वाद राहू द्या; शंकराचार्यांची निवड कोणातर्फे होते व त्यांचे अधिकार कोणकोणते, ते आधी जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 05:16 PM2024-01-17T17:16:20+5:302024-01-17T17:19:20+5:30

Ayodya Ram Mandir: अयोध्या राम मंदिरावरील वक्तव्यामुळे शंकराचार्यांबद्दल विविध चर्चा सुरू आहेत, पण त्यांचे बोलणे त्यांना बहाल केलेल्या अधिकारात येते का? ते पाहू. 

Let the controversy rest; Find out first by whom the Shankaracharyas are selected and what are their rights! | वाद राहू द्या; शंकराचार्यांची निवड कोणातर्फे होते व त्यांचे अधिकार कोणकोणते, ते आधी जाणून घ्या!

वाद राहू द्या; शंकराचार्यांची निवड कोणातर्फे होते व त्यांचे अधिकार कोणकोणते, ते आधी जाणून घ्या!

अयोध्येमध्ये रामलल्लाच्या स्थापनेचा एवढा मोठा धार्मिक विधी पार पडत असताना शंकराचार्यांच्या नावे जनमानसात शिमगा सुरू आहे. मुहूर्त, पुजा विधी, यजमान पद, आमंत्रण अशा अनेक विषयांवरुन शंकरचार्य अधून मधून आपले मत नोंदवत आहेत.मात्र, पूर्ण देशभरात रामलल्लाच्या स्वागताची तयारी होत असताना शंकराचार्यांची कार्यक्रमाला अनुपस्थिती वादाला कारणीभूत ठरू शकते. तरीदेखील मुख्य  सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार हे आगामी काळच सांगेल. 

देशभरात राम मंदिराच्या अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. मंदिर ट्रस्टकडून देशातील ज्येष्ठ मान्यवर आणि संतांना अभिषेकासाठी निमंत्रणेही पाठवण्यात आली आहेत. त्यात चार पिठाच्या शंकराचार्यांनाही आमंत्रण आहे. मात्र २२ जानेवारी रोजी पूर्व नियोजित कामांमुळे त्यांना उपस्थित राहता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. एवढेच काय, दोन ठिकाणच्या शंकराचार्यांनी आशीर्वचने देखील पाठवली आहेत. परंतु,  त्यावर उलट सुलट चर्चा होऊन त्यांचा या कार्याला विरोध असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अकारण टीकेचा सुर लागला आहे. त्यानिमित्ताने आपणही शंकराचार्य आणि त्यांचे कार्य, वास्तव्य आणि अधिकार याबद्दल जाणून घेऊ. 

शंकराचार्य म्हणजे कोण?

धार्मिक मान्यतेनुसार आदि शंकराचार्यांनी मठांची सुरुवात केली.ते एक हिंदू तत्वज्ञानी आणि धार्मिक व्यक्तिमत्त्व होते,त्यांना जगद्गुरू म्हणूनही ओळखले जाते. त्यांना सनातन धर्माचे संरक्षण आणि प्रसार करायचा होता. कर्ममार्गी कर्मठ गृहस्थ केवळ कर्मकांड करून स्वर्गप्राप्ती याच निष्ठेत जगत होते , अशा लोकांना हे समजावून देणे कि धर्माचा उद्देश केवळ अर्थ आणि कामापुरता नसून मोक्ष हे त्याचे मूळ उद्दिष्ट आहे. समाजाचा उद्धार करण्यासाठी आचार्यांना धर्माची पताका हातात घ्यावी लागली. शैव ,शाक्त , इत्यादि मतमतांतरे हि पूर्ण ज्ञानाच्या अभावामुळे परस्पर वैमनस्य उत्पन्न करीत होती , त्यांच्यात एकवाक्यता आणण्यासाठी आचार्यांनी समाजाला पंचायतन पूजेची संकल्पना दिली. अशी अनेक कारणे आहेत. या कार्याचा विस्तार वाढवण्यासाठी त्यांनी देशाच्या चारही दिशांना स्थापन केलेल्या मठांची जबाबदारी आपल्या चार मुख्य शिष्यांवर दिली. या मठांच्या प्रमुखाला शंकराचार्य म्हणतात.शंकराचार्यांना सनातन धर्मात सर्वोच्च मानले जाते.

