Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 11:49 AM2024-05-24T11:49:21+5:302024-05-24T11:49:45+5:30
Life Lesson : 'मिड लाईफ क्रायसिस' अर्थात आयुष्याच्या मध्यावर आल्यानंतर उद्भवणाऱ्या समस्या आणि ढासळणारा तोल कसा सांभाळायचा हे सांगणारी गोष्ट वाचा.
बहिरी ससाणा अतिशय शक्तिशाली पक्षी आहे. तो किमान ७० ते ८० वर्षांचे आयुष्य जगतो. परंतु, वयाच्या साधारण तीस-चाळीसाव्या वर्षी त्याची चोच आणि नखं कमकुवत होऊ लागतात. अशा स्थितीत त्याच्याकडे दोन पर्याय असतात. एक म्हणजे हार पत्करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे प्राप्त परिस्थितीला तोंड देत संयम बाळगणे. शूर ससाणा दुसरा पर्याय निवडतो. खडकावर चोच आणि नखं घासून ती अक्षरश: तोडून टाकतो. सहा महिने त्याला भयंकर यातना सहन कराव्या लागतात. निसर्गदत्त देणगीमुळे त्याची चोच आणि नखं परत मिळतात आणि पुढचं आयुष्य तो पुन्हा स्वावलंबीपणे जगतो. दिर्घआयुष्य आनंदाने जगतो. फक्त त्यासाठी सहा महिने त्याला त्रास काढावा लागतो.
ससाणाच्या बाबतीत जे घडते, तेच मानवाच्या बाबतीतही घडते. वयाच्या चाळीस ते पंन्नाशीचा टप्पा त्याच्यासाठी अवघड असतो. एकीकडे मुलांना स्थिरस्थावर करायचे असते तर दुसरीकडे ज्येष्ठ झालेल्या आपल्या आईबाबांची सेवा करायची असते. करिअर, धंदा, नोकरी, व्यवसाय या सगळ्यात त्याची ओढाताण होत असते. सतत लोकांच्या अपेक्षांची ओझी उचलून खांदे झुकलेले असतात. एक क्षण असा येतो, की सगळं संपवून टाकावंस वाटतं. अशा वेळी या शक्तिशाली ससाण्यांची गोष्ट आठवावी.
आजवर आयुष्यात अनेक सुख दुःख पार केली, मग थोडक्यासाठी माघार न घेता धैर्याने संघर्ष केला तर भावी काळ सुखाचा होईल, या आशेने प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. पक्षी असून ससाणा एवढा आत्मविश्वास दाखवू शकतो, तर आपण धडधाकट शरीराच्या आणि खंबीर मनाच्या जोडीने असाध्य तेही साध्य करू शकतो, याची खात्री बाळगा.
इथून पुढे नजर आकाशाकडे अर्थात ध्येयाकडे आणि पाय जमिनीवर कायम ठेवा. सर्वांशी प्रेमाने वागा. चांगल्या आणि संयमी वागणुकीसाठी पैसा नाही तर समंजसपणा महत्त्वाचा असतो, तो दाखवूया आणि दीर्घ व आनंदी आयुष्य जगूया.