योगसाधनेने अमोघ आत्मशक्ती प्राप्त करू या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 11:32 PM2020-06-20T23:32:30+5:302020-06-20T23:37:59+5:30
भारताचे योगशास्र, स्थिरचित्तता व मानसिक शांतीचे भारताचे तत्त्वज्ञान, आरोग्यदायी भारतीय पाकशास्र या सर्वांचा या संकटातून बाहेर पडण्यासाठी जगभरातील लोकांना निश्चितच उपयोग होईल.
- एम. व्यंकय्या नायडू
सध्याच्या कोरोना संकटामुळे पूर्वापार चालत आलेल्या भारतीय चालीरितींचे महत्त्व आता जगाला पटू लागले आहे. हस्तांदोलनाऐवजी नमस्ते करून स्वागत करण्याची भारतीय पद्धत आता जगाने स्वीकारली आहे. सध्याची महामारी हे अलीकडच्या काळात जगापुढे उभे ठाकलेले सर्वांत मोठे आरोग्यसंकट आहे. भारताचे योगशास्र, स्थिरचित्तता व मानसिक शांतीचे भारताचे तत्त्वज्ञान, आरोग्यदायी भारतीय पाकशास्र या सर्वांचा या संकटातून बाहेर पडण्यासाठी जगभरातील लोकांना निश्चितच उपयोग होईल.
योगाचा अर्थच मुळात शरीर व मनाचा समन्वित संगम असा आहे. सन २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघापुढे मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य प्राचीन भेट असल्याचे म्हटले होते. योगामुळे शरीर व मन, विचार आणि कृती, संयम व तृप्तता, माणूस आणि निसर्ग यांच्यात मिलाफ साधला जातो व योग ही सर्वांगीण आरोग्यसंपन्नतेची दृष्टी आहे, यावर त्यांनी भर दिला होता. भारताचा हा प्रस्ताव १७५ देशांच्या पाठिंब्याने मंजूर होऊन दरवर्षी २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ म्हणून साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने ठरविले होते.
कोरोनामुळे समोर आलेल्या अनिश्चिततेच्या व चिंतेच्या काळात मानसिक शांती व शारीरिक तंदुरुस्ती कायम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग हे प्राचीन भारतीय विज्ञान गेल्या काही दशकांत जगभर खूप लोकप्रिय झाले आहे. व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्य कायम राखण्यासाठी योग हा एक प्रभावी मार्ग आहे. आज २१ जून रोजी जगभर आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला जात असताना व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात योग कशी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, हे आपण समजून घ्यायला हवे.
सध्याच्या संकटकाळात व्यक्तींना व देशांना विविध पर्यायांची निवड करताना खूप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आयुष्य आणि चरितार्थ, ‘लॉकडाऊन’ आणि निर्बंध शिथिल करणे, एकांतवास आणि संवाद, बैठी दिनचर्या व तब्येत तंदुरुस्त ठेवणे अशी ओढाताण प्रत्येकाला करावी लागत आहे. नेहमीच्या भेटीगाठी न घेता, शरीराला व्यायाम न देता व मौज-मनोरंजनाशिवाय आपल्याला सक्तीने घरात बसावे लागत आहे. या महामारीमुळे आपल्या आयुष्यात जो तणाव निर्माण झाला आहे तो कमी करण्याचा योग हा रामबाण उपाय ठरू शकतो. कारण योग हे शारीरिक तंदुरुस्तीचे शास्र आहे.
योग ही जीवनाकडे पाहण्याची एक दृष्टी आहे. यात अतिरेक टाळून अवयवांच्या सुनियंत्रित हालचालींनी शरीराचा डौल व सौष्ठव टिकवून ठेवले जाते. ‘समत्वम् योगा उच्चते’ (योग म्हणजेच संतुलन), असे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानेही अर्जुनाला सांगितले होते. योगामुळे तंदुरुस्तीसोबतच शरीराचा लवचीकपणा वाढविणे, मन प्रफुल्लित ठेवणे व ताण-तणाव कमी करणे हे योगाचे फायदे लक्षात घेऊनच जागतिक आरोग्य संघटनेने यंदाच्या आंतरराष्ट्रीय योगदिनासाठी ‘घरी योग, कुटुंबासमवेत योग’ हे मुख्य सूत्र ठरविले आहे. योगाचे फायदे अनेक वैज्ञानिक अभ्यासांनी सिद्ध झाले आहेत. नियमित योगासने केल्याने हृदयविकारापासून पाठीच्या दुखण्यापर्यंत अनेक व्याधी बऱ्या होतात, असे दिसून आले आहे. ‘कोविड-१९’ महामारीच्या वाढत्या प्रकोपामध्ये खासकरून ज्यांना अधिक धोका आहे अशा दमा, उच्चरक्तदाब व मधुमेह यांसारखे जुनाट आजार असणाऱ्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग हा उत्तम पर्याय आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे वाढत असलेल्या नैराश्य, तणाव व चिडचिडेपणा या समस्यांवरही योगाने फायदा होऊ शकतो. जीवनातील ताण-तणाव आणि दडपणे सहन न झाल्याने तरुण व्यक्तींच्या आत्महत्यांच्या बातम्या वाचतो तेव्हा मी खूप व्यथित होतो. हे असे मृत्यू पूर्णपणे टाळता येण्यासारखे आहेत. योग व ध्यानसाधनेने असे मृत्यू टळू शकतात. ‘हार्वर्ड मेंटल हेल्थ लेटर’च्या ताज्या आवृत्तीत योगासनांच्या अभ्यासातून असे मत नोंदविले गेले आहे की, योगामुळे अतिताणाची अवस्था कमी होते व नैराश्य आणि उतावीळपणाही त्याने कमी होतो. आपसूक चित्तवृत्ती स्थिर करणाºया ध्यानधारणा, तणाव कमी करण्याचे व्यायाम किंवा अगदी मित्रमंडळींच्या भेटीगाठींनी मिळणारे फायदेही योगाने मिळू शकतात.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे परस्परांशी केवळ निगडितच नाही, तर खरे तर एकाच गोष्टीच्या दोन बाजू आहेत, हे योगाच्या वैज्ञानिक अभ्यासाने सिद्ध झाले आहे. सर्वांगीण आरोग्यसंपन्नतेचा योग कमीतकमी धोक्याचा व जास्तीतजास्त फायदे देणारा मार्ग आहे, याचेही वाढते पुरावे वैज्ञानिक देत आहेत. खरे तर, ‘युनिसेफ किड पॉवर’मध्ये १३ प्रकारच्या योगिक क्रियांचा समावेश केला गेला आहे. सध्याच्या महामारीमुळे विद्यार्थ्यांचे सध्या फक्त आॅनलाइन वर्ग घेतले जात असल्याने त्यांत योगाचा समावेश करावा, अशी माझी सूचना आहे. ‘कोविड’चा धोका कायम असल्याने आपण सर्वांनी सुरक्षित राहायला हवे. रोगप्रतिकारशक्ती वाढवून आपण शरीराने चपळ व मनाने शांत राहायला हवे. भारतात आपल्याला शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीचे व्यवहार्य उपाय उपलब्ध आहेत, हे आपले भाग्य आहे. त्यादृष्टीने योग हे साधे-सोपे पण तरीही प्रबळ साधन आहे. आपल्या पारंपरिक आहारांमध्ये वापरले जाणारे मसाले व औषधी वनस्पती ही आपली आणखी एक जमेची बाजू आहे. रोजच्या स्वयंपाकात हळद, आले, लसूण, काळी मिरी व दालचिनीचा उपयोग केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते.
(भारताचे उपराष्ट्रपती)