मन शांत नसते तेव्हा काय केले पाहिजे, हे जाणून घेऊया भगवान बुद्धांच्या प्रेरक कथेतून...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 09:00 AM2021-06-07T09:00:00+5:302021-06-07T09:00:04+5:30
मन अशांत असताना मेंदू काम करत नाही आणि त्यावेळेस घेतलेले निर्णय हमखास चुकतात. म्हणून मनाचा तलाव शांत होऊ द्यावा नंतरच विचारांची तहान भागवावी.
एकदा भगवान बुद्ध त्यांच्या शिष्यांसमवेत एका गावातून दुसऱ्या गावी प्रवास करत होते. बराच वेळ प्रवास झाल्यावर एका वटवृक्षाच्या छायेत भगवान आपल्या शिष्यांसमवेत बसले आणि एका शिष्याला म्हणाले, `या गावात एक तलाव आहे, तिथून घडाभर पाणी सर्वांसाठी घेऊन ये. खूप तहान लागली आहे.'
शिष्य नम्रपणे उठला. घडा घेऊन तलावाजवळ गेला. तिथे पाहिले, तर गावकरी त्या तलावाचा पुरेपुर वापर करत होते. कोणी तिथे म्हशी धुवत होते, तर बायका कपडे धुवत होत्या. लहान मुले पाण्यात डुंबत होती. इतके अस्वच्छ पाणी भगवान बुद्धांना कसे बरे द्यावे, या विचाराने शिष्य रिकामा घडा घेऊन भगवान बुद्धांजवळ आला आणि झुकलेल्या नजरेने म्हणाला, `भगवान, ते पाणी पिण्यासाठी योग्य नाही.'
भगवान म्हणाले, `हरकत नाही. तुही दमला असशील. आमच्याबरोबर तुही थोडी विश्रांती कर. मग बघू.' शिष्य पहुडला.
काही वेळाने भगवान बुद्धांना जाग आली. त्यांनी त्या शिष्याला पुन्हा हाक मारली आणि पाणी घेऊन ये म्हणाले.शिष्याला सकाळचेच दृष्य आठवले. परंतु आज्ञेचा भंग कसा करणार, म्हणून तो निमुटपणे घडा घेऊन तलावाजवळ गेला. तिथे जाऊन पाहतो तर काय, तलावातले पाणी शुद्ध दिसत होते. सगळा कचरा, गाळ तळाशी जमा झाला होता. ते पाहून शिष्य आश्चर्यचकित झाला. त्याने अलवारपणे घडा पाण्यात बुडवला आणि वरवरचे शुद्ध पाणी भरून तो घेऊन आला.
त्याची कुतुहलमिश्रीत मुद्रा पाहून भगवान हसले व म्हणाले, `मगाशी अनेक लोकांमुळे सगळा कचरा ढवळला जात होता, म्हणून पाणी दुषित दिसत होते. आता तिथे कोणीच नसल्यामुळे पाणी स्थिर झाले असेल आणि गाळ खाली बसला असेल. यावरून मला हेच सुचवायचे होते, जेव्हा आपल्या मनात अनेक विचारांचा कचरा ढवळून निघतो, डोक्यात अनेक शंकांचे काहूर माजते, असंख्य प्रश्न डोके वर काढतात, अशा वेळेस काही काळ शांत राहावे. सगळ्या विचारांचा निचरा झाला, की मन शांत होते आणि योग्य निर्णय घेण्यास प्रवृत्त होते. मन अशांत असताना मेंदू काम करत नाही आणि त्यावेळेस घेतलेले निर्णय हमखास चुकतात. म्हणून मनाचा तलाव शांत होऊ द्यावा नंतरच विचारांची तहान भागवावी.