जीवनाचा ‘आस’ स्थिर हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 04:16 AM2020-06-19T04:16:33+5:302020-06-19T04:16:37+5:30
काळासोबत चालायला शिकलं पाहिजे असे म्हणतात आणि ते खरंही आहे. काही ज्ञानशाखा कालौघात लुप्त झाल्या. पुढच्या पिढीला ते ज्ञान आज ठाऊक नाही.
- बा. भो. शास्त्री
प्रत्येक युगाचा एक धर्म व अधर्मही असतो. धर्म सिद्धांत अढळ असतात. आचारसंहितेत विचाराला अनुसरून कालपरत्वे परिवर्तन होत असतं. ऋतुपरत्वे, वयपरत्वे आहार-विहार बदलतात. तसं आचाराचं मूळ स्वरूप तसेच ठेवून कालानुरूप थोडा बदल होत असतो. काळासोबत न चालणारे धर्म लुप्त झालेत. म्हणून काळासोबत चालायला शिकलं पाहिजे असे म्हणतात आणि ते खरंही आहे. काही ज्ञानशाखा कालौघात लुप्त झाल्या. पुढच्या पिढीला ते ज्ञान आज ठाऊक नाही. आचार हा जात्याच्या वरच्या पाळूसारखा फिरणारा असावा; पण खालची पाळू अधिष्ठान असते ती स्थिर असावी लागते. कारण ती विचाराची असते. विचाराचं फिरणं हा अधर्म आहे. बैलगाडीचं चाक फिरतं, ‘आस’ फिरत नाही. न फिरणारा आस जगभर फिरणाऱ्या चाकाचा आधार असतो. असाच जीवनमूल्यांचा सिद्धांत स्थिर असावा. पाण्यातली शीतलता, अग्नीतली दाहकता, भूमीचं जडत्व, हवेतली चंचलता व आकाशाची अलिप्तता हे धर्म जडभूतांनी सांभाळले आहेत. गाय मांस खात नाही अन् सिंह गवत खात नाही. हे पशूपण धर्मासी प्रामाणिक आहेत. माणूसच धरसोड करतो. त्याचं स्वभावावर नियंत्रण नाही. निसर्गाने वटवाघूळ, साप, झुरळ, किडे हा आहार सांगितला नाही. त्याचे अतिवाईट परिणाम आपण भोगत आहोत. भोगात भोग असतात तसे रोगही असतात. हेच आरोग्यशास्त्र जगाला सांगत आलं आहे. सृष्टीत विषय खूप आहेत; पण भोगण्याचे ज्ञान हजारात एखाद्याला आहे, म्हणून सदोष भोगापासून सावधान. आजच्या सूत्रात श्रीचक्रधर हेच सांगतात. ‘कलियुगी विखो आति परि विखया नाही’ आपल्याला वाटेल, राजे महाराजे यांच्याजवळ विषय असून वैद्यही असतात. ते पदार्थांचं योग्य सेवन करत असतील? यावर स्वामी म्हणतात, ते भुकेची पिडा दूर करतात. त्यात पोषणाचा विचार नसतो. ते केवळ संकोच फेडतात. त्यांना विषयाचा आनंद संपूर्ण घेता येत नाही. याचा अर्थ कलियुगात सर्वच इंद्रियाचे विषय भरपूर आहेत, पण भोक्ता नाही.