प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून चिरंतन आनंदाचा प्रवास कसा करावा याचा कानमंत्र जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 08:39 AM2024-01-06T08:39:36+5:302024-01-06T08:39:48+5:30

आज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी, त्यांनी दाखवलेला चिन्मयानंदाचा मार्ग आपलाही जीवन प्रवास सुखकर करेल हे नक्की!

Learn the Kanmantra of how to travel to eternal bliss by combining Prapanch and Paramarth! | प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून चिरंतन आनंदाचा प्रवास कसा करावा याचा कानमंत्र जाणून घ्या!

प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून चिरंतन आनंदाचा प्रवास कसा करावा याचा कानमंत्र जाणून घ्या!

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची आज पुण्यतिथी! ज्यांना आपण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणून ओळखतो, त्यांचे पूर्ण नाव, गणपती रावजी गोंदवलेकर. त्यांचा जन्म गोंदवले येथे १८४५ मध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना देवधर्माची आवड होती. त्यांना नामाची अतिशय गोडी होती. ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याचे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून, गुरुंच्या शोधार्थ त्यांनी बरीच भ्रमंती केली. अमर्याद प्रवास केला. अनेकदा काशीला जाऊन आले. नैमिषारण्यातील दऱ्याखोऱ्यांतून ते अनेकदा हिंडले. नर्मदा किनाऱ्यावरील महेश्वर गावातील दोन प्रख्यात मांत्रिकांनी महाराजांना सर्पांनी वेष्टून बांधून ठेवले. परंतु महाराजांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला व त्यांना नामाचा मंत्र दिला.

बेळगावचे थोर ब्रह्मज्ञानी तुकाराम चैतन्य या सद्गुरुंची व महाराजांची भेट झाली. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊन महाराजांना वयाच्या पंधराव्या वर्षी पूर्ण सिद्धावस्था प्राप्त झाली.  रामकृष्णमहाराजांना ते भेटले. त्यांनीच महाराजांना तुकाराम सद्गुरुंकडे जाण्यास सांगितले. त्यांना महाराज शरण गेले. महाराजांना जे हवे होते, ते त्यांना सद्गुरु तुकाराम महाराजांकडे मिळाले. निर्गुणाचा साक्षात्कार, सगुणाचे अलोट प्रेम आणि अखंड नाम एकत्र हवे होते, ते त्यांना सद्गुरुंपाशी मिळाले. ते परमात्मास्वरूप होते. त्यांनी महाराजांवर खूप प्रेम केले.

लहानपणापासून नामाची कृपा महाराजांवर होती. त्यांनी काय करावे याबद्दल त्यांना आतून नामच मार्गदर्शन करी. गोंदवलेकर महाराज म्हणत, `शुद्ध परमात्मास्वरूप सगुण व निर्गुण या दोहींच्या पलीकडे आहे. सगुणाला उपाधीची मर्यादा असते, तर निर्गुणाला ती नसते. मर्यादा व अमर्यादा या दोन्हींचा लोप होऊन जे उरते, ते शुद्ध ब्रह्म होय. ते मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे. सगुणाला उपाधीची मर्यादा असते, तर निर्गुणाला ती नसते. मर्यादा व अमर्यादा या दोन्हींचा लोप होऊन जे उरते, ते शुद्ध ब्रह्म होय. ते मानवी कल्पनांच्या पलीकडले आहे. ते सर्वव्यापी, सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म आहे. ते आहे इतकेच त्यांच्याबद्दल बोलता येते.

ईश्वर हा चिन्मय आहे. जाणीवरूप आहे. तरी तो कर्ता असून, अकर्ता राहतो. सर्व घटना घडवून आणतो. आनंदाने भरलेला ईश्वर माया नावाच्या विलक्षण शक्तीने विश्वाचा व्यवहार करतो. त्याला विसरले की माया छळू लागते. पण स्मरण केले की तीच भक्तीला मदत करते. भगवंताच्या भक्तीने त्याची कृपा होऊन तो मायेतून सुटतो. सर्व सृष्टी पंचमहाभूतांनी बनलेली आहे. ऊँकारातून म्हणजे नादब्रह्मातून तिची उत्पत्ती झाली. ऊँकार म्हणजेच नाम होय. नाम हे सामान्य, सूक्ष्म रुपाने अदृश्य तर रुप हे दृश्य रुपाने स्थूल आहे. अनेक रुपांना एकच नाम व्यापून असते. नामाच्या योगाने वासनेत गुंतलेला जीव बाजूला सरतो. नामस्मरण म्हणजे 'मी भगवंताचा आहे' ही अखंड जाणीव. सद्गुरुंच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने व प्रेमाने नाम घ्यावे. त्यातूनच भगवंताला शरण जाण्याची बुद्धी होते. असे महाराज सांगत. 

प्रपंच सांभाळून भगवंताशी अनुसंधान ठेवण्यासाठी भगवंताचे नाम हे सर्वोष्कृष्ट साधन आहे. यासाठी नामाच्या नादी लागावे म्हणून महाराजांनी अथक प्रयत्न केले. महाराजांनी असंख्य प्रापंचिकांना खऱ्या समाधानाचा, आत्मज्ञानाचा मार्ग दाखविला. 

महाराजांच्या हृदयात विश्वामध्ये व्यापून राहणारा ऊँकार नामाचे रूप घेऊ झणत्कार करीत असे. महाराज सर्वांना सांगत असत, `मी तुमच्याजवळ आहे, असं मी म्हणतो त्यावेळी `मी' ही व्यक्ती नसून परमात्मास्वरूप तुमच्याजवळ आहे, असा त्याचा अर्थ असतो. 

एका नामामध्ये भगवंताच्या दर्शासाठी लागणारे सर्व गुण आहेत. जेथे नाम आहे तेथेच मी आहे. तुम्ही तुमच्यापाशी नाही, इतका मी तुमच्याजवळ आहे. मला हाक मारा की मी पुढे आहेच. तुम्ही सतत नाम घेत रहा म्हणजे तुम्हाला सोडून मला राहताच येणार नाही. मी निर्लेप नामामध्ये राहतो. तुम्ही निर्लेप, निर्विकल्प, नाम घ्या. 

Web Title: Learn the Kanmantra of how to travel to eternal bliss by combining Prapanch and Paramarth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.