'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' असे आपण म्हणतो; या महिन्याची ओळख करून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 07:00 AM2024-03-11T07:00:00+5:302024-03-11T07:00:03+5:30

आजपासून फाल्गुन मास सुरू होत आहे, या महिन्यातील सण, वार, उत्सवाची माहिती करून घेऊया. 

Let's get to know about falgun month! | 'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' असे आपण म्हणतो; या महिन्याची ओळख करून घेऊ!

'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' असे आपण म्हणतो; या महिन्याची ओळख करून घेऊ!

हिंदू पंचांगानुसार चैत्र-वैशाखादी मासगणनेतील फाल्गुन हा शेवटचा बारावा महिना! या महिन्यात होळी, धुलिवंदन हे सण वगळता अन्य कोणतेही सण, व्रते येत नाहीत, तसेच कोणतेही शुभकार्य करत नाहीत, म्हणून अडगळीसारखा वाटणाऱ्या या मासाला 'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' असे उपरोधिकपणे म्हटले जाते. कारण, या मासामुळे शुभकार्य खोळंबतात. ११ मार्चपासून फाल्गुन मास सुरू होत आहे. 

या महिन्यातील पौर्णिमेला किंवा तिच्या आधी किंवा नंतर पूर्वा फाल्गुनी हे नक्षत्र असते, म्हणून या मासाला 'फाल्गुन' अशी ओळख मिळाली आहे. या मासाचे पूर्वीचे नाव 'तपस्य' असे होते. पुढे पुढे नक्षत्राची ओळख त्या महिन्याला मिळू लागली. 

हा शिशिर ऋतूचा दुसरा महिना असून या महिन्यात उत्तरायण असते. या महिन्याच्या पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथी मन्वादि आहेत. मन्वादि तिथी म्हणजे ज्या तिथीला सृष्टीचा पुन: आरंभ झाला असे मानले जाते, त्याला मन्वंतर किंवा मन्वादि तिथी असे म्हणतात. या तिथीला शिव आणि शक्तीची विशेष उपासना केली जाते. 

दक्षिण भारतात फाल्गुन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तेथील देवळांमध्ये लहान-मोठे सर्व उत्सव फाल्गुन महिन्यात केले जातात. तसेच फाल्गुन महिन्यात येणारा होळी-रंगपंचमी-धुळवड हा सण सबंध देशात उत्साहाने साजरा केला जातो. वाईट विचार, आचार यांचे होलिकेत दहन करून नव्या रंगात, नव्या उत्साहात पाच दिवस रंगपंचमी खेळली जाते. 

गोकुळात असताना भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसमवेत रंगपंचमी खेळल्यामुळे या उत्सवाला धार्मिक, आध्यात्मिक आणि भावनिकदृष्ट्यादेखील विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रीकृष्णाच्या प्रेमरंगात रंगलेल्या गोपिका रंगपंचमीला श्रीकृष्णाशी रंगोत्सव खेळतात. तोच उत्साह सर्व वयोगटातील लोकांमध्ये आजही दिसून येतो. मनातील अढी सोडून सगळे जण एका रंगात रंगून जातात.

असा हा फाल्गुन पुरणपोळीचा गोडवा देणारा, विविध रंगांनी आयुष्य रंगवून टाकणारा आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज करणारा महिना आहे. 

Web Title: Let's get to know about falgun month!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.