'कुंकू-टिकली' या वादाला थोडी बगल देऊया आणि कपाळावर गंध लावण्याचे महत्त्व समजून घेऊया!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 12:10 PM2021-10-23T12:10:57+5:302021-10-23T12:12:22+5:30

पूर्वीपासून स्त्री-पुरुष कपाळावर गंध लावीत असत़ त्याची जागा आता टिकल्यांनी घेतली. परंतु, गंध लावण्यामागे शास्त्रीय कारणेदेखील आहेत.

Let's ignore the 'Kunku-Tikli' argument and understand the importance of Tilak on the forehead! | 'कुंकू-टिकली' या वादाला थोडी बगल देऊया आणि कपाळावर गंध लावण्याचे महत्त्व समजून घेऊया!

'कुंकू-टिकली' या वादाला थोडी बगल देऊया आणि कपाळावर गंध लावण्याचे महत्त्व समजून घेऊया!

googlenewsNext

गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर 'कुंकू-टिकली आणि नामांकित कंपन्यांच्या जाहिराती' यावर वाद रंगला आहे. नेहमीप्रमाणे वादाला खतपाणी घालणारे दोन गट पडले आहेत. त्यावर चर्चा सुरू आहेत, अरेरावीदेखील सुरू आहे. स्क्रिनशॉटचा धुमाकूळ सुरू आहे. आपण या वादात न पडता कुंकू किंवा टिकलीचे मूळ अर्थात गंध ते रोज का लावावे, त्याचे महत्त्व काय आणि फायदे कोणकोणते हे जाणून घेऊ. 

'देह देवाचे मंदिर' असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो, त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरीभावाकडे खेचणारे असते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील, तरच देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजे देहमंदिराचे स्तंभ आहेत. 

या देहात भगवंत नित्य वास करतो. या देहस्थित मूर्तीस गंध लावणे, म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे. ज्या संसारी माणसांना पूजेसाठीदेखील वेळ नसतो, त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करावी. 

गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे, गंध लावताना अंगुलीस्पर्श होतो. ही अंगुली मध्यमाच असावी, म्हणजे मधले बोट असावे. त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे. अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात. 

गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे, गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही. कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो. सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर, आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते. जणू काही, आपल्या प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणारा तो सीसीटीव्ही कॅमेरा असतो आणि त्याचा ऑपरेटर हृदयसिंहासनावर विराजमान झालेला असतो. आपण कोणाच्या निगराणीत आहोत, हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही, त्याप्रमाणे `माझ्याकडे देव माझा पाहतो आहे' ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते. 

गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाजदेखील संस्कृतीरक्षक या भूमिकेतून पाहतो. ही केवळ धार्मिक खूण नाही, तर स्वत:च्या अस्तित्वाची स्वत:ला करून दिलेली जाणीव असते. म्हणून हिंदूधर्माने आणि आर्यसंस्कृतीने तिलकविधीला धर्मात स्थान दिले आहे.

पूर्वीपासून स्त्री-पुरुष कपाळावर गंध लावीत असत़ त्याची जागा आता टिकल्यांनी घेतली. परंतु, गंध लावण्यामागे शास्त्रीय कारणेदेखील आहेत. गंध केवळ सुगंधी म्हणून नाही, तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंदन इ. विविध पदार्थांनी युक्त असते. आपले मस्तक शांत राहावे, गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील दोन भुवयांच्या मध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे, यासाठीदेखील गंध लावले जाते. 

तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव, मनाची निर्मळता, सात्विकता, सोज्वळता इ. सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते. कोणाही सुवासिनीने हळद-कुंकाची लावलेली दोन बोटं तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात. कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, गुरुजी, पुरोहित मंडळी अबीर, चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात. तो पाहता त्यांच्याही चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात. पूर्वीदेखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळवून परत आल्यावर मधल्या करांगुलीने कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जाई. त्याला विजयतिलक म्हटले जात असे. त्यालादेखील बहुमान होता. बहीण भावाला, पत्नी पतीला, आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यशस्वी व्यक्तीचेही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावे म्हणून गंध लावले जाते. एवढेच काय, तर पालीवर प्राणी, नवीन वस्तू, नवीन वास्तू यांनादेखील गंध लावून पूजन केले जाते. 

अशा रितीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंत:पुरातील देवाची पूजा करून त्याच्या साक्षीने सत्कार्य करीत राहावे.

Web Title: Let's ignore the 'Kunku-Tikli' argument and understand the importance of Tilak on the forehead!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.