Lokmanya Tilak Jayanti 2022: बहुजन समाज लोकमान्य टिळकांना गुरुस्थानी का मानत असे? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 07:00 AM2022-07-21T07:00:00+5:302022-07-21T07:00:06+5:30

Lokmanya Tilak Jayanti 2022: तत्कालीन समाज लोकमान्यांना तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून हिणवत असे, परंतु लोकमान्य त्या उपाधीला आपला सन्मान समजत असत.

Lokmanya Tilak Jayanti 2022: Why did the Bahujan Samaj consider Lokmanya Tilak as Gurusthani? Find out! | Lokmanya Tilak Jayanti 2022: बहुजन समाज लोकमान्य टिळकांना गुरुस्थानी का मानत असे? जाणून घ्या!

Lokmanya Tilak Jayanti 2022: बहुजन समाज लोकमान्य टिळकांना गुरुस्थानी का मानत असे? जाणून घ्या!

googlenewsNext

गुरु म्हणजे मार्गदर्शक. कुठे जावे, काय करावे याचा नीट उलगडा होण्यासाठी जो योग्य मार्ग दाखवतो, तो गुरु. म्हणूनच लोकमान्य टिळकांना राष्ट्रगुरु असे यथार्थतेने म्हणता येते. २३ जुलै रोजी लोकमान्य टिळकांची जयंती आहे. त्यानिमित्त करून घेऊ त्यांच्या बहुमूल्य कार्याची ओळख!

पारतंत्र्याच्या काळात लोकमान्यांनी `स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!' असे तेजस्वी उद्गार काढले आणि या टिळकांच्या उद्गारांना मंत्राचे स्वरूप प्राप्त झाले. जोखड झुगारण्यासाठी आत्मविश्वास देणारा, स्वाभिमानाची ज्योत मनात पेटविणारा हा मंत्र टिळकांनी उभ्या भारतवर्षाला दिला. त्यांच्याबद्दल अधिक माहिती देताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिहितात-

अलीकडच्या इतिहासात गेल्या शे दीडशे वर्षांत लोकमान्यांएवढी लोकप्रियता आणि लोकमान्यता दुसऱ्या कोणाला मिळालेली नाही. लोकमान्यांचे व्यक्तिगत जीवन अतिशय स्वच्छ व निष्कल असे होते. लोकमान्य हे जणू परमेश्वराचा अवतार आहेत, अशा भावनेने लोक त्यांच्याकडे पाहत असत. लोकमान्य तुरुंगात गेले तर त्यांच्यामुळे तुरुंग पावन झाला असे एका कवीने म्हटले आहे.

लोकी निंद्य कारावास, परि तू पावन केले त्यास।।

रँडच्या खुनासंदर्भात टिळकांना शिक्षा झाली. प्रथम काही महिने टिळक डोंगरीच्या तुरुंगात होते. तिथे तळहाताएवढ्या भाकरीचा तुकडा ते पाण्यात कुस्करून खात. दोन महिन्यांत त्यांचे वजन तीस पौंडांनी कमी झाले. टिळक तुरुंगात असताना कोट्यावधी भारतीयांना जेवण गोड लागत नसे. लोकमान्य तुरुंगात आहेत म्हणून लोकमान्यांचे गुरू श्रीधर गणेश जिनसीवाले हे इतके व्यथित झाले, की ते चौपाटीवर जाऊन लहान मुलासारखे रडत बसले. लोकमान्यांना तुरुंगात अतिशय वाईट भोजन मिळते, हे समजल्यावर कैद्यांना घरुन जेवण आणायची मुभा होती ते आपल्या डब्यातून लोकमान्यांना आवडणारे पदार्थ मागवीत आणि युक्तीने ते त्यांच्यापर्यंत पोहोचवित. 

येरवड्याच्या तुरुंगात टिळक असताना तेथील शिपाई टिळकांना आवडती सुपारी त्यांना देण्यात आनंद मानत असे. काही समाजकंटक लोकमान्यांना हिणवण्यासाठी तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणत असत. परंतु समाजाच्या या वर्गाचा लोकमान्यांवर अतिशय लोभ होता. 

टिळक मंडालेच्या तुरुंगातून सुटून आले त्यावेळी पुण्यातील काही देवळांमध्ये चक्क दीपोत्सव साजरा झाला. सरदार खाजगीवाल्यांनी टिळक सुटून येईपर्यंत गणपतीचे विसर्जन करणार नाही असा पण केला होता. टिळक सुटून आल्यावर थाटामाटात विसर्जन करण्यात आले.

१८९८ च्या प्रारंभी मुबईला प्लेगची साथ होती. प्लेग प्रतिबंध लस विश्वासार्ह न वाटल्याने टिळक ती लस टोचून घेण्यास नाखुष होते. त्यामुळे तुरुंगातील इतर कैदीही लस टोचून घ्यायला तयार होईना. मग डॉक्टरांनी टिळकांना सांगितले, `तुम्ही लस टोचून घ्या  तरच इतर लोक लस घेतील.' टिळकांची खात्री पटल्यावर त्यांनी अणि इतर कैद्यांनी लस टोचून घेतली. 

टिळक तुरुंगातून सुटून येईपर्यांत लोकांनी अनेक उपासतापास केले, नवस केले, आवडते पदार्थ सोडले. अनुष्ठाने केली. टिळक राष्ट्राचे पुढारी होते, पण प्रत्येकला ते आपल्या घरचेच कोणी वडीलधारे आहेत, असे वाटे. टिळकांसारखा लोकोत्तर आदर्श पुढारी अद्वितीय स्थान प्रस्थापित करणारे टिळक या देशाला स्वातंत्र्याचा मंत्र देणारे राष्ट्रगुरु म्हणून पुजनीय वाटतात.

Web Title: Lokmanya Tilak Jayanti 2022: Why did the Bahujan Samaj consider Lokmanya Tilak as Gurusthani? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.