एकमेकांना आधार देत सगळ्यांनी प्रगती करा, हीच आहे भगवान बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांची शिकवण!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 10:39 AM2023-12-06T10:39:57+5:302023-12-06T10:40:17+5:30
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आहे, त्यांनी ज्याप्रमाणे बुद्ध पंथांवर चालत सर्वांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले तसे आपणही करूया.
आपल्या प्रत्येकाला, आयुष्यात पुढे जाताना एक धीर देणारा हात, आश्वासक शब्द किंवा कोणाचातरी पाठींबा हवा असतो. कोणाचा एक शब्द आपल्याला जगण्याचे बळ देऊन जातो. ही गरज जशी आपल्याला असते, तशी अन्य कुणालाही असू शकते. म्हणून आपणही कोणासाठी प्रोत्साहन देण्याची जबाबदारी स्वीकारली केली पाहिजे.
भगवान बुद्ध त्यांच्या उतार वयातही प्रवचनासाठी, प्रबोधनासाठी, लोककल्याणासाठी गावोगाव फिरत असत. या प्रवासात सोबत त्यांचा शिष्य आनंददेखील होता. प्रवासात चालता चालता भगवान बुद्ध खूपच थकले होते. परंतु, ते शिष्याला म्हणत होते, `हरकत नाही, थोडेच अंतर शिल्लक आहे. आपण लवकरच पोहोचू.'
वाटेत त्यांना एक शेत लागले. तिथे एक शेतकरी राबत होता. आनंदने त्याला थांबवले आणि विचारले, `गाव आणखी किती दूर आहे?' त्याने भगवान बुद्धांकडे पाहिले. स्मित केले आणि आनंदकडे बघत शेतकरी म्हणाला, `फार दूर नाही, दोन किलोमीटर दूर आहे.'
ते दोघे चालू लागले. दोन किलोमीटरच्या वरचे अंतर चालून पार झाले. तरीही गाव दिसेना. वाटेत एक बाई दिसली. आनंदने त्यांना थांबवले आणि विचारले, `गाव आणखी किती दूर आहे?' त्या बाईने भगवान बुद्धांकडे पाहिले. ती हसली आणि आनंदला म्हणाली, `जवळ आलेच म्हणून समजा. दीड दोन किलोमीटर दूर असेल फार तर...'
आनंद पाय आपटत चालू लागला. भगवान बुद्ध त्याच्याकडे पाहून हसत होते. वास्तविक पाहता तेही थकले होते. परंतु दोघे जण थकत भागत पुढचा प्रवास करत होते. दोन तीन किलोमीटर अंतर संपत आले, तरीही गावाचा पत्ता नाही. आनंदने आणखी एका वाटसरूला थांबवत गाव किती दूर आहे, हे विचारले. त्यानेही तेच उत्तर दिल्यावर शेवटी आनंदने वैतागून हातातली गाठोडी रस्त्यावर टाकली आणि भगवान गौतम बुद्धांची क्षमा मागून म्हणाला, `गुरुदेव, मी आणखी नाही चालू शकत. मी खूप थकलो आहे. गाव जवळच आहे या आशेवर इथवर चालत आलो, परंतु आणखी चालवणार नाही.'
भगवान हसले आणि म्हणाले, `काहीच हरकत नाही आनंद. तसेही गाव इतक्यात येणार नाही. कारण ते आणखी वीस किलोमीटर दूर आहे.'
'आणखी वीस किलोमीटर? म्हणजे तुम्ही इथे आधी येऊन गेला आहात? मग हे लोक माझ्यासी खोटं का बोलले? आणि तुमच्याकडे पाहून का हसले?' आनंद प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारू लागला.
भगवान म्हणाले, `हो, मी यापूर्वी इथे येऊन गेलो आहे. परंतु तुला इथे येण्याआधीच मी ते गाव इतके दूर आहे सांगितले असते, तर तू इथपर्यंत आला नसतास. तुला धीर मिळावा, चालण्याचे बळ मिळावे, म्हणून मी आणि वाटेत भेटलेले गावकरी तुला प्रोत्साहन देत होतो. त्यामुळेच वीस किलोमीटरपैकी सहा किलोमीटर अंतर आपण पारही केले. आज रात्री आपण इथेच एका झाडाखाली विश्रांती घेऊया. मग पुढचा प्रवास करूया. आजच्या प्रवासात तुला मिळालेली शिकवण कायम लक्षात ठेव आणि तू सुद्धा इतरांना प्रोत्साहन देत जा.'
हीच शिकवण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लक्षात ठेवली आणि समस्त बहुजन वर्गाला प्रगती पथावर नेण्यासाठी कटिबद्ध झाले. त्यांचे कार्य पुढे नेणे ही आपलीही जबाबदारी आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने आपणही स्वतःबरोबर इतरांचीही प्रगती करूया आणि हे जग अधिक सुंदर बनवूया.