जपानी रेकी शास्त्र आणि आरती ग्रहण करणे यात नेमके काय साम्य आहे, चला जाणून घेऊया!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 12:48 PM2022-05-14T12:48:07+5:302022-05-14T12:48:28+5:30
रोज आरतीग्रहण करणाऱ्या व्यक्तीचे मुख व नेत्र तेज:पुंज तर होतातच शिवाय कालांतराने त्याच्या हातातून वाहणाऱ्या वैश्विक लहरीदेखील अधिकाधिक प्रभावी होत जातात.
मंदिरातील व घरातील देवपूजा झाल्यानंतर तीर्थप्रसादाइतकेच महत्त्व आरतीग्रहणास आहे. विष्णुधर्मोत्तरपुराण सांगते,
यथैवोर्ध्वगतिर्नित्यं राजन् दीपशिखा शुभा
दीपदातुस्तथैवोर्ध्वगतिर्भवति शोभना।
अर्थात दिव्याची ज्योती ज्याप्रमाणे नित्य ऊर्ध्वगतीने तेवत असते, त्याप्रमाणी दीपदान करणारे साधक आध्यात्मिकदृष्ट्या उच्चपातळीवर असतात.
नीराजनबलिविष्णोर्यस्य गात्राणि संस्पृशेत्
यज्ञलक्षसहस्त्राणां लभते स्नानजं फलम्
अर्थात, देवाच्या नीरांजनातील ज्योतीचा स्पर्श ज्यांच्या विविध गात्रांना होतो त्या व्यक्तींना लाखो यज्ञातील अवभृतस्नानाचे फळ मिळते असे स्मृतिवचन आहे. हे विधान थोडे अतिशयोक्तीचे वाटत असले, तरी यावरून आरतीग्रहण किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते.
आरतीग्रहण विधी :
देवाची आरती झल्यावर नीरांजनाच्या ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून त्यांचा विविध गात्रांना (अवयवांना) स्पर्श करणे हे विधियुक्त आरतीग्रहण म्हटले जाते. एकदा आरतीग्रहण केल्यावर ते निरांजन पुन्हा देवाला ओवाळू नये. कापूरार्तीचे आरतीग्रहण वज्र्य मानले जाते. कारण कापराच्या काजळीने हात काळा होऊन तो चेहऱ्याला लागू शकतो. म्हणून तेलाच्या तसेच कापराच्या आरतीचे ग्रहण करू नये.
आरतीग्रहण हे देवाला ओवाळल्या जाणाऱ्या केवळ तुपाच्या नीरांजनानचेच करावे. नीरांजनासाठी शुद्ध साजूक तूप व देवकापसाच्या वाती वापरल्यास आरतीग्रहण अधिकाधिक लाभदायी ठरते.
आरतीग्रहण मुख्यत: नेत्र, मुख, मस्तक या अवयवांना होत असले तरी विशेषकरून व्याधा वा सूज असलेल्या अवयवांना केलेला आरतीग्रहणाचा हस्तस्पर्श आरोग्यदायी ठरतो. कारण, मानवी शरीरात प्रविष्ट होणाऱ्या वैश्विक लहरी तळहातामधून निघतात. देवाला ओवाळलेल्या आरतीची ऊर्जा तळहाताद्वारे शरीराला दिली जाते व ती अधिक परिणामकारक ठरते.
जपानी रेकीशास्त्र आणि आरतीग्रहण यात साम्य आहे. रोज आरतीग्रहण करणाऱ्या व्यक्तीचे मुख व नेत्र तेज:पुंज तर होतातच शिवाय कालांतराने त्याच्या हातातून वाहणाऱ्या वैश्विक लहरीदेखील अधिकाधिक प्रभावी होत जातात.