Life Lesson: आयुष्यात एकांत निवडा पण एकटेपणा कधीही नाही; वाचा दोन्हीतला मुख्य फरक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 02:14 PM2024-01-29T14:14:06+5:302024-01-29T14:14:57+5:30

Life Lesson : सद्यस्थितीत अनेक जण एकाकी जीवन जगत आहेत, पण हा एकटेपणा चांगला की एकांत चांगला? फरक समजून घेत योग्य निवड करा. 

Life Lesson: Choose peace not loneliness; Read the main difference between the two! | Life Lesson: आयुष्यात एकांत निवडा पण एकटेपणा कधीही नाही; वाचा दोन्हीतला मुख्य फरक!

Life Lesson: आयुष्यात एकांत निवडा पण एकटेपणा कधीही नाही; वाचा दोन्हीतला मुख्य फरक!

प्रसिद्ध उद्योजक आणि भारतीयांचे प्रेरणास्थान रतन टाटा यांनी आपल्या आयुष्यातील खूप मोठे शल्य बोलून दाखवले. ते म्हणाले, ''एकटे राहणे काय असते, याचे दुःखं तुम्ही एकटे पडेपर्यंत जाणावणार नाही.' अब्जाधीश असलेला माणूस जेव्हा अशा रीतीने आपली खंत व्यक्त करतो तेव्हा आपण वेळेवर सावध होणे नितांत गरजेचे आहे. 

पायाला भिंगरी लागलेला मनुष्य सॅलरी, पॅकेजेसचे घबाड हाती लागल्यापासून विकेंड फार्म हाऊसवर, उन्हाळी सुटी थंडीच्या ठिकाणावर, पावसाळी सुटी ट्रेकींगवर, हिवाळी सुटी परदेशी दौऱ्यात खर्ची करू लागला. सुटी मिळताच फिरायला जाणे आणि परत आल्यावर बैलासारखे घाण्याला जुंपणे, हा जणू काही राहणीमानाचा भाग झाला. मात्र, एवढा वेळ, पैसा, शक्ती खर्च करूनही इप्सित साध्य झाले का? गर्दी आहे पण माणसे नाहीत.  अशी परिस्थिती एकांत देत नाही, तर एकाकी पाडते. याबाबत संतांचे विचार काय आहेत जाणून घेऊ.

आजच्या या धकाधकीच्या स्पर्धेच्या युगात महानगरात निसर्गसंपन्न व एकांतपूर्ण जागा सापडणे कठीण आहे. स्वच्छ हवा, पाणी यांचे दर्शनही होत नाही. सर्व प्रदुषणाने वेढलेले आहे. परंतु, मध्ययुगीन संतांनी निसर्गरम्य, शांत व स्वच्छ एकांतस्थळाचा महिमा वर्णन केला आहे. टाकळी, सज्जनगड, शिवथर, चाफळ, इ. सौंदर्यस्थळे समर्थांनी पसंत केली होती. त्यांच्या मते एकांतेवीण प्राणियाते बुद्धि कैची?

यासाठीच अनेक साधूसंत निसर्गसंपन्न एकांतस्थानाचा आश्रय घेतात. ते भोवतीच्या लोकांना विटले होते असे नाही, तर त्यांना साधनेसाठी एकांत हवा होता. याचसाठी तुकाराम महाराज भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन वृक्षवेलींशी मैत्री करत. हिमालयातही अनेक महात्म्यांचे आश्रम होते. 

साधकाने ध्यानधारणेसाठी, चिंतनासाठी, मन एकाग्र करण्यासाठी स्थान कोणत्या प्रकारचे निवडावे, यासंबंधी ज्ञानेश्वरांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आहे. ते म्हणतात - असे स्थान पाहून नास्तिकालाही ईश्वराची आठवण व्हावी. त्याचे भटकते मन स्थिर व्हावे. याठिकाणी मोजके साधक असावेत व येथील वाटा फारशी मळलेल्या नसाव्यात. लोकांची विशेष वर्दळ नसावी. नेहमी गोड फळे देणारी झाडे असावीत. या ठिकाणी पावलोपावली निर्मळ पाण्याचे झरे असावेत. ऊनदेखील सौम्य असावे. वारा शांत व सुगंधित असावा. 

हे स्थान नि:शब्द असावे. श्वापदांची गर्दी नसावी. पोपट, भ्रमर नसावेत. हंस, चक्रवाक, एखादा कोकिळ चालेल.
निरंतर नाही, तरि आली गेली काही,
होतु का मयूरेही, आम्हा ना न म्हणो।

अशा या स्थानात एखादा निगूढ मठ असावा. जवळच एखादे शिवाचे देऊळ असावे. अशा ठिकाणी मन स्थिर होते. या ठिकाणी बसून साधकाने चिंतन करावे. त्याचे आसन कसे असावे, याचेही मार्गदर्शन ज्ञानेश्वरांनी केले आहे. ते फार उंच नसावे. निम्न असावे. अशा आसनी बसून साधकाने चिंतन, मनन करावे.

आपल्या दैनंदिन आयुष्यात काही क्षण स्वतःसाठी राखून ठेवावेत आणि हे अनुभव अवश्य घ्यावेत. जगण्यासाठी पैसा लागतो कबूल आहे, पण पैसा सगळीच सुखं देऊ शकतो असे नाही. पैशांनी समाधान विकत घेता  येत नाही. म्हणून समाधान मिळेल अशी वाट निवडा आणि तिथे काही काळ विसावा जरूर घ्या. आयुष्याच्या उत्तरार्धात या गोष्टी करू वगैरे ठरवू नका. जेव्हा जशी संधी मिळेल तसा तो क्षण आनंदाने जगा. स्वतःला वेळ द्या. आपल्याला एकांत हवा आहे एकटेपणा नको हे ध्यानात ठेवा! 

Web Title: Life Lesson: Choose peace not loneliness; Read the main difference between the two!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.