रागावर नियंत्रणाचा उपाय भगवद्गीतेच्या अवघ्या दोन श्लोकात जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 12:31 PM2023-05-20T12:31:29+5:302023-05-20T12:32:13+5:30

भगवद्गीता ही मानवी जीवन पद्धतीवर, अडी अचणींवर आणि आदर्श जीवनावर भाष्य करणारी आहे, उदाहरणार्थ हे दोन श्लोक पहा... 

Learn the solution to anger control in just two verses of Bhagavad Gita! | रागावर नियंत्रणाचा उपाय भगवद्गीतेच्या अवघ्या दोन श्लोकात जाणून घ्या!

रागावर नियंत्रणाचा उपाय भगवद्गीतेच्या अवघ्या दोन श्लोकात जाणून घ्या!

googlenewsNext

सद्यस्थितीत प्रत्येक जण हा मानवी बॉम्ब झाला आहे. कधी, कुठे, कोणत्या कारणावरून संतापाचा पारा चढेल आणि स्फोट होईल, हे सांगता येत नाही. संतापाचे  प्रमाण अलीकडच्या काळात जास्तच वाढले आहे. ते वाढण्यामागे कारणेही असंख्य आहेत, पण आपल्याला कारणांचा नाही, तर उपायाचा विचार करायचा आहे. 

असे म्हणतात, की आपल्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे भगवद्गीतेत सापडतात. संतापावर आवर घालण्याचाही उपाय त्यात आहे का, याचा शोध घेतला आणि उत्तर समोर आले. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, 

ध्यायतो विषयान पुंस: संगस्तेषूपजायते,
संगात संजायते काम: कामात् क्रोधोSभिजायते।

नानाविध विषयांमध्ये गुंतून राहणाऱ्या मनुष्याला विषयांची आसक्ती लागते. विषय आत्मउन्नतीचे असतील तर ठीक. अन्यथा वाममार्गाकडे पावले वळली, की  विषय मिळवणे, हे ध्येय बनते. ते ध्येय गाठण्यासाठी असंगाशी संग, म्हणजेच अयोग्य व्यक्तीशी संग करण्याचीही मनाची तयारी होते. त्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहून आपली सदसद्विवेक बुद्धी नष्ट होते आणि दुसऱ्याच्या विचाराने विचार करण्याची सवय लागते. एवढे करूनही आपल्याला हवी असलेली गोष्ट प्राप्त झाली नाही, की क्रोधाची मूळे मनात खोलवर रुजतात आणि...

क्रोधात भवति संमोह: संमोहात स्मृती विभ्रम:
स्मृतिभ्रंशाद बुद्धीनाशो, बुद्धीनाशात् प्रणश्यति।।

क्रोधामुळे आपण प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहू लागतो. इतरांचा मत्सर करू लागतो. आपली मूळ ओळख, मूळ व्यक्तीमत्त्व, मूळ स्वभाव विसरून रागाच्या भरात गैरवर्तन करू लागतो. क्रोधाचे संमोहन एवढे असते, की मनुष्याला स्वत:च्या स्मृतीचा संभ्रम पडू लागतो. रागाच्या भरात वाट्टेल तसे वागतो आणि बरेच काही कमावण्याच्या नादात जे हातात आहे, तेही गमावून बसतो. 

एक उदाहरण बघू. आई मुलाला बाजारात घेऊन जाते. तो मुलगा आईचे बोट धरून नाचत-बागडत बाजारात जातो. वाटेत त्याला खाऊचे दुकान दिसते. तो आईकडे खाऊसाठी हट्ट करतो. आई त्याला नकार देते. तो घुश्श्यातच जड पावलांनी आईबरोबर पुढे पुढे चालतो. एव्हाना त्या शुल्लक चॉकलेटने मुलाच्या डोक्यात घर केले असते, वरून ते मागितल्यावर लगेच मिळाले नाही, याचा रागही असतो. मुलगा ते लक्षात ठेवतो. 

वाटेत पुढचे दुकान लागते. मुलगा पुन्हा हट्ट करतो. आई त्याला डोळ्यांनी दटावते. मुलाला आणखी राग येतो. तो खाऊसाठी अडून बसतो. आईचा हात झटकतो. जोरजोरात रडायला सुरुवात करतो. आई त्याला समजावते. रागे भरते. मुलगा आणखीनच जोरात रडून भर रस्त्यावर फतकल मारून बसतो. गर्दीचे लक्ष जाते. लोक बघतात, हसतात, हे पाहून आईची चरफड होते. ती मुलाला रागाच्या भरात एक धपाटा घालते आणि हाताला धरून फरफटत घेऊन जाते. चॉकलेट तर दूरच, पण मुलगा धपाटा खाऊन वरून भर रस्त्यात स्वत:चाच अपमान करून घेतो. आपले चांगले कपडे खराब करून घेतो आणि आईचा राग ओढावून घेतो, ते वेगळेच! 

तात्पर्य, शहाणा,समजुतदार मुलगा एका छोट्याशा खाऊपायी स्वत:ची ओळख गमावून बसतो आणि रागाच्या भरात आईला अद्वातद्वा बोलू लागतो. याउलट त्याने संयम ठेवला असता, तर त्याची समजुतदारी पाहून आईनेच त्याला खाऊ घेऊन दिला असता. 

परंतु, एवढी समजुतदारी ना मुलामध्ये असते ना आपल्यामध्ये. म्हणून तर पावलोपावली राग राग करून आपण स्वत:ची किंमत करून घेतो आणि रागाच्या भरात आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसान करून बसतो. 

यावर उपाय एकच आहे, ज्याक्षणी राग येईल, त्याक्षणी प्रतिक्रिया देणे टाळावे आणि डोकं थंड व मन शांत झाल्यावर प्रतिसाद द्यावा. असे केल्यामुळे, रागाची तीव्रता कमी होते आणि मनात उठलेल्या अनेक वादळाचा क्षणात निचरा होतो. म्हणून क्रोधाचा क्षण आवरणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तो आवरणे सर्वस्वी आपल्याच हाती आहे.

Web Title: Learn the solution to anger control in just two verses of Bhagavad Gita!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.