छोट्याशा चिमणीने माळी दादाला, नव्हे आपल्या सर्वांना शिकवला मोठ्ठा धडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 06:22 PM2021-06-22T18:22:00+5:302021-06-22T18:22:19+5:30
चुकांची आपण पुनरावृत्ती करत राहिलो तर आपल्या आयुष्यात बाहेरचे लोक येऊन असेच नासधूस करत राहतील.
एका माळ्याने सुंदर बाग तयार केली होती. तो त्या बागेचा जीवापाड सांभाळ करत असे. मात्र गेल्या काही दिवसांपासून एक चिमणी रोज येऊन त्याच्या बागेची नासधूस करत होती. माळ्याने तिला शिक्षा द्यायचं ठरवलं. तो तिच्या मागावर होता. दबा धरून बसला होता. पण काही केल्या चिमणी त्याच्या हातात येईना. त्याला त्रास देताना चिमणीला आणखी गंमत वाटे.
एक दिवस माळ्याने मस्त सापळा रचला आणि नेमकी चिमणी त्या जाळ्यात अडकली. माळ्याला खूप आनंद झाला. आता तो चिमणीला शिक्षा देणार होता. त्याने चिमणीला हातात घट्ट धरलं आणि दामटवत विचारलं, 'काय गं चिमणे, माझ्या सुंदर बागेची नासधूस करताना तुला काहीच वाटलं नाही ना. बरी आता ताब्यात आलीस. तुला कशी शिक्षा करतो बघच!'
चिमणी घाबरली आणि बारीक आवाजात चिवचिवत म्हणाली, 'माळी दादा, माळी दादा मला माफ करा. पुन्हा अशी चूक नाही करणार.'
माळी म्हणाला, 'लबाड आहेस तू. मला माहीत आहे. तुला काही आज मी सोडत नाही.' असे म्हणत माळ्याने तिला आणखीनच घट्ट धरली.
चिमणी काकुळतीला येऊन म्हणाली, 'माळी दादा, आज माझे प्राण कंठाशी आल्यावर मला माझी चूक कळली आणि आता मला याची शिक्षाही मिळणार याची खात्री झाली आहे. पण आता मरण्याआधी तुला चार ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्या वाटत आहेत, सांगू का?'
माळ्याने नुसता हुंकार भरला.
चिमणी म्हणाली, 'पहिली गोष्ट म्हणजे, अति आत्मविश्वास वाईटच! म्हणून कोणावरही विश्वास ठेवू नये.
दुसरी गोष्ट म्हणजे शत्रूला कधीच कमकुवत समजून माफ करू नये.
तिसरी गोष्ट म्हणजे गेलेल्या गोष्टीबद्दल पश्चात्ताप करू नये.
आणि चौथी म्हणजे.... माळी दादा जरा पकड ढिली करा. गळा आवळला जातोय. थोडी मोकळीक दिलीत तर चौथी गोष्ट सांगते...'
माळ्याने पकड थोडी ढिली केली, तशी चिमणी फुर्क्कन उडाली आणि झाडावर जाऊन बसली. माळ्याला म्हणाली, 'माळी दादा, माझ्या पोटात २ हिरे होते, मला सोडून तू मोठी चूक केलीस'
हे ऐकून माळ्याचा चेहरा आणखीनच पडला. त्यावर चिमणी हसून म्हणाली, 'हे काय माळीदादा, आता सांगितलेल्या चारही गोष्टी तू विसरलास?
अति आत्मविश्वास वाईटच! म्हणून कोणावरही विश्वास ठेवू नये. तरी तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवलास!
शत्रूला कधीच कमकुवत समजून माफ करू नये. तू माझ्यावर दया दाखवून चूक केलीस.
गेलेल्या गोष्टीबद्दल पश्चात्ताप करू नये. हातून निसटून गेल्यावर तुला मी हिरे पोटात असल्याचे म्हटलं आणि तू विश्वास ठेवलास आणि पश्चात्ताप करू लागलास. ही आणखी मोठी चूक...!
या चुका परत परत होऊ नये म्हणून तुला धडा शिकवायला मी तुझ्या बागेची नासधूस करत होते. आता यापुढे या गोष्टी लक्षात ठेव, मी पुन्हा परीक्षा घ्यायला येईन.' असे म्हणून चिमणी उडून गेली. माळी दादा आपल्याच चुकांवर हसू लागला.
वास्तविक पाहता ही शिकवण एकट्या माळी दादासाठी नसून आपल्या सगळ्यांसाठी आहे. या चुकांची आपण पुनरावृत्ती करत राहिलो तर आपल्या आयुष्यात बाहेरचे लोक येऊन असेच नासधूस करत राहतील.