतो. पावसापाण्यात, उन्हात, नग्नपणे अनेक वर्षे उभे राहावे लागते.

साधु सज्जनांच्या संगतीत, जिथे लहान मुले खेळत असतात तेथे, मंदिरामध्ये, धार्मिक विधी चालू असताना, कथा कीर्तनामध्ये कधीही तोकडे कपडे, देहप्रदर्शन करणारे कपडे घालू नयेत. ते तसे योग्य नाही. तसे म्हणले तर कधीच घालू नयेत. पण विशेषतः अशा ठिकाणी अजिबात घालू नयेत.ज्ञानेश्वर माऊली म्हणतात - "वेश्या लपवी वय, कुलवधू लपवी अवयव" !

तर, दारू पिऊन आपल्या स्त्रियांच्या बरोबर नग्नपणे स्नान करत असताना, नलकुबेर व मणिग्रीव ह्यांच्याइथे नारद मुनी आले. सर्व स्त्रियांनी त्यांचा मान व आदर राखत पटापट कपडे घातले त्यांना वंदन केले. पण दारूच्या नशेत धुंद असणाऱ्या नलकुबेर व मणिग्रीव ना कशाचीही शुद्ध नव्हती, ते तसेच नारदांसमोर आले, धड वंदनही केले नाही. क्रोधायमान होऊन नारद मुनींनी त्यांना शाप दिला की जा वृक्ष व्हाल. जेव्हा त्यांच्या पत्नीनी वारंवार माफी मागितली तेव्हा उ:शाप मिळाला की श्रीकृष्ण तुमचा उद्धार करतील. ह्या नलकुबेर व मणिग्रीव चा उद्धार करण्यासाठी केली ती - दामोदर लीला!

म्हणून ह्या महिन्यात करायचे आहे ते - "दामोदर व्रत" श्रीराधेची उपासना. भगवती राधा ह्या श्रीकृष्णाच्या गुरू आहेत, शुकदेवांच्या पण गुरू आहेत. भगवती राधेच्या उपासनेने श्रीकृष्ण कृपा सहज प्राप्त होते.

दामोदर व्रत करायचे म्हणजे काय? सोप्पे आहे, खालील गोष्टी करायच्या:

1) दीपदान - रोज सकाळी व संध्याकाळी देवाला दीपदान करायचे, म्हणजे तुपाच्या दिव्याने ओवाळायचे. आरती करायची. अनेक यज्ञाचे फळ सांगितले आहे.
2) नृसिंह पूजा व आरती - विष्णुचे नामस्मरण - ह्याचे विशेष महत्त्व आहे.
3) तुळशीची पूजा
4) रोजचा नैवेद्य - देवाला रोज सकाळ व संध्याकाळ नैवेद्य
5) सात्विक आहार अपेक्षित आहे - कांदा, लसूण, मांसाहार विरहित स्वयंपाक, पूर्ण महिना
6) कुठलेही अनैतिक संबध ठेऊ नये
7) श्रीमदभागवत व भगवद्गीता श्रवण, 
8) शास्त्र श्रवण, मंदिर व सत्संग व तीर्थक्षेत्र दर्शन
9) दानधर्म - साधु, संत, ब्राह्मण ह्यांना यथाशक्ती दानधर्म
10) दामोदरअष्टकाचे रोज पठण

भागवत सांगते - भक्ती ही ज्ञान व वैराग्याची जननी आहे, माता आहे. भक्तिशिवाय ज्ञान शुष्क होते आणि भक्ती न करता आलेले वैराग्य विकृतीमध्ये परिवर्तित होते. म्हणूंन भक्ती करा, त्या दामोदराची भक्ती करा. त्याबदल्यात अनमोल असे काही मिळते ते म्हणजे परमात्म्याचे प्रेम!

आपण योगाचे कोर्स करतो, ध्यानाचे कोर्स करतो, झुंबा डान्सचे कोर्स करतो, केक-कुकी बनवण्याचे कोर्स करतो, मेकअप शिकायचा कोर्स करतो. कधीतरी भक्तीचा पण कोर्स करूया. काय माहीत तो दामोदर आपल्याला काय देऊन जाईल! 

हे व्रत कसे करावे?

२६ तारखेला गुरुजींना बोलावून श्रीकृष्णाची षोडशोपचारे पूजन करून १ महिन्याचे दामोदर व्रत करेन असा संकल्प करावा. गुरुजींची व्यवस्था होऊ शकली नाही तर मानसिक संकल्प करून व्रत सुरू करावे. व्रताच्या शेवटी देवाची मनोभावे पूजा करून उत्तम दानधर्म करावा. उत्तम वस्त्र सजनांना दान करावे. शुभं भवतु |

Web Title: Learn how to practice easy and fruitful 'Damodar Vrat' in the month of Kartik!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.