Life Lesson: दुसर्यांच्या कमी लेखण्याने तुम्ही लहान होत नाही; जाणून घ्या स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 07:00 AM2024-11-09T07:00:00+5:302024-11-09T07:00:00+5:30
Life Lesson: दुसर्यांवर प्रेम करा ही शिकवण बालपणापासून दिली जाते, मात्र स्वत:वर प्रेम कसे आणि किती करायचे हे ब्रह्मकुमारी शिवानी दीदी यांच्याकडून शिकूया!
कळायला लागल्या पासून ''दुनिया का सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग!' या एका प्रश्नाभोवती आपले आयुष्य फिरत असते. लोक बोलून मोकळे होतात आणि त्यांच्या बोलण्याचा विचार करत आयुष्य आपले निघून जाते. याबाबतीत ब्रह्मकुमारी शिवानी दीदी सांगतात, लोक आपल्याबद्दल काय बोलतात यापेक्षा आपण स्वतःबद्दल काय बोलतो हे पाहणं महत्त्वाचं!
मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नाही असे म्हणतात. हे माहीत असूनसुद्धा समोरची व्यक्ती आपल्या बाजूने बोलावी यासाठी आपण अट्टहास करतो. तसे झाले तरी कोणाच्या बोलण्याने कोणतीही व्यक्ती चांगली ठरत नाही किंवा वाईट ठरत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण प्रत्येक जण कोणासाठी चांगला तर कोणासाठी वाईट असतोच. हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन असतो. हे फक्त व्यक्तीच्या बाबतीत नाही, तर फुलं, फळं, रंग, रूप, वस्तू अशा सगळ्या बाबतीत घडते. अशी एकही गोष्ट नाही जिला जगात सर्वमान्यता मिळाली आहे. असे असताना केवळ एक व्यक्ती तुमचा पूर्णतः स्वीकार करू शकते, ती म्हणजे तुम्ही स्वतः...!
आपण नेहमी अशी व्यक्ती बाहेर शोधतो, जी आपला स्वीकार करेल, आपल्याला समजून घेईल, आपली काळजी घेईल, आपला आदर करेल. अशी व्यक्ती बाहेर मिळणे कठीण आहे, पण त्या व्यक्तीला स्वतः मध्ये शोधणे सोपे आहे. कोणी आपल्याला नावं ठेवली, आपला अपमान केला तर त्याच्या शब्दांना किंमत देऊन आपण स्वतःला हानी पोहोचवतो, त्रास करून घेतो. याउलट जर आपण आपल्याशी मैत्री केली, स्वतःला ओळखले असले तर आपण स्वतःला सावरू शकतो. ज्याप्रमाणे आपण दुसऱ्याला आधार द्यायला सरसावतो, त्या आधाराची सगळ्यात जास्त गरज स्वतःला असते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला दुखवून जाते, तेव्हा आपण आपल्याला काही वेळ देतो का? तो द्यायला शिका, जेणेकरून दुसऱ्याने दुखावले तरी त्याक्षणी आपण स्वतःला उभारी देऊ शकू. स्वतःचे सांत्वन करू शकू.
ही सकारात्मकता येण्यासाठी रोज सकाळी आणि झोपण्याआधी स्वतःला वाक्य सांगा, ''लोक काय म्हणतील या भीतीखाली मी जगणार नाही, त्यावर विचार करेन, सुधारणेची गरज असेल तर तीसुद्धा करेन पण कोणाच्या बोलण्याने स्वतःला दुखवून घेणार नाही. कारण मी स्वतःला पुरेपूर ओळखतो, मला माझ्या क्षमता, माझा स्वभाव माहीत आहे. मला प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा आहे. माझ्या आनंदावर विरजण घालण्याची संधी मी कोणालाही देणार नाही! मी दुसऱ्याकडून प्रेम मिळण्याची वाट बघत बसणार नाही. कारण स्वतःला प्रेम देण्यासाठी मी सक्षम आहे.''
भगवंताने बनवलेली कोणतीही गोष्ट वाईट असूच शकत नाही. मनुष्य ही सुद्धा भगवंताची निर्मिती आहे. मग ती तरी वाईट कशी असेल? स्वतःला कमी लेखणे सोडून द्या. आवश्यक सुधारणा जरूर करा, मात्र स्वतःचे अस्तित्त्व विसरू नका आणि कोणाच्या सांगण्यावरून अविवेकाने स्वतःला बदलू नका!