देवाने काय दिले नाही, याऐवजी काय दिले आहे, याचा विचार करायला शिका!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 02:01 PM2021-05-14T14:01:48+5:302021-05-14T14:02:13+5:30
कठीण काळात मदत करता आली नाही, तर विनाकारण चिथवु नका!
एक अपंग भिकारी रस्त्याच्या कडेला भीक मागत बसलेला असतात. तिथेच काही अंतरावर एक तरुण मुलगा आपल्या मित्राची वाट बघत उभा असतो. मित्र येईपर्यंत तो भिकाऱ्याचे निरीक्षण करत असतो. आपला वेळ घालवण्यासाठी तो भिकाऱ्याजवळ जातो आणि त्याला म्हणतो, `तुला मी काही विचारले तर चालेल का?'
`चालेल विचारा!'
`तुला दोन्ही हात नाहीत, लोक तुला भीक टाकून निघून जातात, पण या पैशांच्या मोबदल्यात तुला अन्न कोण देते?'
`याच परिसरात आणखी एक भिकारी आहे. तो अन्न मागून आणतो, त्या मोबदल्यात त्याला मी जमलेले पैसे देतो. तो मला अन्न देऊन निघून जातो.'
`अच्छा! पण तुला तर हात नाहीत, मग समोर ठेवलेले अन्न तू कसे खातोस?'
`मी रस्त्याने येणाजाणाऱ्यांना म्हणतो, तुमचे दोन्ही हात सलामत राहोत, पण मला कोणीतरी दोन घास भरवा. हे ऐकून अनेक जण दुर्लक्ष करतात, तर काही जण भरवायला येतात. अगदी सलग दहा दिवस येतात. त्यामुळे रोजची सोय होते.'
`हे झाले भूकेचे, पण तहानही लागत असेल ना? मग?'
`माझ्याकडे पाण्याचा माठ आहे. तो माठ मी थोडा तिरपा करुन परसरट भांड्यात पाणी ओततो आणि जनावरांसारखे जीभ लावून पाणी पितो.'
`तुला घर दार नाही, मग इथल्या घाणेरड्या परिसरात तुला झोपेत डास चावत असतील नाही? हात नसताना तू कसे निभावतोस?'
`त्याही बाबतीत मी प्राण्यांसारखा जमिनीवर लोळून कंड शमवतो. जसे जमेल तसे आयुष्य जगतो.'
`पण या जगण्याला का जगणे म्हणायचे? तुझे जीवन, तुझा देह व्यर्थ आहे, असे नाही का वाटत?'
इतकावेळ शांत बसलेला भिकारी चिडतो आणि म्हणतो `मला देवाने जे दिले आहे, त्यात मी समाधानी आहे. याउलट धडधाकट शरीर असणारे तुमच्यासारखे लोक दुसऱ्याची मदत तर करत नाहीच, शिवाय त्यांची खिल्ली उडवायलाही धजावत नाहीत. तुमच्यासारख्या लोकांना संपूर्ण देह मिळून काय उपयोग झाला? त्यापेक्षा अपंग असूनही मी बरा. मी कधीच देवाकडे तक्रार करत नाही. संकटात संधी शोधत असतो आणि शांत निरोगी आयुष्य जगत असतो.