Life Lesson: वृद्धापकाळ आनंदात घालवायचा असेल तर शंकराचार्यांनी सांगिलेला उपाय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 04:33 PM2024-07-03T16:33:11+5:302024-07-03T16:33:34+5:30
Life Lesson: आयुष्यभर आपण खस्ता खातो ते वृद्धापकाळ सुखाचा जावा म्हणून, तोच राजमार्ग सोपा करून सांगताहेत शंकराचार्य!
वृद्धपण हे दुसरे बालपणच असते. मात्र, बालपणी जे हट्ट पुरवले जातात, काळजी घेतली जाते, जेवढे प्रेम मिळते, ते वृद्धापकाळात मिळेलच असे नाही. नात्यांची समीकरणे बदलतात आणि मनुष्याला एकाकी वाटू लागते. जोडीदाराची साथ असेल तर ठीक, अन्यथा तोही निघून गेला असेल, तर वृद्धापकाळ आणखी त्रासदायक वाटू लागतो. तो एकाकीपणा घालवण्यासाठी, आपले पूर्वज कथा, कीर्तनात, भजनात, सत्संगात मन रमवत असत. कारण, आयुष्याचे उत्तरायण सुरू झाले आणि पैलतीर दिसू लागला, की भगवंताचाच आधार आपल्याला वाटू लागतो.
या परिस्थितीचे वर्णन श्रीमद् आद्य शंकराचार्य करतात,
याविद्वत्तोपार्जनसक्त: तावन्निजपरिवारो रक्त:
पश्याद्धावति जर्जर देहे वार्तां, पृच्छति कोपि न गेहे।।
माणूस धडधाकट असतो. पैसा मिळवतो, तोपर्यंत कुटुंबातील माणसे आणि आप्तेष्ट त्याची आस्थेने विचारपूस करतात. पण म्हातारपण आले, की त्याची घरात पूर्ण उपेक्षा होते. असे झाले नाही तर उत्तम, पण म्हातारपणी एकाकी राहण्याची मानसिक सिद्धता मात्र माणसाने अवश्य करावयास पाहिजे. ही सिद्धता करण्याचा मार्ग आचार्यांनी सांगितला आहे.
भज गोविंदं भज गोविंदं, भज गोविंदं मूढमते।
परमेश्वराकडे लक्ष लावा, म्हणजे आपण एकटे आहोत, आपली उपेक्षा होते किंवा इतरांकडून आपल्याला आनंद मिळणार आहे, हा सारा भ्रम दूर होतो. माणसाला स्वत:च्या आनंदमय स्वरूपाची ओळख होते आणि परावलंबन मावळते. काही प्रमाणात शरीराचे भोग सोसण्याची शक्तीही लाभते.
वृद्धापकाळी प्राप्त परिस्थितीचा समाधानाने स्वीकार करून आनंदात राहता येणे, ही फार मोठी कमाई असते. आपण एकटे आहोत, उपेक्षित आहोत, अडगळीसारके आहोत, असे वाटून न घेता ईश्वरचिंतनात उर्वरित आयुष्य घालवले पाहिजे.
याचा अर्थ असा नाही, की वृद्धापकाळातच भगवंताचे नाम:स्मरण करावे. तर, एकाकीपण वयाच्या कोणत्याही टप्प्यावर येऊ शकते. अशा वेळी कोणाची साथ मिळते, तर कोणाची नाही. यावर तुकाराम महाराज तोडगा शोधतात. त्यांनी जो सोबती निवडला आहे, तो कधीच एकाकी पडू देणार नाही. आपणही त्याचेच बोट धरावे, असा ते आग्रह करत आहेत...
जेथे जातो तेथे, तू माझा सांगाती,
चालविसी हाती धरूनिया।।
तुकाराम महाराजांनीदेखील प्रपंच सांभाळून परमार्थ केला. त्यांच्याही वाट्याला सुख-दु:खं आली. परंतु, ते सांगतात, अशा कोणत्याही प्रसंगी मला एकटेपणा कधीच वाटला नाही, कारण साक्षात भगवंतालाच मी माझा सोबती करून घेतला. तुम्हीसुद्धा त्याच्याशी सख्य जोडले, तर तुम्हालाही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तो आपला सोबती आहे, हा दिलासा मिळत राहिल. मग शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही केवळ परमानंद अनुभवत राहाल.
निश्चितीने आता पावलो विश्रांती,
खुंटलिया धावा तृष्णेचिया।।
जोवर शरीरात ताकद होती, तोवर तन, मन, देहाने सर्व जबाबदाऱ्या नेटाने पार पाडल्या. हे आत्मिक समाधान असले, की वृद्धापकाळात मनात कुठलेही शल्य राहत नाही. निवृत्ती केवळ कामातूनच नाही, तर सर्व व्याप, तापातून मिळालेली असते. अशावेळी अपेक्षांचे ओझे उतरवून ठेवले आणि विठ्ठलचरणी मन लावले, की सर्वार्थाने विश्रांती मिळाल्याचे समाधान लाभते.
तुका म्हणे विठो भरला सबाह्य,
काय उणे आम्हा चराचरी।।
असे समाधानी लोक कधीच दु:खी दिसत नाहीत. कारण, त्यांना आनंदाचा ठेवा प्राप्त झालेला असतो. ही सवय मनाला लावून घेतली, की सांसारिक विषयातून मन अलिप्त होत जाते आणि सबाह्य अंतरी केवळ विठ्ठलाचा सहवास घडू लागतो. मन धीट होते व म्हणते,
आता होणार ते होयेना का, जाणार ते जायेना का,
तुटली मनातील आशंका, जन्ममृत्यूची।।
मी तृप्त आहे, समाधानी आहे, आनंदासाठी कोणावर अवलंबून नाही, हेच मनाला समजवत राहा, हा कानमंत्र श्रीमद् आद्य शंकराचार्य देत आहेत.