Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 11:23 AM2024-05-13T11:23:49+5:302024-05-13T11:24:05+5:30
Life lesson : सद्यस्थितीत शारीरिक आजारापेक्षा मानसिक आजाराचे प्रमाण वाढत आहे, त्याला कारण आहे अशांत मन; ते शांत ठेवण्याचा मार्ग जाणून घ्या.
मन शांत नाही अशी अनेकांची तक्रार असते. सद्यस्थितीत तर लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांसाठीच ही अडचण झाली आहे. मनावर शेकडो विषयांचा मारा होत असताना, मन शांत होणार तरी कसं? मनाला शांत करण्यासाठी लागणारा सराव आपण करतच नाही. मोबाईल हातात आल्यापासून ही अस्वस्थता जास्त वाढली आहे. सतत हलती चित्र, स्क्रोलिंगची सवय, एका विषयाशी न थांबता सतत काहीतरी ऐकण्याचा, पाहण्याचा अट्टहास आपल्या मनाला शांत राहूच देत नाही.
मग हे आपल्याला जमणारच नाही का? निश्चितच जमेल. कोणतीही गोष्ट सरावाने साध्य करता येते. जर तुम्हाला क्रिकेट खेळण्याची रुची असेल, पण खेळणं प्रभावी नसेल तर रोज त्याच विषयाला दहा तास दिले, तर वर्षभरात तुम्ही विराट कोहली व्हाल असे नाही पण उत्तम क्रिकेटपटू होऊ शकाल हे नक्की. कोणतेही यश एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी सातत्य ठेवावे लागते. मन शांत करण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी सुद्धा सराव गरजेचा असतो. तो कसा आणि कधी करायचा ते पाहू.
म्हणून सकाळी उठल्यावर काही काळ अंथरुणावर बसून मन एकाग्र करण्याचा सराव करावा. तेव्हा आजू बाजूला आवाज नसतात. सुरुवातीला हा सराव ब्रह्ममुहूर्तावर करावा. निसर्गाला आलेली जाग, पहाटेची निरव शांतता आणि मनात शेकडो विचार असले तर डोळ्यासमोर शांतपणे उलगडत जाणारा काळोख. यामुळे मनातले विचार कीतीही त्रासदायक वाटले तरी त्याचवेळेस बाहेरील वातावरणाचा मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि रोजच्या सरावाने मन शांत होण्यास मदत होते.
एकदा का मन एकाग्र करण्याचे तंत्र आत्मसात झाले की दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल, मन अशांत आहे असं जाणवेल, तेव्हा तेव्हा तुम्ही क्षणार्धात ध्यानधारणा करून या स्थितीतून बाहेर पडू शकता. एवढंच काय तर या मनशक्तीच्या जोरावर जे हवे ते साध्य करू शकता. फक्त त्यासाठी सराव करा. 'प्रयत्ने कण रगडीता वाळूतून तेलही गळे' या म्हणीला अनुसरून सराव सुरु करा. जर एकट्याने हा सराव करणे शक्य नसेल तर या विषयातील जाणकारांची मदत घ्या. योग्य वेळी योग्य व्यक्तीकडून घेतलेली मदत आयुष्यभरासाठी उपयोगी पडू शकेल हे नक्की!