Libra Features: तूळ राशीचे लोक असतात 'जगा आणि जगू द्या' वृत्तीचे आणि खुशाल चेंडू स्वभावाचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 06:10 PM2022-05-21T18:10:47+5:302022-05-21T18:13:36+5:30

Libra Features: तुला अर्थात पारडे, जे नेहमी समसमान न्याय देते, हीच वृत्ती असते तूळ राशीच्या लोकांची. जाणून घ्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी काही पैलू!

Libra Features: Libra people having happy go lucky nature! | Libra Features: तूळ राशीचे लोक असतात 'जगा आणि जगू द्या' वृत्तीचे आणि खुशाल चेंडू स्वभावाचे!

Libra Features: तूळ राशीचे लोक असतात 'जगा आणि जगू द्या' वृत्तीचे आणि खुशाल चेंडू स्वभावाचे!

googlenewsNext

शीर्षकात म्हटल्याप्रमाणे तूळ राशीचे लोक स्वभावाने खुशाल चेंडू अर्थात हसत खेळत आयुष्य जगणारे असतात. ते कोणाच्या अध्यात मध्यात नसतात. मात्र दुसऱ्यांना न्याय देताना नेहमी सत्याच्या बाजूनेच उभे राहतात. कला,संगीत, भटकंती हे त्यांचे आवडते प्रांत असल्यामुळे दुःख, निराशा त्यांच्या आयुष्यात फार काळ टिकाव धरूच शकत नाही. जगा आणि जगू द्या या न्यायाने ते आनंदी जीवन जगणे आणि दुसऱ्यांना जगू देणे पसंत करतात. 

तूळ राशीच्या लोकांचा आपल्या भावनांवर चांगला संयम असतो. राग-लोभ दोन्ही बाबतीत समतोल राखणे त्यांना चांगले जमते. ते कोणत्याही गोष्टीचा फार ताण घेत नाहीत. उलट आपल्या बोलण्याने ते दुसऱ्यांचा ताण देखील हलका करतात. त्यांना अवघड गोष्ट सोपी करण्याचे तंत्र चांगले जमते. त्यामुळे कामात, अभ्यासात आणि नाते संबंधात देखील ते यशस्वी ठरतात. सुसंवाद साधण्याची कला अवगत असल्याने आबाल वृद्धांशी त्यांचे छान सूत जुळते. 

Virgo Zodiac Sign: स्वार्थी, संधीसाधू तरीही संवेदनशील ही वैशिष्ट्ये असतात कन्या राशीच्या लोकांची!

हे लोक स्वभावाने बोलके असले तरी उगीचच बढाया मारत नाहीत किंवा कोणाच्या ऐकूनही घेत नाहीत. त्यांच्या वागण्या बोलण्यात साधेपणा असतो. आपल्या स्वार्थासाठी गोड बोलणे त्यांच्या तत्त्वात बसत नाही. ते आपल्या बोलण्याने कोणालाही दुखवत नाहीत. ज्या गोष्टी पटत नाहीत तिथून आपला मार्ग बदलून मोकळे होतात. आपला मुद्दा पटवून देण्याच्या प्रयत्नात आपली ऊर्जा वाया घालवत नाहीत. 

हे लोक अतिशय बुद्धिमान असतात. अभ्यास, करिअर, नाते संबंधात यशस्वी असले तरीदेखील आपल्या उदार स्वभावामुळे आर्थिक ताळमेळ बसवण्यात जरा कमी पडतात. ते आजचा क्षण जगण्यावर भर देतात. त्यामुळे पैशांचा संचय, भविष्याचा विचार याबद्दल गांभीर्याने विचार करत नाहीत. त्यामुळे जगण्याचे तंत्र थोडेसे बिघडू शकते. याबाबत उचित आणि काटकसरी जोडीदार मिळाला तर त्यांच्यासारखे नशीबवान तेच! आर्थिक बाब वगळता ज्यांना तूळ राशीचा जोडीदार मिळतो तेही लोक भाग्यवानच म्हटले पाहिजेत, एवढे कलागुण आणि आनंदी जीवन तूळ राशीचे लोक जगतात. 

तूळ राशीचे लोक मैत्रीपूर्ण, आनंदी आणि विवेकाने शुद्ध असतात. त्यांचा जनसंपर्कही चांगला असतो. सर्व प्रकारच्या लोकांशी मैत्री करतात. ते समाधानी असतात. पण हेच समाधान त्यांना महत्त्वाकांक्षी होण्यापासून प्रवृत्त करते आणि आळशी बनवते. याचा दुष्परिणाम त्यांच्या करिअरवर होऊ शकतो. याबाबत त्यांनी स्वतःला सावध ठेवायला हवे. तूळ राशीचे लोक नवीन गोष्टी,,संकल्पना, आधुनिक परंपरा यांचा सहज स्वीकार करतात. कालानुरूप बदलतात. त्यामुळे त्यांना स्वतःला कोणत्याही स्थितीत एकरूप होणे सहज जमते. 

जर त्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रह बलवान असेल तर त्यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असते. ते स्वतःच्या प्रेमात असतातच पण दुसऱ्यांवरती देखील जीव ओतून प्रेम करतात. त्यांना गोंगाट आवडत नाही. शांत आणि आनंदी आयुष्य जगणे पसंत करतात. समाजातील आदरणीय लोक त्यांचे चांगले मित्र असतात. त्यांच्यात न्यायाधीश, संगीतकार, प्रशासकीय अधिकारी, राजकारणी आणि धार्मिक नेता बनण्याचे गुण असतात. जर हे लोक राजकारण किंवा धार्मिक प्रतिष्ठानचे प्रमुख असतील तर त्यांना खूप आदर आणि अधिकार मिळतो. ते न बोलता इतरांवर प्रभाव टाकतात. इतरांना मदत करण्यातही त्यांना खूप आनंद होतो.

Leo Features: राजेशाही थाट, नेतृत्त्वाचे गुण आणि स्वभावात करडेपणा; असे असतात सिंह राशीचे लोक!

या लोकांचे शरीर कफ प्रधान असते. त्यामुळे बदलत्या हवामानाचा, थंडीचा आणि आंबट पदार्थांचा प्रकृतीवर लगेच परिणाम होतो. त्यामुळे त्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे आणि थंड तसेच आंबट पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे.  

या लोकांचा अध्यात्मिक पिंड असल्यामुळे त्यांना देवधर्म कार्यात रुची असते. या लोकांनी हनुमंताची उपासना केली तर त्यांना ती अधिक फलदायी ठरते. हनुमंताला दर मंगळवारी गूळ आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवावा तसेच मारुती स्तोत्र तसेच हनुमान चालीसा यांचे नित्यपठण करावे. यामुळे त्यांची अध्यात्मिक उन्नती होऊन आयुष्य आनंदात व्यतीत होते. 

Web Title: Libra Features: Libra people having happy go lucky nature!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.