शंकराचार्य पीठ म्हणजे काय?

सनातन धर्मानुसार, मठात गुरु आपल्या शिष्यांना सनातन धर्माचे शिक्षण आणि ज्ञान देतात. तिथे आध्यात्मिक शिक्षण दिले जाते. यासोबतच मठांमध्ये जीवनातील काही महत्त्वाच्या बाबी, समाजसेवा,साहित्य इत्यादींचे ज्ञानही मिळते. द्वारका, ज्योतिष, गोवर्धन आणि शृंगेरी पीठ हे देशातील चार प्रमुख मठ आहेत.संस्कृतमध्ये मठांना पीठ म्हणतात. म्हणून तेथील जबाबदारी सांभाळणार्‍या शंकराचार्यांना पिठाधीपती म्हणतात. 

शंकराचार्य कसे निवडले जातात?

त्यागी, दंडी संन्यासी, संस्कृत, चतुर्वेद, वेदांत ब्राह्मण, ब्रह्मचारी आणि पुराणांचे ज्ञान असणे ही शंकराचार्य पदासाठी योग्यता असावी लागते.शंकराचार्य होण्यासाठी चारही वेद आणि सहा वेदांगांचे ज्ञान असणारे ब्राह्मण असणे अनिवार्य आहे. ज्यांना शंकराचार्य बनवले जाते त्यांना आखाड्यांचे प्रमुख,आचार्य महामंडलेश्वर,नामवंत संतांची सभा आणि काशी विद्वत परिषदेच्या मान्यतेची शिक्कामोर्तब आवश्यक असते.यानंतरच शंकराचार्य ही पदवी मिळते.

देशाचे प्रमुख शंकराचार्य कोण आणि कोणत्या मठात आहेत?

गोवर्धन मठ : ओडिशाच्या पुरी राज्यात गोवर्धन मठाची स्थापना केली आहे. गोवर्धन मठातील भिक्षूंच्या नावावरून ‘अरण्य’ संप्रदाय हे नाव लावले जाते.निश्चलानंद सरस्वती हे या मठाचे शंकराचार्य आहेत. या मठात 'ऋग्वेद' ठेवण्यात आला आहे. गोवर्धन मठाचे पहिले मठाधिपती पद्मपद आचार्य हे आदि शंकराचार्यांचे पहिले शिष्य होते.

शारदा मठ: शारदा मठ द्वारकाधाम,गुजरात येथे स्थित आहे.सदानंद सरस्वती हे शारदा मठाचे शंकराचार्य आहेत.या मठातील भिक्षूंच्या नावावरून तीर्थ किंवा आश्रम हे नाव पडले आहे. या मठात 'सामवेद'ठेवण्यात आला आहे. शारदा मठाचे पहिले मठाधिपती हस्तमालक (पृथ्वीधर) होते.

ज्योतिर्मठ : ज्योतिर्मठ उत्तराखंडच्या बद्रिकाश्रमात आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे या मठाचे शंकराचार्य आहेत. या मठात अथर्ववेद ठेवलेला आहे. या मठाचे पहिले मठाधिपती त्रोटकाचार्य होते.

शृंगेरी मठ : शृंगेरी मठाची स्थापना दक्षिण भारतातील रामेश्वरम येथे आहे. या मठातील भिक्षूंच्या नावांमागे सरस्वती किंवा भारती वापरली जाते. जगद्गुरू भारतीतीर्थ हे या मठाचे शंकराचार्य आहेत.या मठात 'यजुर्वेद' ठेवण्यात आला आहे. या मठाचे पहिले मठाधिपती आचार्य सुरेशवराचार्य होते.

चारही पिठाचे शंकरचार्य गोरक्षण ते अखंड भ्रमण करून जनसंपर्क वाढवत धर्माचे कार्य करत असतात. त्यांच्या संकेत स्थळावर त्यांच्या कामाचा तपशीलदेखील बघायला मिळतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजीचा सुर लावण्याची आवश्यकता नाही. त्यांचे आशीर्वाद पाठीशी असून हा सोहळा उत्तम रित्या पार पडणार असे पदाधिकार्‍यांचे सांगणे आहे. 

Web Title: Let the controversy rest; Find out first by whom the Shankaracharyas are selected and what are their rights!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.